सलाईन
÷:÷:÷:÷:÷:÷: सलाईन ÷:÷:÷:÷:÷:÷:
डॉ.कुबेर यांची ओ.पी.डी.आज पेशंटनी खचाखच भरली होती.आतल्या कॉटवर सिंगल डबल पेशंट सलाईनवर होते.बाहेर व्हरांड्यातल्या लोखंडी बाकड्यावर चार-पाच,तर प्लायवूडच्या बसणीवर सात-आठ पेशंट डॉक्टरांच्या दर्शनासाठी रांगेत बसले होते.पेशंट आला,धुतला आणि वाळत घातला असा पैसेकमावू उद्योग डॉ.कुबेरांनी कधी केला नव्हता.एका एका पेशंटला अर्धा-अर्धा तास तपासणीसाठी गेला तरी त्यांनी कधी घाई-गडबड केली नव्हती.बाहेरच्या रांगेतील पेशंट बोंबा मारायचे पण डॉक्टरांनी आपला वसा कधी टाकला नाही.
आजही एवढी गर्दी असूनही डॉक्टरांनी एक-एक पेशंट अगदी निवांतपणे तपासला.जसजशी वेळ वाढू लागली तसतशी रांगेतल्या पेशंटची हताशता आणि टेंपरेचर वाढू लागले.
लोखंडी बाकड्यावर बसलेला परशा बेचैन बेचैन वाटत होता.बाकड्यावरुन उठून बाहेर जावे तर नंबर हुकायची भीती म्हणून तो जागचा उठत नव्हता.हाता-पायांची थरथर जास्तच वाढली होती.मळमळही होत होती.मधूनच गोल गोल फिरल्यासारखे वाटत होते.आता इथून उठून जावे तर तीही मोठी पंचाईत झाली होती.रातीच श्यामलीला वचन दिले होते.ते वचन मोडताही येत नव्हते.नाहीतर श्यामलीने घर सोडून जायची धमकी दिली होती.तरीही एकदा-दोनदा त्याने उठायचा प्रयत्न केला पण सोबत आलेल्या किसनाने त्याला दाबून तसाच खाली बसवला.
परशा गावात एक चांगला माणूस म्हणून ओळखला जात होता.तसा तो चांगला होताही,मात्र त्याला एक वाईट खोड होती.तो कधी काय करेल याचा नेम नसायचा.त्याची कधी ' सटकेल ' हे ही सांगता येत नव्हते.
मागच्या वर्षी परशा असाच सासरवाडीला गेला होता.आता जावाई घरी आला म्हणल्यावर तुकाराम व शांताने जेवणाचा जंगी बेत करायचे ठरवले.खुराड्यातल्या कोंबडीलाही कधी एकदा कुकरमध्ये जाऊन बसते असे झाले होते की काय माहीत?पण नरड्यात काय तरी अडकल्यामुळे सकाळपासूनच ती मान मुरगाळून बसली होती.अशातच जावयाचे आगमन झाले-देवासारखे म्हणा नाहीतर यमदुतासारखे म्हणा-बिचाऱ्या कोंबडीच्या यातना परशाने आपल्या हाताने सोडवल्या आणि तिची रवानगी कुकरमध्ये केली.
जेव्हा कधी परशा सासरवाडीला जायचा तेव्हा मांसाहारी जेवणाचा बेत ठरलेलाच असायचा.परशाही मांसाहारी रस्सा बनवण्यात पटाईत.मागे एकदा परशाने केलेला मटणाचा रस्सा सासू-सासऱ्याने चापून चापून हाणला,तेव्हापासून मटणा-कोंबडीचा आचारीपणा परशाकडेच आलेला.
आजही परशानेच खमंग चिकन रस्सा बनवला.खायला इन मीन तिघेजणच-परशा,तुकाराम आणि शांता!
ऐन दुपारची वेळ...ऊन्हाचा रखाटा वाढलेला.अशात कोंबडीने तिघांच्याही ताटात तुकड्या-तुकड्याने उडी टाकली.आजचा रस्सा तर एवढा झकास झाला होता कि तिघांनीही कोपरापर्यंत ओघळ जाईस्तोवर चाप चाप चापला.एवढ्यात शांता ख्वॉ...ख्वॉ हसू लागली.शांती हसतिया म्हणून तुकाराम पण हसायला लागला.
" का हसताय दोघं बी याड लागल्यासारकं?" गालातल्या गालात हसत परशाने विचारले.
" परसू पावनं,आजचा रस्सा लयच नंबरी झालाय बर का! " तुकारामाने घास रिचवता रिचवता सांगितले.
" जावाय असावा तर अस्सा सोन्यासारखा.." शांताच्या हसण्यातून शब्द उमटले की शब्दातून हसणे उमटले काही समजले नाही.पण तुकारामाने मान डोलवून शांताबाईला अनुमोदन दिले.
" घ्या मामा अजून..मामी,तुमी बी घ्या..! "
जावयाचा मान मोडायचा नाही म्हणून शांताने हसत हसतच हातात पळी घेतली आणि पातेल्याच्या कडेकडेनेच पळी फिरवू लागली.
" बया..बया..कोंबडीनं टांग हाणली वाटतं...काय बी लागंना पळीला! "
" अगं,नीट बघ..असंल अजून! " तुकारामाने ओढ खाल्ली.
" आवं मामी...भगुलं कुठं?...तुमी हुडकताय कुठं? "
" काय सुधरंना झालंय बघा..." असे म्हणत शांता अजूनच हसू लागली.
" जावाय पावनं,तुमाला काय हुतंय का?" हसतच शांताने जावयाला विचारले.
" न्हाय..तुमाला काय हुतै काय? "
" व्हय वं...येड्यासारखंच व्हाय लागलंय..कोंबडी रोगाटल्या फिगाटल्याली हुती गा काय म्हाईत? " शांताबाईने असे म्हणताच तुकारामाने ही तिचीच री ओढली,
" बायली..मला बी कसंतरीच हुतंया.कोंबडी भौदा रोगाटल्यालीच असावी."
" जावायपावनं..मला तर बया कायच कळंना झालंया...पयलं दवाखाना गाठाय लागतूय..."
" मामी,काय होत न्हाय तुमाला..उगंच काय बी मनात आणू नगा.."
" पावनं,जरा रस्सा वता ह्यात..खाव खावच सुटलीय बघा " ताट पुढे करत तुकाराम वदला.
या दोघांची गंमत बघून परशाला हसावे की रडावे हेच कळेना.
तिघेही खा...खा...खात होते.शांताबाईच्या व तुकारामाच्या पोटात एकच घास जात होता आणि दोन तीन घास अंगावरच सांडत होते.परशा मात्र सवयीने भरपेट जेवला.
खाता-खाताच शांताबाई भरल्या ताटावरच मुरगाळली. तुकारामाची गतही यापेक्षा वेगळी नव्हती.तो ही बिचारा दोन-तीनदा कसाबसा सावरला.मात्र चौथ्या वेळी कलंडला तो कलंडलाच.
हे दोघे ढेर झाले तरी परशाचे चापणे अजून चालूच होते.एवढ्यात शेजारचा सोम्या दारातून हळूच डोकावून गेला.पाहुणा मटण वरपतोय आणि आपले शेजारी ताटावरच कोलमडलेत हे बघून त्याला वेगळाच संशय आला.
"आवो...पळाss..पळाsss...पावन्यानं तुकानानाला आन् नानीला इख घातलं..." अशी बोंब ठोकत सोम्या गावभर फिरला.गावच्या गाव तुकारामच्या घरी गोळा झाले.बघतात तर काय-तुकाराम आणि शांताबाई ताटावरच कोलमडून पडलेत आणि जावई अजून रस्साच वरपतोय...
गावात पुढारपण करणारा शिवा गर्दीला हटवत पुढे सरसावला आणि त्याने दरडावत परशाला विचारले,
" पावनं...काय घातलं यांच्या जेवणात? "
हा प्रश्न कानी पडेपर्यंत आपल्या पाठीमागे काय चाललेय याची परशाला शुद्ध नव्हती.या अवचित प्रश्नाने तो एकदम दचकलाच.त्याने मागे वळून पाहिले तर दारात ही....गर्दी!आता मात्र परशाची बोबडीच वळली.खरे सांगावे तर आपण या गावात एकलेच...श्यामलीपण सोबत नाही.यांना काय सांगावे?
आणि झटक्यात तो बोलून गेला,
" मी कशाला काय घालतूय?...रोगाट कोंबडी जावयाला खाऊ घालायची हीच का तुमच्या गावाची रीत?"
" रोगाट कोंबडी?"
" व्हय..व्हय,रोगाटच हुती म्हण?"
कोंबडी रोगाट होती म्हणल्यावर तुकाराम,शांताबाई गचकणार की काय या धास्तीने गाववाल्यांना भेदरे सुटल्यासारखे झाले.त्यांची बुद्धी कामच देईना.तरीही कोणतरी सावध होत म्हणाले,
" आरं,कोणतर जीपगाडी बोलवा आन् एकजण बाभळगावला जाऊन त्या श्यामलाला घिऊन या...हाला पटपट."
" कशाला जीपगाडी?काय सुदीक होत न्हाय त्यास्नी." श्यामलीला घेऊन या म्हटल्यानंतर परशाला जरा धीर आला.तरीही शिवा चवताळून म्हणाला,
" काय पावनं?..कशी पडल्याती बगताय न्हवं?"
आता मात्र गावाचा पारा चांगलाच चढला होता.प्रत्येकजण परशाला आडून आडून दोष देऊ लागले.कोण उगाचच वचावचा करु लागले.पुढच्याला मागे रेटून जो तो स्वत:ला पुढे पोचवायचा प्रयत्न करत होता.
एवढ्यात जीप येऊन थांबली.नंतर पाचच मिनिटात श्यामली येऊन धडकली.आई-बापाची ती अवस्था बघून श्यामलीने हंबरडा फोडला.तिला वाटले नाना-नानी गेलेच.
" ए श्यामले,चल जीपमधी बस..दवाखाना जवळ कराय लागतूय !"
" आवं शिवामामा..काय झालं नाना-नानीला?"
" काय न्हाय,जावाय आला म्हणून कोंबडी कापली हुती..पावणा तर म्हणतूय कोंबडी रोगाट हुती." शिवाने खुलासा केला.
श्यामलीने चौफेर नजर टाकून परशाला शोधले.श्यामलीची नजर परश्यावर पडताच परशाने नकारार्थी मान हलवली.तो ठीकठाक पाहून श्यामलीच्या जीवात जीव आला.तिने लगबगीने परशाला गाठले.
" काय चारलं वं माझ्या आय-बाला?"
" मी कशाला काय चारतूय त्येनला?त्येंनीच मला रोगाटलेली कोंबडी चारली.."
"कोंबडी कुणी कुणी खाल्ली?"
"तिघांनींबी खाल्ली.."
आता मात्र गावाची ट्यूब पेटली.इतका वेळ हे कुणाच्याच लक्षात आले नव्हते.जर तिघांनीही कोंबडी खाल्ली तर मग तिघेही असे कोलमडून पडायला हवे होते.पण परशा तर एकदम ठीक दिसत होता.नेमकी काय भानगड आहे हे गावाला समजेना.
आपला नवरा तीच कोंबडी खाऊन ही ठणठणीत आहे म्हणजे कोंबडी चांगलीच होती,रोगाट नव्हती.मग आपल्या नवऱ्याने तर काही काळाबाजार केला नसेल?श्यामलीच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.पण त्याने तर आधीच काय नाही म्हणून मान हलवलीय.पण परशा कधी काय करेल हे तिला चांगलेच माहित होते.आणि त्याच्याकडून कसे वदवून घ्यायचे हे ही तिला चांगलेच माहित होते.
" माझ्या शपथ सांगा...काय टाकलं मटणात?"
श्यामली सावरायला आहे म्हटल्यावर आता खरे सांगायला हरकत नाही असा विचार करुन परशा म्हणाला,
" काय न्हाय गं...थोडी गंमत केली.सासूबाय म्हणत होती-माझ्या हाताला चवच लय भारी.जवा यील तवा मलाच ह्यो मटणाचा ऊठाठिवा कराय लागतुय...पावणा माणूस मी अन् मलाच काम लावत्याती.म्हणून उगं मुठभर गांजा टाकला हुता बारीक करुन रस्स्यात."
परशापुढे हसावे की रडावे हे श्यामलीला अन् गावालाही कळेना.आता गाव तुकारामाच्या व शांताबाईच्या विचित्र हातवाऱ्याकडे पोट धरुन हसत हसत पाहत होते.
" बायली,हेरुन जावाई काढलाय बघा..." असे शिवा म्हणाला आणि श्यामलीसकट सगळे गाव पुन्हा एकदा हास्यात बुडाले.
असा सटकी असूनही परशा बाभळगावात चांगला माणूस म्हणूनच ओळखला जात होता.कारण आजपर्यंत तरी त्याची गावात अजून ' सटकली ' नव्हती.त्याचे किस्से गावाच्या कानावर आले होते.मात्र या किस्स्यांचे गावाला कौतुकच वाटत होते आणि गाव हे सारे गंमतीनेच घेत होता.परशाला तसे कोणतेही व्यसन नव्हते तरीही त्याने काहीही करायचे सोडले नव्हते.सगळ्यातच तो रंगलेला असला तरी पूर्णपणे त्यातच बुडालेला नव्हता.एरवी आपण भले नि आपली मजूरी भली असाच वागायचा.त्यामुळे त्याचा श्यामलीला काही त्रास नव्हता.
शेजारच्या गावच्या-आढावच्या-यात्रेत कधी नव्हे तो तमाशा आला,तोही बारकाबायचा...परशा तर चेकाळूनच गेला.कधी एकदा जातो आणि चिकन्या चिकन्या पोरी बघतो असे त्याला झाले होते.तमाशा रात्री नवाला,पण हा गडी सकाळच्या नऊपासूनच घोड्यावर बसलेला.
" आज काय भानगडच कळंनाय म्हाराजांची?" न राहवून श्यामलीनं परशाला विचारलंच.
" हटकलंच का? तरी म्हणलं अजून कुणी कशी काय टांग आडवी घातली न्हाय?"
" आता बरं लढाई करायला निगालाय धनी माझा?..म्हणं हटकन घातलीच का?"
" आगं, नाद असतो एकेकाचा...असं भस्सदशी पचकुनी मधीच."
" बरं...बरं,काय बेत हाय मग?"
" काय न्हाय गं,आढव्याला तमाशा हाय राती!"
" आगं बया,तरी म्हणलं एवढं चेकाळलंया का कोकरु सकाळधरनं?"
"......." परशा गालातल्या गालात हसला.
" इचकाट पाचकाट बोलणं ऐकायला लय गम्मत वाटत असंल न्हवं?"
" छ्या:छ्या:...आपुन कान बंद करुन फकस्त डोळ्यांनी बघत असतू तमाशा."
" त्या टिंगाण्या पैशासाठी कंबरा हलवत्यात्या...तुमी कशापाय रातभर डोळं फोडत बसताय? उद्या कामावर कोण जायाचं?"
" ह्यासाठी या बायला काय सांगुनि वाटतं...तिसऱ्याच फानगाड्या फोडत बसती."
" बरं बाबा...राह्यलं!"
परशाला हिरवा सिग्नल मिळाला आणि परशा खुष झाला.
गरमागरम जेवणावर आडवा हात मारुन रात्री जायची सांगड घालण्यासाठी शीळ घालतच परशा गावात आला.टवाळटोळके त्याची वाटच पाहत होते.
" परशा,भाकरी बांधून आणल्या न्हायत्या आज?आन् कापडं बी तरावटच हायती की..कामाला दांडी म्हण की आज?" आल्या आल्या रम्याने विचारले.
" काम? याड फीड लागलं का तुला? आज सासरवाडीची जत्रा हाय.."
" मग काय,जावायाची हवाच असंल?" संभ्याने टोमणा हाणलाच.
" तू जत्रंला जायाचा म्हणल्यावर गड्या आमी सरगम थेटर गाठतू..तेवढाच टाईमपास." विन्याने तिसरेच खुळ काढले.
" कोणता पिच्चर रं?"
" घरवाली...भाईरवाली!"
" भंकस..बंडलाय पिच्चर.त्यापेक्षा माझ्यासंगट चला,फस्स्क्लास तमाशा दावतू." परशा असे म्हणताच,
" तमाशा?" म्हणत सर्वजण उठून उभे राहिले.
"व्हय..व्हय..तमाशा.तो सुदीक बारकाबायचा तमाशा.लय चिकन्या चिकन्या पोरी हायत्या त्यात अन् अशा बारीक कंबर हलवत्या काय सांगू..भुरळं पडतं नुसतं बघूनच.मी बघितला हुता म्हागं एकदा."
चिकन्या चिकन्या पोरी म्हणल्यावर सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटले.ज्यांच्या मनात नव्हते त्यांच्याही मनात परशाने तमाशाचे खूळ भरले.दिवस मावळताना सगळ्यांनी गावात जमायचे आणि तिथून मिळून आढावला जायचे असे ठरवून परशा घरी परतला.
' जरा सरकून बसा की नीट..' ही फक्कड लावणी म्हणतच परशा घरात शिरला.श्यामली हरखून बघतच राहिली.परशाचे चलिंतर आज जरा वेगळेच दिसत होते तिला.पण बिचाऱ्याचा मूडहाफ करायला नको म्हणून ती गप्प राहिली.
दिवस मावळताच सर्वजण गोळा झाले आणि ही वावरजत्रा आढावच्या जत्रेत हजर झाली.पुढची जागा धरायसाठी गावाच्या आधीच ही मंडळी फतकल घालून स्टेजच्या समोर बसली.स्टेज तयार झालाच होता पण वाद्यवृंद,नाचणाऱ्या पोरी अजून तयार व्हायच्या होत्या.स्टेजच्या पाठीमागेच मंडपाचे कापड साईडने मारुन मेकअप करण्यासाठी आडोसा तयार केला होता.
परशाने थोडा वेळ बसून चाखाचोळा घेतला.थोडी चुळबूळ केली.
" बायली,अजून लयच टाईम हाय!मी जरा चकना घेऊन येतो.तवर माझ्या जागंला बसू दिव नका कुणाला." असे म्हणून परशा उठला.
तमाशा सुरु झाला...चिकन्या चिकन्या पोरी नाचूनही गेल्या...शेवटी तमाशा संपलाही!पण परशा काय चकना घेऊन आला नाही.बहुतेक 'सटकला' असावा गावाकडे म्हणून सगळी मित्रमंडळीही रिटन गावाकडे निघाली.ते गावाबाहेर पडतात न पडतात तोच धावत-पळत,धापा टाकत परशा आला.
" आयला...लाजा बिजा बऱ्या वाटत न्हायत्या?मला सोडून खुशाल निघालाय?"
" आमच्याच लाजा काढ...बिनलाज्या,तमाशा बघायचा सोडून सासरवाडीत खपला हुता की काय?काय डेंजर नाचल्या पोरी..." त्यातल्या एकजणाने उलटवार केला.
" आरं ती सोडा...तुमी वरनं-वरनं बघितल्या पोरी."
" आन् तू काय आत शिरला हुतास व्हय रं बेण्या?"
" न्हाय...न्हाय,मी पण वरनंच बघितल्या पोरी.पण तुमच्यासारखं न्हवं..."
" मग कशा रं?"
" मी त्यांना मेकप करताना न् साड्या नेसताना बघितलं?"
" काय सांगतुयास?सगळं बघितलंस?"
" व्हय ना..तीच तर गंमत हाय.तुमाला हुलकावणी दिऊन गेलो.म्हणलं,पोरी तर कशा हायत्या बघावं म्हणून जरा मागच्या बाजूला गेलो तर तिथल्या माणसानं कुत्र्यासारखं अंगावर भुकायला चालू केलं.आतनं एक-दोघींनी गावठी शिव्या पण दिल्या अंदाजेच."
" मग मतूर तुझी सटकलीच आसंल.." असे शिव्या म्हणताच सगळेच मनमुराद हसले.
"र्राईट शिव्या,सटकलीच म्हणतू तर..तिथनं तसाच एक येढा मारला पब्लिकला आन् हळूच जाऊन बसलो चिंचंच्या झाडावर.कुणी बघितलं पण न्हाय.वर चढल्या चढल्या आधी खिसा भरुन चिंचा काढल्या.आधी एक चिंच खाली फेकली.पोरी साड्या नेसायच्या सोडून चिंच घ्यायलाच धडपडाय लागल्या...थोडा टाईमानं पुन्ना एक-दोन टाकल्या.तवा तर लयच गंमत आली...चिंच घ्यायला ती लंबू पोरगी हुती बघ..हं ती झपकन् फुडं आली अन् लगानू,तुमाला सांगतु...ती फुडं आली आन् कुणाचा पाय पडला नेसत्या साडीवर काय म्हाईत?पोरगी फुडं आन् साडी म्हागं...!"
" लगा आमाला बी सांगायचं हुतं की..आमी पण आलू असतु चिचंवर."
" सगळा इन्ट्रेस गेला बघ तमाशातला."
" मग काय तर!"
" बरं, चला आता घरी.फुडच्या वरषी परशाच्या आधी आपुन बसू जाऊन चिंचंवर."
" चला..."
सर्वांनी गाव जवळ केले पण प्रत्येकाच्या मनात एक सल राहून राहून सलतच होती-परशासारखा तमाशा आपल्याला काय बघायला मिळाला नाही याची!
परशाने मात्र तो प्रसंग डोळ्यापुढे पुन्हा पुन्हा घोळवत आधी घर आणि नंतर श्यामलीला जवळ केले.
या खुशीतच दुसऱ्या दिवशी सांग्रसंगीत पार्टीचा बेत ठरला.तो ही परशाच्या बोकांडी.चार-पाच टाळकी तयारच होती.एवढ्या जणांचे बिल भरणे म्हणजे जरा जडच होते.पण परशा डगमगणाऱ्यातला नव्हता.
साधारण संध्याकाळच्या सातच्या सुमारास हे टोळके अण्णाच्या ढाब्यावर हजर झाले.
तमाशातल्या पोरींचे किस्से ऐकत ऐकत देशी-विदेशी आत ढकलली जाऊ लागली.परशाने आज ठरवुनच देशी ब्रँड घेतला होता.
" ये हुबलाक...आज खर्च तुझा म्हणून देशी घेतली व्हय रं?" रम्याने परशाला टोकले.
" ए तसं काय न्हायी लगानू,पण आज जरा देशीच घ्यावी म्हणलं म्हंजे झटकन भिनतंय.रातचं पाखरू काय केल्यानं डोळ्याम्होरनं जाईना."
" बरं बाबा...तुझं कसं असंल तसं.." आणि सर्वांनी एकमेकांना 'चेस' केले.
अर्धा-अर्धा पेग रिचवताच परशाची सुत्रे हलू लागली.हळूच त्याने पिल्लू सोडले,
" दोन कोऱ्याच हाणायच्या...एका दमात!"
" काय शर्यत?" रम्याने झटक्यात विचारले.
" पाच-पासे रुपय..आन् जर हारला तर डबल द्यायचे.कबूल?"
शर्यत लावली परशाने.मात्र परशा यात जास्त नादीक नाही हे सर्वांना माहित होते.काल एकट्यानेच चिंचेचे झाड गाठले.शिवाय इतरांच्या पार्टीत फुकट म्हणल्यावर भारीतली पेणारा परशा आज स्वत:वर पार्टी बसताच देशी प्यायला म्हणून रम्याचे टाळके भडकले होते.आज परशाला लोळवुयाच असा विचार करुन रम्याने डाव उलटा टाकला.
" परशा,तू तीन कोऱ्या हाणायच्या...मी पाचशे बी देतू आन् आजचा खर्च बी भरतू."
" मी आधी लावलीय शर्यत."
" आरं पण मी रेट वाढवलाय न्हवं शर्यतीचा?"
" हां, बराबर हाय रम्याचे." संभ्याने मध्येच फुणगी टाकली.
" हं...मी कोऱ्या पिऊन मरतु आन् तुमी हाणा मज्जा.व्वा गुरु!" सावज टप्प्यात आलेले दिसताच परशाने जरा आढेवेढे घेतले.तर सगळ्यांच्याच मनात कालची खुन्नस डचत होती.त्यांनी परशाला टोच्या मारायला सुरुवात केली.
" दम लागतू त्यला बी..तीन बिनपाण्याच्या वडायला."
" गड्यानंच करु जाणं ही काम."
" हारला म्हणून कबुल कर की!"
" तुमची दारु दीड-दमडीची.माझा जीव वर आला न्हाय," परशाने पुन्हा आढेवेढे घेतले.
" परशा,हुन हुन काय हुणाराय? उद्या सलाईन लावाय लागंल एवढंच न्हवं?पण हारायची नामुक्षा नगं बाबा.." सच्याने परशाला भरीस घातले.
" हां,पैशाची चिंता करु नगं...दवाखान्याचा खर्च मी करीन.पण एका अटीवर.." संभ्या आता फुल्ल जोमाने शर्यतीत उतरला.
" कोणत्या अटीवर?"
".........." - आणि शर्यत ठरली.
परशा उठून जरा बाहेरुन जावून लगेच आत आला.
" हं..टाकी मोकळी करुन आलो.मागवा आता.ए समाss हिकडं यी बाबा."
' आलो..आलो ' म्हणत समाधान वेटर टेबलला आला.
" ह्येंचा ह्येंचा ब्रँड हाफ-हाफ आन् माझा फुल्ल आण.लगीच जेवण बी लाव."
समा धावतच गेला आणि ज्याचे त्याचे ब्रँड घेऊन आला.प्रत्येकाच्या ग्लासमध्ये नायण्टी-नायण्टी ओतली.परशाच्या ग्लासमध्ये फुल्ल क्वाटर रिकामी केली.
" आन् ह्ये बघ वेटर,लगेच दुसऱ्या दोन फुल्ल क्वाटर घेऊन यी.परशाचा ब्रँड ," रम्याने अॉर्डर सोडली.
" बर" म्हणत समा निघून गेला.
सगळ्यांनी आधी आपापले पेग संपवले आणि परशाकडे लक्ष ठेवू लागले-खाली ओततो की काय म्हणून.पण परशाने ग्लास जो तोंडाला लावला तो संपेपर्यंत काढलाच नाही.हे बघून रम्याचे धाबे दणाणले.
" आयला परशा,सगळं बिल माझ्या बोकांडी बसवायचा इचार हाय का काय?"
एवढ्यात जेवण आले.सर्वजण जेवणावर तुटून पडले पण रम्याच्या नरड्याखाली घास उतरता उतरत नव्हता.जर परशाने शर्यत जिंकली तर? या एकाच प्रश्नाने त्याची पाचावर धारण बसली होती.तोवर समा दोन क्वाटर घेऊन आलाच.
" वत रं त्या दोनी बी एकदाच ग्लासात..अन् वढ परशा एका दमात!" जरा अडचणीत टाकत रम्या म्हणाला.
पण परशा....परशा होता.पार्टीला येतानाच तो ठरवून आला होता.काहीही झाले तरी आपल्यावरची ही ब्याद कुणावर तरी ढकलून मोकळे व्हायचे.म्हणून तर त्याने हे शर्यतीचे खूळ काढले होते.
मघाशी लघुशंकेच्या निमित्ताने बाहेर गेलेल्या परशाने आधी तिथला वेटर समाधानची गाठ घेतली होती.
" ह्ये बघ समा,तुला शंभर रुपय देतू पण आपलं काम हाण गड्या.."
" बोल की परसराम.."
" शर्यत लागलीय रं,तीन क्वाटर कोऱ्या वढायची...टाईम कमी हाय.माझ्या क्वाटरच्या बाटलीत फक्त थर्टीच दारु अन् बाकीचं पाणी वतून आणायचं.कुणाला संशय येऊ नी म्हणून पॅक फोडल्यासारखे कर.थर्टी-थर्टी-थर्टी मिळून नायण्टी हुतीया.नायण्टी तू मार आन् उरलेल्या दोन उद्या माझ्याकडे दी.कुठं ठिवायच्या त्ये तुझी तू ठरव."
" परसरामा,दुसऱ्याच्या घरावर टेंभा ठिवायला वस्ताद हाय गड्या तू!"
" आरं पण तुला हिरवी पत्ती न् नायण्टी मिळतीय न्हवं?"
" व्हय, आलं ध्येनात.पण ह्ये आपल्या दोघातच राहू दे बाबा.न्हायतर ही बेणी मला फोडून काढत्याली."
" दोस्ता,त्ये सांगाय लागतंय व्हय मला?"
अशी सगळी बैजवार व्यवस्था लावूनच परशा टेबलला येऊन बसला होता.
आता दोन्ही एकदमच ओतल्या तरी परशाला तेवढे जड जाणार नव्हते.समाधाननेही दात-ओठ खात बुचे खोलली आणि दोन्ही बाटल्या ग्लासात रिकाम्या केल्या.
परशा आता पिणार की ओतून देणार यावर रम्या लक्ष ठेऊनच होता.संभ्याचीही नाडी ढिली होऊ लागली होती.जर हे बेणं पूर्ण पेलं तर ? तर लोळतंयाच...मग उद्या दवाखाना..ती शर्यतीतली पून्हा शर्यत..संभ्याच्या डोळ्यापुढे उद्याचे चित्र उभे राहु लागले.
परशाने ग्लास उचलला.तोंडाला लावला आणि एका दमात संपवलाही.थोड्याच वेळात परशा झोकांड्या खायला लागला.सगळे बिल तर रम्याच्या बोकांडी बसलेच होते.आता डुलत डुलत कचकाटून जेवायचे आणि मध्ये मध्ये थोडे इकडे तिकडे कलंडायचे असा परशाने बेत आखला.
इतर दोघे-तिघेही धुंदीत जेवणावर आडवा-तिडवा हाथ मारत होते.पण रम्याची आणि संभ्याची जेवणावरची वासनाच उडून गेली होती.त्या टेंशनमध्ये त्यांनी अजून नायण्टी-नायण्टी ढकलली.
पोटभर जेवण झाल्यावर परशा उठायला गेला आणि पडता पडता वाचला.
काही कारण नसताना बारा-तेराशेचा गंडा बसल्याने रम्याचा चेहरा सुतकी दिसत होता.तर पुढच्या शर्यतीच्या धसक्याने संभ्या गांगरुन गेला होता.आता परशाला घरी पोचवायचा कुणी?हा प्रश्न त्यांना जास्तच सतावू लागला.शेवटी परशाची करणी परशावरच ढकलून आपली सुटका करुन घ्यायची असे ठरवून सर्वजण परशाच्या घराकडे चालते झाले.
जसजसे घर जवळ येत चालले तशी परशाला जास्तच चढू लागली.तो आधीच दोघांच्या खांद्याचा आधार घेऊन कसाबसा चालत होता.आता तर पाय खरडतच चालू लागला.
घर आले.
" वैनी...आवो वैनी,दार उघडा."
श्यामली परशाची वाटच बघत थांबली होती.रम्याचा आवाज तिने ओळखला होता पण खात्री करुन घेण्यासाठी तिने विचारले,
" कोण-कोण हाय?"
" मी, परशा,संभा,सच्या मस पा-सा जण हाय.परशा आज नगं म्हणताना बी लय पेलाय बघा."
श्यामलीने दार उघडले.बघते तर परशा ओट्यावर खुडूक होऊन पडलेला.आधी परशावर फायरिंग करुन तिने त्या टापूला टारगेट केले.सारवासारव करत त्यांनी परशाला आत उचलून नेवून अंथरुणावर झोपवले आणि सर्वांनी तेथून काढता पाय घेतला.श्यामलीनेही दार लावून घेतले.तिच्या तोंडाचा पट्टा चालूच होता.ते ऐकून परशाला हसू आवरत नव्हते.
सगळे गेल्याची खात्री होताच परशा नीट ऊठून बसला.
" तू जेवली न्हायस अजूक?" -त्याने श्यामलीला विचारले.
" गिळलं मघाच...आज काय आंघूळच केली वाटतं दारुत?"
" न्हाय गं...बेणी माझ्यावर पार्टी बसवाय निघाली हुती.मी बी चांगलं हजार-दीड हजाराला झोपवलं त्यास्नी."
" म्हंजे?"
" म्हंजे...मी आंघूळ न्हाय केली दारुत...निस्ती चूळ भरली."
" मला काय कळंना.."
" काय न्हाय.शर्यत लावली हुती ती मी जिंकली."
" किती रुपयची?"
" पैशाची न्हवती..बिलाची हुती!"
" बरं..बरं!झोपा आता.कालचा दिवस तसाच गेला,आजचा दिवस असा..उद्या तर कामावर जायाचं चित हाय का न्हाय?"
" अं...न्हाय.उद्या सलाईन लावायला जायाचं हाय."
" कुणाला?"
" संभ्याला.."
" संभ्याला लावा न्हायतर रंभ्याला लावा...तमाशा,पार्टी ह्येजाशिवाय नाद न्हाय.परपंजाकडं तर काडीचं ध्यान न्हाय.उंद्याच्या उंद्या त्या कुबीर डाकटरकडं जाऊन आधी तुमाला सलाईन लावून घ्या!त्या किसना भावजींनी सलाईन लावून घेतल्यापस्नं त्येंची दारुच सुटली.काय इंजिक्शन का काय सोडत्याती म्हणं डाकटर सलाईनमधनं."
" बरं...बरं!"
" निस्तं बरं बरं म्हणून मान हलवू नगा...त्या किसनाभावजीला संगट घेऊन जावा उंद्या अन् सलाईन लावून घ्या.लय झालं गोडीत सांगून.आता जर न्हाय ऐकलं तर मी हितं राहणार न्हाय...शेवटचं सांगत्येय."
" अगं,व्हय म्हणलं गी..का लामण लावतियास?झोप आता.."
"न्हाय,तसा इस्वास न्हाय ठिवणार...माझी शपथ घ्या."
" अगं तुझ्याशपथ लावून येतो सलाईन.हवं तर वचन दितू..घी!"
" हं...झोपा आता."
आणि परशा उद्याचा बेत आखत झोपी गेला.
...........................
परशाचा नंबर आला तसा परशा उठून डॉक्टरांच्या कन्सल्टींग रुममध्ये गेला.किसनाला त्याने बाहेरच थोपवले होते.
" हं..झोपा!"
परशा टेबलावर जाऊन झोपला.
" हं..बोला,काय होतंय?"
" अं..सलाईन लावायचीय."
" डॉक्टर कोण आहे?तुम्ही की मी?" डॉक्टरांनी हसत हसत विचारले.
" तुमीच की..म्हणून तर आलूय तुमच्याकडं."
" मग सांगा..काय होतंय?"
" लय अवघड जागचं दुखणं हाय बघा."
" असु द्या कितीही अवघड जागचं...मला सांगा."
" न्हवं ,तसं तर तीस रुपयची नायण्टी वढली तर उतारा बी हूतूया आन् हातापायाची थरथर बी थांबतिया..."
आता मात्र डॉक्टरांचा पारा चढला.
" इथं कशाला आलात मग?"
" त्येच तर अवघड जागचं दुखणं हाय.."
" नीट समजेल असं सांगा ..नाहीतर.."
" त्याचं काय हाय डाकटरसायेब,माझी मालकीण श्यामलीनं राती माझ्याकडनं वचन घेतलंया-दारु सोडायचं.आन् तिनं मला तुमच्याकडं धाडलंया.तुमी आमच्या त्या किसन्याला सलाईनमधनं दारु सोडायचं इंजिक्शन दिलं हुतं म्हणं."
" हं..मग?"
" मला बी दारु सोडायची हाय पण सलाईन म्हणलं की अंगावर काटा येतुया."
" त्यात घाबरण्यासारखं काय आहे? शुद्ध पाणीच असते ते."
" आवो माझा प्राबलम जरा येगळाच हाय.सलाईन लावली की धा-पंधरा मिनटाला इंट्रोलला जाया लागतंय मला."
" त्यात काय एवढं..सोडेन मी...पण तुम्हाला नक्की दारु सोडायची आहे ना?"
" ह्ये काय इचारणं झालं व्हय डाकटरसायेब?...हिकडची दुनया तिकडं हुईल पण श्यामलीला आजपतुर दिल्यालं एक बी वचन मी मोडलं न्हाय...हां,एकांद्या टायमाला थोडं हिकडं-तिकडं हुईल पण वचन म्हंजी वचन!"
" छान...चला,आत बेडवर."
" चला." म्हणत परशा बेडकडे गेला.आत पेशंटची भलतीच गर्दी होती.ही गर्दी बघून आपला प्लॅन आपल्याच अंगलोट तर येणार नाही ना?अशी परशाला काळजी वाटू लागली.
थोड्या वेळातच तिथला एक कॉट रिकामा झाला आणि डॉक्टरांनी परशाला 'सलाईन'वर ठेवले.किसना देखरेख करायला थांबला.वीस मिनिटातच सलाईनने रंग दाखवायला सुरुवात केली.
" डाकटर...इंट्रोलss!" परशा गरजला.
डॉक्टर कन्सल्टींग रुममध्ये पेशंट तपासत होते.पेशंटला तसेच ठेऊन डॉक्टर आले.परशाची सलाईन बंद करुन त्याला मोकळे केले.परशा बाहेर जाऊन पाचच मिनिटात परत आला.पुन्हा एकदा हातातले पेशंट सोडून डॉक्टर सलाईन सुरु करायला आले.सलाईन लावून तास-तास होत आला तरी इतर पेशंट 'इंट्रोल'चे नाव काढत नव्हते.
"डाकटर...इंजिक्शन कधी?"
" एवढी सलाईन संपू द्या...दुसऱ्या सलाईनमध्ये टाकू."
" बर."
जसजसे सलाईनचे पाणी शरीरात वाढू लागले तसतसा परशाचा इंट्रोलचा टायमिंग चौथ्या खेपेपर्यंत वीस मिनिटावरुन दहा मिनिटावर आला.आणि इंट्रोलचा बाहेरचा टाईमही पाच मिनिटावरुन दहा मिनिटावर गेला.प्रत्येक वेळी हातातले पेशंट सोडून सलाईन चालू-बंद करायला हेलपाटे मारुनच डॉ.कुबेर जेरीला आले.तर ज्या ज्या वेळी परशा बाहेरून आत यायचा त्या त्या वेळी किसना काहीतरी बहाण्याने परशाच्या तोंडाजवळ जायचा आणि खात्री करुन घ्यायचा.बेणं कधी पिऊन येईल सांगता यायचं नाही असे किसनाला वाटत होते.पण अजून तरी तसे काही घडले नव्हते.म्हणजे परशाला मनापासून दारु सोडायची आहे असा ठाम विश्वास किसनाला वाटला आणि तो निर्धास्त झाला.
पाच -दहा मिनिटे झाली की परशाची 'इंट्रोल' हाक ऐकून डॉक्टरांच्या सहनशीलतेचा अंत हळूहळू जवळ जवळ येत होता.पण आता नाईलाज होता.
परशाने सुरुवातीपासूनच प्लॅन सुरु ठेवला होता पण मध्येच त्याचे मन हेलकावे खात होते.श्यामलीला वचन तर दिले होते पण आजच्या दिवस थोडी ढकलली तर कुठे बिघडतेय?असे एक मन म्हणत होते तर दुसरे मन वचन मोडू नको म्हणून सांगत होते.अजून दारु सोडण्याचे इंजेक्शन सलाईनमध्ये सोडले नव्हते.म्हणजे प्यायला हरकत नव्हती.शेवटी ह्या निर्णयापर्यंत येऊन त्याचा आवाज बाहेर पडला,
" डाकटर...इंट्रोलss!"
आतापर्यंत अर्धी बाटलीही सलाईन संपली नव्हती आणि एवढ्या वेळात ही सहावी हाक ऐकून डॉक्टरांची शीर तटतटून फुगली.तरीही ते आले आणि परशाला मोकळे केले.
इकडे अण्णाच्या ढाब्यावर संभ्या गेल्या दीड तासापासुन परशाची वाट पाहत होता.'डॉक्टरांना सलाईनवर ठेवणारा पेशंट अजून जन्मायचा आहे' हे डॉ.कुबेरांचे वाक्य आणि त्यावर लागलेली पैज संभ्याच्या मनात फेर धरुन नाचत होती.
तसे तर डॉ.कुबेर संभ्याचे फॅमिली डॉक्टर होते.पण घसट मित्राएवढीच होती.असेच एकदा बोलता बोलता विषय निघाला.
" डाक्टर,काय काय पेशंट लय तरास देत असतील न्हवं?"
" हो,असतो एखादा पेशंट असा...पण न रागवता त्याला सहन करावे लागते.पेशंटला रागावून कसे चालेल?"
" हं..त्ये बी बराबर हाय.पण एखाद्यानं लयच तरास दिला तर तुमालाच सलाईन लावून घ्यायची येळ येत असंल." संभा हसत हसत म्हणाला.
" संभा,ती तर मग आमच्या पेशाची हारच मानावी लागेल.कारण पेशंटमुळे डॉक्टरांना सलाईन लावून घ्यावी लागली असे कधी ऐकलेय का तू?"
" न्हाय...पण मला आपलं तसं वाटलं."
" तुला काहीही वाटेल पण डॉक्टरांना सलाईनवर ठेवणारा पेशंट अजून जन्मायचा आहे.एवढेच काय, पेशंटसमोर असा नुसता विचार बोलून दाखविण्याची डॉक्टरांवर वेळ आणणारा पेशंटही अजून जन्मायचा आहे.कारण डॉक्टर डॉक्टर असतो आणि पेशंट पेशंट असतो."
" समजा,मी असा इरसाल पेशंट आणला तर?"
" मी वठणीवर आणेन माझ्या पद्धतीने."
" हरचाल?"
" मी ?"
" हं!"
" शक्यच नाही."
" लावा पैज."
" हं,लावली असती पैजही..पण एखाद्याला मुद्दाम पढवून आणशिल तू मला त्रास द्यायला."
" डाक्टर,पैज ही पैजंसारखीच जिंकावी माणसानं...त्या पेशंटलाही समजणार न्हाय की मी त्येला म्हवरा केलंय ते.मग तर झालं?"
" बघूयाच एकदा..असा इरसाल पेशंट कोण आहे ते." डॉ.कुबेरही हट्टाला पेटले.
" लागली मग...पाच-पाच हजाराची!"
" हं,लागली."
" पण ह्याकरता किती टाईम जाईल सांगता यायचं न्हाय बरं का डाक्टर...सगळा योग जुळून यावा लागंल."
" चालेल."
आणि आज दोन वर्षांनी तो योग जुळून आला होता.
परशाची वाट पाहुन पाहुन संभ्याला कंटाळा आला होता.त्यापेक्षा टेंशनच जास्ती आले होते.कारण दवाखान्यात अडमीट असतानाही पेशंट दारु पिला तरच डॉ.कुबेर वैतागणार होते.या वैतागातच त्यांच्याकडून आपल्याला पैज जिंकण्यासाठी जे हवे आहे ते मिळणार होते.पूर्ण खात्री नसली तरी असे घडण्याची अंधुकशी आशा संभाला दिसत होती.म्हणून तर रात्री टेबलला सलाईनचा विषय निघताच संभाने संधी हेरली होती व परशाला मोहरा बनविण्याचे ठरवले होते.
जर परशा आला नाही तर परशाकडून फक्त एक जेवण मिळणार होते आणि सलाईनचा शे-पाचशे खर्च वाचणार होता.मात्र परशा आलाच तर जेवणाचा व सलाईनचा खर्च बोकांडी बसणार होता.पण मनासारखे घडले तर डॉ.कुबेरांकडून पाच हजार मिळणार होते.एकूण परशाचे येणेच फायद्याचे ठरणार होते म्हणून संभ्या त्याची पाखरासारखी वाट बघत होता.
पण परशा अजूनही आला नव्हता.दोन वर्षांनी चालून आलेली संधी हुकते की काय? असे वाटत असतानाच परशा दत्त म्हणून अण्णाच्या ढाब्यावर हजर झाला.शर्यत जिंकल्याचा आनंद परशाच्या चेहऱ्यावरुन ओसंडून वाहत होता.पण शर्यत हरुनही संभ्याच्या चेहऱ्यावर टवटवी कशी काय शिल्लक? याचे उत्तर मात्र परशाला समजत नव्हते.
आल्या आल्या परशाने व संभ्याने मिळून अर्धी-अर्धी घेतली.अर्धी सलाईन व अर्धी मदिरा पोटात गेल्याने परशा जास्तच खुलून आला.घाई-गडबड करुन तो बाराव्या मिनिटाला कॉटवर येऊन पसरला.आता मात्र किसनाने परशाला चेक केले नाही.
लगेच डॉक्टर ही आले.
" काय राव माणूस तुम्ही?मी इतर पेशंट बघू की तुमच्याकडेच हेलपाटे मारत बसू?"
" काय झालं डाकटरसायेब?" किसनाने विचारले.
" अहो,असला पेशंट मी आयुष्यात बघितला नाही.दोन तास होत आले सलाईन लावून आणि माझे बारा-पंधरा हेलपाटे झाले.पण सलाईन संपतेय फक्त दोनशे मिली?अशाने अख्खा दिवस लागेल सलाईन संपायला."
" मग फास्ट सोडा सलाईन." किसनानेच सल्ला दिला कारण डॉक्टरांना वास जाईल म्हणून परशाने तोंडच उघडले नाही.
" फास्ट सोडतो..पण तुम्ही जबाबदार राहणार आहात का?"
" काय हुतं डाकटर सलाईन फास्ट सोडल्यावर?"
" बी.पी. वाढतो...पेशंट दगावण्याची शक्यता असते."
डॉक्टर असे म्हणाले आणि घाबरुन परशाची वाचा उघडली,
" मग नगं वाढवायला सलाईन...आता न्हाय लागणार इंट्रोल."
" आँ? कशी काय?" डॉक्टरांनी आश्चर्याने विचारले.
" माझे काम झाले आता म्हणून.."
" कसले काम?"
" तुम्ही काय म्हणणार नसला तर सांगतु."
" आधीच काय कमी टेंशन दिलेय का तुम्ही?त्यात अजून एकाची भर पडली म्हणून काय बिघडणार नाही.सांगा लवकर."
" त्या उंडग्याने काय कारण नसताना शर्यत लावली हुती माझ्याबरोबर."
" कसली?"
" तुमच्या दवाखान्यात अडमीट असताना ढाब्यावर जाऊन दारु पिऊन दाखवायची शर्यत हुती."
" मग दारु सोडायची म्हणून बायकोला वचन दिले आणि तुम्ही आता शर्यत हरला असेच ना?"
" न्हाय डाक्टर..मी जिंकून आलोय?"
" काssय?" डॉ.कुबेर अक्षरश: किंचाळलेच.
" मुर्ख आहात का?तुमच्या शर्यतीसाठी मला किती हेलपाटे घालायला लावले? पाय गळून गेले माझे हेलपाटे घालूनच..." डॉ.कुबेर तावातावाने बोलत होते आणि एवढ्यात संभा पुढे आला.
" डाक्टर,घ्या मग सलाईन लावून तुमीच आता..."
आता मात्र डॉक्टरांच्या डोक्यात प्रकाश पडला.ते सावध झाले.त्यांचा राग कुठल्या कुठे पळून गेला आणि परशाकडे पाहुन ते संभाला म्हणाले,
" संभा,वैद्यकीय क्षेत्राचा आधार घेऊन मला माझा हेलपाट्याचा त्रास वाचवता आला असता.पण माझ्या पेशंटला विनाकारण जास्तीचा भुर्दंड सहन करावा लागला असता.तुला वाटत असेल तू पैज जिंकणे महत्त्वाचे आहे पण माझ्यासाठी माझी माणुसकी जिंकणे महत्त्वाचे आहे....एनी टाईम...कधीही."
" खराय डाकटरसायेब तुमचंच...आपली पैज एक टाईमपास हुता.पण आज खऱ्या आरथानं डाकटरांमधला माणूस आमाला दिसला." संभाने डॉ.कुबेरांशी हस्तांदोलन केले.
डॉक्टरांनाही आपल्या पेशाचा सार्थ अभिमान वाटला.
" आता एक करा डाकटरसायेब,परशाला दारु सोडण्याच्या इंजिक्शनाबराबर त्याच्या अधनंमधनं सटकायच्या सवयीवर बी एकांदं इंजिक्शन ठोका."
" हो,हो...काही तरी करावेच लागेल संभा...कारण पेशंट मात्र खरेच इरसाल आहे बाबा!" आणि ते खो खो हसत सुटले.
" डाकटरसायेब,मी थोडक्यात आवरलं.अजून ढीगानं आयडिया हुत्या माझ्याकडं...आपणास हतबल करण्याच्या! संभ्यानं मला म्हवरा बनवलंय ह्ये माझ्या ध्येनात रात्रीच आलं हुतं.कारण एकदा लय झाल्यावर तो मला बोलला हुता या पैजंबद्दल.एकांद्याचा कमीपणा करुन पैज जिंकणं माझ्या थेरीत बसत न्हाय.म्हणून तर तुम्हाला हारु दिलं न्हाय आन् संभाला जिंकू दिलं न्हाय.चेसमधले सगळेच म्हवरे बळी पडत नसत्यातं डाकटरसायेब.माझ्यासारखा एकांदा जिंकणाऱ्याची गोची करतुच..हरणाऱ्याला डाव पुढे खेळता येवा म्हणून."
एवढे धीरगंभीर लेक्चर दिल्यानंतर पुढे कोण काय बोलणार? संभाची तर वाचाच बसली.
फक्त डॉ.कुबेरांना या लेक्चरमधली गोम लक्षात आली.ते पुढे झाले....परशाची पाठ थोपटली आणि म्हणाले,
" यू आर ग्रेट,परसू...यू आर ग्रेट!!"
अनिल सा.राऊत
मोबा.नं.9890884228
Comments
Post a Comment