आयुष्य
*आयुष्य* गर्भातल्या गूढ अंधारातून सुरु होतो आयुष्याचा प्रवास-भविष्यकाळाच्या उदरातील अनाकलनीय दिशेने...!गूढ अंधारातून लख्ख प्रकाशात जेव्हा प्रवेश होतो आयुष्याचा-तेव्हा हसत असते प्रकाशाला निर्ढावलेले आयुष्य अन् रडत असते प्रकाशात प्रवेश करणारे आयुष्य! तिथूनच पंख फुटतात आयुष्याला...ज्याच्या त्याच्या प्राक्तनानुसार घडत जाते ज्याचे त्याचे आयुष्य...कुणाचे आयुष्य अल्पजीवी ठरते तर कुणाचे आयुष्य मध्यजीवी...कुणाचे आयुष्य सरकत जाते पूर्णत्वाकडे! आयुष्याचा प्रवास असा क्षणा-क्षणांचे गतिरोधक पार करत सरकत असतो पुढे...कुणाचे आयुष्य ठेचकाळते अशा गतिरोधकांना...चाल धीमी होते आयुष्याची अन् कधी कधी हे आयुष्य सरकते बाजूला या प्रवासातून...इथपर्यंतच असतो त्याचा प्रवास...! बाकीची आयुष्ये मग शोधत रहातात आपल्याच प्रवासातील अडखळलेल्या गतिरोधकांची लांबी-रुंदी अन् खूश होतात पार केल्याच्या आविर्भावात! आयुष्यालाही असतात अवस्था...बाल्यावस्था,तारुण्यावस्था आणि वार्धक्यावस्था! भुईच्या उदरातून नुकत्याच अंकुरलेल्या अंकुरासारखे मुलायम आणि सोज्वळ असते बाल...