एक ओवाळणी-माझ्या `त्या' बहीणीसाठी...
बहीण-ज्यांना नाही त्यांनाच तिची उणीव जाणवते.ज्यांना असते त्यांनाही जाणवते पण ती सासरी गेल्यावर...!
आज रक्षाबंधन! बहीणीची आठवण तर येणारच...पण या पामराला तेवढेही सुख नाही.बहीण नसल्याची खंत मनात आहेच पण ज्यांनी ज्यांनी बहीणीचे प्रेम दिले त्यांची आज प्रकर्षाने आठवण येते आहे.त्यांची राखी आता पहिल्यासारखी येत नाही मात्र मी माझी ओवाळणी अशी शब्दरुपात पोहोच करतो आहे.
सन १९९८ चा तो काळ होता. मी नुकताच कविता लिहू लागलो होतो.ज्या काही चार-दोन कविता लिहील्या होत्या त्या जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या वर्तमानपत्राच्या कार्यालयात पोहोच करुन आलो होतो.आपलेही नाव पेपरात छापून येणार या आनंदाने गडी हवेतच तरंगत होता.पण कशाचे काय अन् फाटक्यात पाय....वर्तमानपत्राची दर रविवारची पुरवणी मला हळूहळू हवेतून जमिनीवर आणत होती.बघता बघता सहा महीने उलटले आणि एका रविवारी स्वारी कवितांसहीत पेपर आऊट झाली.
पहिली कविता छापून येण्याचा आनंद काय असतो ते वर्णन करुन सांगू शकत नाही.आनंदाने गगनाची शीव केव्हाच ओलांडली होती.एक अनिल आज `कवी अनिल' झाला होता. अशाच आनंदात पाच-सहा दिवस गेले.मग वाचकांची पत्रे यायला सुरुवात झाली.त्यात तिचेही पत्र होते. तिलाही कविता आवडल्या होत्या.कलाकारांची मुलींना नेहमीच भुरळ पडते.तशी तिलाही पडली. हळूहळू पत्रापत्री वाढत गेली आणि एक दिवस पत्रमैत्रीही झाली.एकमेकांच्या सुख-दु:खाची देवाण-घेवाण सुरु झाली.दोघांच्या मनात प्रेमाचा अंकुर फुटू पाहत होता किंवा नव्हता ते मलाही कळले नाही...तिलाही कळले नसावे.
श्रावणसरींची बरसात सुरूच होती.मनाची हिरवळ वाऱ्यावर हिंदोळे घेत होती.अशा बहारदार समयी तिचे पत्र आले-
`` आज मला आनंद होतोय की दु:ख....सांगू शकत नाही.पण अडचणच अशी आहे कि मी उचललेले पाऊल योग्यच असावे.माझे लग्न जमले आहे.आपला पत्रव्यवहार असाच सुरु रहावा म्हणून सोबत `राखी' पाठवतेय...स्वीकारायची किंवा नाही...आपल्या हातात.''
बस्स!
श्रावणातल्या ऊन-पावसाचा खेळ संपला होता.लख्ख प्रकाशात एक नवे नाते खुणावत होते.नवे नाते...जगातले सर्वात पवित्र नाते...जिथे पवित्रता ही पवित्र होते असे भावा-बहीणीचे नाते!
आजच्या या मासलेवाईक जमान्यात जिथे मैत्रीच्या नावाखाली शारिरीक चोचले पुरवले जातात तिथे माझ्या या नात्याचे महत्त्व आणखीनच वाढते.आजच्या जमान्यात या नात्याची `पोपट झाला रे' अशी असंस्कृत कुचेष्टा केली गेली असती.पण तो काळ वेगळा होता.उलट तिने मला तिचा रक्षणकर्ता `श्रीकृष्ण' ही पदवी बहाल केली होती.एका राखीच्या धाग्याची ही सारी किमया होती.
मी ही आनंदाने तिची `राखी' स्वीकारली आणि स्वीकारल्याचे तिला कळवले.मला एक बहीण मिळाली...तिला एक भाऊ मिळाला.पत्रव्यवहार सुरूच होता.तेव्हा मोबाइल नव्हते.पुढे पुढे बीएसएनएल आले.पण आमचा पत्रव्यवहार बरेच दिवस चालला.तिचे लग्न झाले...आनंद वाटला.लग्नानंतर मात्र पत्रव्यवहार बंद झाला.आणि एक दिवस अचानक तिचे पत्र आले.त्यात तिने तिच्या घरचा लँडलाईन नंबर दिला होता.दोन-चार वेळा फोनवर बोलणे ही झाले.बोलणे अघळपघळ नव्हतेच.बहीण-भावाच्या नात्याप्रमाणे जिव्हाळ्याचे नाते होते.पण तरीही एक दिवस तिच्या पतीने या पवित्र नात्याकडे संशयाने पाहिले....माझ्या आयुष्यातला तो दुर्देवी दिवस!
तेव्हापासून संपर्क बंद....!
माझ्यामुळे जर माझ्या बहिणीला त्रास होणार असेल तर आपण लांबच राहिलेले बरे असा विचार करुन माझी ती बहीण मी मनाच्या खोल गाभाऱ्यात ठेवून दिली.हळूहळू मनातली सल निघून गेली पण `राखी' मात्र तशीच शाबूत राहिली...अजूनही आहे!
पुढे दोन-तीन वर्षांनी अचानकपणे तिचे पत्र आले.पत्र पाहूनच मनाला समाधान वाटले होते.पण आत काय होते?ते पत्र नव्हतेच...ती तर तिची दुर्दैवी कर्मकहाणी होती.पत्र वाचताना अक्षरश: डोळे पाणावले.
लग्न होवून दोन-अडीच वर्षे झाली तरी तिला मूलबाळ होत नव्हते.म्हणून पती,सासू छळ करत होते.त्या जाचाला ती अक्षरश: कंटाळून गेली होती.पण नियतीला तिची कीव येत नव्हती.तिची कुस उजवत नव्हती.शेवटी जे व्हायचे तेच झाले.तिला माहेरची वाट दाखवली गेली.
नियतीचा खेळ नेहमीच विचित्र असतो.ती माहेरी आली...आणि दीड-दोन महिन्यात तिला जाणवले- ज्या गोष्टीसाठी तिने तीन वर्षे जाच सहन केला, ती गोष्ट नेमकी सासर सुटल्यानंतर संकट बनून पूढे आली.ती गर्भार होती.....
आनंद मानायचा की दुर्दैवाचा फेरा मानायचा? कारण पती आधीच संशयी.ती पूर्णत: चक्रव्यूहात अडकली होती.बाळ ठेवावे तर चारित्र्यावर शिंतोडे उडवले जाणार होते.अबॉर्शन करावे तर पुन्हा होईल की नाही याची शाश्वती नव्हती.आणि त्या न जन्मलेल्या जीवाचा यात काय दोष? जगरहाटीची शिक्षा त्याला काय म्हणून द्यायची?
अशा या भयंकर पेचात ती अडकली होती आणि या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचा मार्ग मी दाखवावा ही तिची इच्छा होती.तिची काहीच चूक नव्हती.फक्त नियतीच्या मनात वेगळेच काहीतरी शिजत होते.
माझ्यापरीने मी मार्ग दाखवण्याचा प्रयत्न केला. जी मुलगी लग्न जमताच मला राखी पाठवून पतीशी एकरूप होण्याचा मनोदय व्यक्त करते तिच्या चारित्र्यावर माझा पूर्ण विश्वास आहे...
यानंतर तिने काय निर्णय घेतला?कुठे आहे?कशीआहे?याची मला काहीच माहिती नाही.मी पत्रव्यवहार करु शकत नाही.तिनेही पुढे कधी पञ पाठवले नाही.
आज `रक्षाबंधन' आहे...तिच्या राखीची मी गेल्या कित्येक वर्षापासून वाट पाहतो आहे.सोबत तिचे एका ओळीचे पञही असावे.
पत्रात तिने लिहावे,``बंधूराया,आज मी खूप सुखात आहे...आज मी खूप सुखात आहे!"
अनिल सा.राऊत
9890884228
anandiprabhudas@gmail.com
Comments
Post a Comment