सावधान..! शिक्षणाच्या गंगेत राजकिय गटाराचे पाणी मिसळतेय!




नमस्कार माझा ह्या ज्ञान मंदिरा
सत्यम शिवम सुंदरा , सत्यम शिवम सुंदरा

शब्दरूप शक्ति दे , भावरूप भक्ती दे
प्रगतीचे पंख दे चिमणपाखरा , चिमणपाखरा
ज्ञान मंदिरा … 
सत्यम शिवम सुंदरा , सत्यम शिवम सुंदरा

विद्याधन दे आम्हांस एक छंद एक ध्यास
नाव नेई पैलतीरी दयासागरा, दयासागरा
ज्ञान मंदिरा …
सत्यम शिवम सुंदरा , सत्यम शिवम सुंदरा

होवु आम्ही नीतिमंत, कलागुणी बुद्धिमंत
कीर्तिचा कळस जाई उंच अंबरा, उंच अंबरा
ज्ञान मंदिरा …
सत्यम शिवम सुंदरा , सत्यम शिवम सुंदरा
       गीतकार जगदीश खेबुडकर यांची ही अजरामर प्रार्थना आपण ज्या शाळेत,ज्या ज्ञानमंदिरात म्हणतो त्या ज्ञानमंदिराचे पावित्र्यही सुसंस्काराने जपणे तेवढेच महत्त्वाचे आहे.जेव्हा याच ज्ञानमंदिरात मिळणाऱ्या शिक्षणाचा बाजार मांडला जातो तेव्हा साहजिकच नफ्या-तोट्याचे गणितही आपोआपच त्याबरोबर येते.आणि या गणिताबरोबर येते ती एकमेकांवर कुरघोडी करण्याची गलिच्छ स्पर्धा! स्पर्धा म्हटले कि दर्जातही वाढ होण्याची आवश्यकता असते,पण या शिक्षणाच्या बाजारात मात्र सगळी गंगा उलटी वाहते आहे.शिक्षणाचा दर्जा घसरला आणि डोनेशनमध्ये मात्र भरमसाठ वाढ झाली.याचाच अर्थ शिक्षणक्षेत्रात स्पर्धा आहे पण ती चांगले शिक्षण देण्यासाठी नव्हे तर भरभक्कम डोनेशन जमा करण्यासाठी आहे.

-:शिक्षण क्षेत्राची पार्श्वभूमी:-

अगदी ऋषिमुनींच्या कालखंडापासून शिक्षणाचा विचार करायचा झाल्यास ज्या त्या काळातील गरजेनुसार शिक्षण देण्याचा,त्या विद्येत पारंगत करण्याचा प्रयत्न केला जायचा.जोडीला सुसंस्कार आणि विद्वत्ता मिळावी म्हणून योग्य गुरुच्या आश्रमात,गुरुकुलात मुलांना ठेवण्याची सोय होती.ही गुरुकुल पद्धत आजही आपले थोडेबहुत अस्तित्व टिकवून आहे.पण सर्वधर्मसमभावाच्या आपल्या देशात ही गुरुकुले धार्मिक शाळा या प्रकारात मोडतात.त्यात तथ्य असेलही कारण पूर्वी एका ठराविक वर्गालाच या गुरुकुलात प्रवेश असायचा.त्यामुळे ती मुळे अजूनही तग धरुन आहेत.
        नंतर राजा-महाराजांच्या काळात लढाईला उपयोगी पडेल असे शिक्षण दिले जायचे.त्यानंतर इंग्रज राजवटीत खऱ्या अर्थाने जागतिक ज्ञान येण्यासाठी आवश्यक असणाऱ्या शिक्षणाचे बीज रोवले गेले.मात्र तिथेही भेदभाव होताच.सर्वसामान्य माणूस हा या प्रवाहापासून कोसो दूर होता.अर्थात तो जाणूनबुजून दूर ठेवला गेला होता.
      या प्रवाहापासून जो वर्ग दूर होता,तो अक्षरश: दारिद्र्याने पिचलेला होता.त्याची प्रगती तर होत नव्हतीच उलट तो अधिकाधिक पिचत होता,पिळला जात होता.याचे मुख्य कारण म्हणजे तो अज्ञानी,अडाणी होता.ही बाब जेव्हा त्याकाळच्या समाजसुधारकांच्या लक्षात आली तेव्हा त्यांनी या वर्गाला शिक्षीत करुन विचारांना दिशा देण्याचे प्रयत्न सुरु केले.थोडक्यात सांगायचे तर शिक्षणाची ही गंगा सर्व समाजघटकांसाठी वळवून आणली.तिथून पुढे ही गंगा प्रवाहीत करण्यासाठी अनेक थोर विभूतींनी जीवाचे अक्षरश: रान केले.शिक्षणाचे महत्त्व पटवून सांगण्यासाठी पायपीट केली.विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृहे उभारली आणि शिक्षणाला एक वेगळी ऊंची गाठून दिली.सर्वांनी शिकावे,सज्ञान व्हावे,सुशिक्षित व्हावे ही तळमळ या महान विभूतींच्या मनात होती.या शिक्षणाने पुढे भारत देशात काय क्रांती केली हे सर्वांना माहीतच आहे.

-:शिक्षकांची कृतार्थता:-

उद्याच्या भारतासाठी एक सक्षम पिढी मला घडवायची आहे.या चिखलाच्या गोळ्याला सुसंस्कारांचे पाणी शिंपडून ज्ञानाच्या स्पर्शाने योग्य आकार द्यायचा आहे.माझा विद्यार्थी एक जबाबदार नागरिक बनला पाहीजे.त्याने देशासाठी आपले योगदान दिले पाहिजे.माझ्या विद्यार्थ्याने माझे नाव सार्थ केले पाहिजे.हीच माझी गुरुदक्षिणा असेल.अशा ध्येयाने झपाटलेले ते शिक्षक...शाळेला इमारत आहे किंवा नाही,बसायला खुर्ची आहे किंवा नाही असले प्रश्न त्या शिक्षकांना कधीच पडायचे नाहीत.जे उपलब्ध आहे त्याचा योग्य वापर करुन घेऊन विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करुन सक्षम बनवणे एवढेच ध्येय त्यांच्या डोळ्यापुढे होते.त्यासाठी त्यांनी सायकलवर पाय खोडले,कधी हाताने स्वयंपाक करुन खाल्ला पण त्यांनी कुणाकडे कधी तक्रार केली नाही.एखाद्या हुशार पण गरीब विद्यार्थ्याला पुढच्या शिक्षणासाठी योग्य वाट दाखवलीच पण आपल्या तुटपूंजा पगारातून आर्थिक मदतही केली.
        ज्यावेळी त्यांचे विद्यार्थी नावलौकिक मिळवून परत आशिर्वाद घेण्यासाठी येत तेव्हा त्या शिक्षकांना कृतार्थ झाल्यासारखे वाटायचे.आज ही परिस्थिती आहे का?पुढे पाहूच...

-:राजकिय आस्था:-

तळागाळातील जनतेचे प्रश्न सोडवावेत,त्यांना येणाऱ्या अडी-अडचणी दूर कराव्यात.खिशात दमडीही नसेल तरीही त्यांची आंतरिक तळमळ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती.फार मागे जाण्याची गरज नाही.फक्त ६०-६५ वर्षापर्यंतचा भूतकाळ धुंडाळला तरी असे दिसून येईल कि पूर्वीच्या राजकिय नेत्यांमध्ये सत्तेचा उपयोग समाजकारणासाठी कसा करता येईल हे पाहण्याचे गुण होते.त्या गुणांचा त्यांनी समाजकारणासाठी फार चांगला उपयोग करुन घेतला.शिक्षण क्षेत्राला भरीव मदत दिली.मात्र ती देताना त्यांनी स्वत:च्या फायद्या-तोट्याचा हिशोब कधीच मनात धरला नव्हता.भारत स्वतंत्र झाला आहे त्यामुळे या देशाचा कारभार हाकण्यासाठी सक्षम प्रशासकीय अधिकारी तयार झाले पाहिजेत.लोकशाहीची पाळेमुळे घट्ट करण्यासाठी या देशातला प्रत्येक नागरिक सुशिक्षित झाला पाहिजे.देशाच्या संरक्षणासाठी तरूण सुदृढ,सशक्त झाले पाहिजेत यासाठी त्यांंनी शक्य ते सारे केले.त्यांच्या डोळ्यापुढे एक स्वप्न होते-देशाचे भले कसे होईल?देशातील गरीबी कशी दूर होईल?देश प्रगतीपथावर कसा जाईल?
       आणि हे स्वप्न साकार करण्यासाठी ते राजकिय नेते रात्रंदिवस झटत होते.शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे हे त्यांना माहीत होते.म्हणून त्यांनी शिक्षणक्षेत्रात आपला राजकिय स्वार्थ कधी पाहिला नाही.
       म्हणूनच जनता त्यांना आत्मप्रेरणेने मान देत होती.

-:आजची राजकिय परिस्थिती:-

आज अमुक अमका नेता अगदी नि:स्वार्थपणे काम करतोय असे जेव्हा कोणी म्हणेल तेव्हा लोक एक मोठा विनोद ऐकल्याप्रमाणे खो खो हसत सुटतील.कारण कथनीच्या अगदी उलट या राजकीय नेत्यांची करणी आहे.याचे ताजे उदाहरण द्यायचे झाले तर मागच्या महिन्यात फेसबुक,ट्विटर,व्हॉटस् ऍप अशा सोशल मिडीयावर आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहतानाच्या दोन इमेज फिरत होत्या.यातली एक इमेज ही अनौपचारिक होती आणि तीच इमेज खरी वस्तुस्थिती मांडत होती.तर दूसरी जी औपचारिक इमेज होती ती केवळ मुखवटे परिधान केलेली होती.
         अनौपचारिक इमेजमध्ये हे नेते श्रद्धांजली वाहण्यासाठी,शोक व्यक्त करण्यासाठी जमा झालेत की शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा आनंद साजरा करण्यासाठी जमा झाले आहेत असा प्रश्न पडण्याइतपत बत्तीशी दाखवत हसत आहेत.हीच यांची मानसिकता आहे आणि हेच यांचे पडद्यामागचे धंदे आहेत.
        औपचारिक इमेजमध्ये हेच दाताड काढणारे नेते अशा काही सुतकी तोंडाने पोझ देवून गेले कि वाटावे,त्यांच्याच आई-बापाचे अंत्यसंस्कार ते आत्ताच करुन आलेत.इतका नीचपणा जर यांच्या अंगात मुरला असेल तर यांच्याकडून काय अपेक्षा ठेवायच्या?यांचा काय आदर्श घ्यायचा?आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे यांचा काय म्हणून मान ठेवायचा?
       आजच्या राजकिय नेत्यांच्या मानसिकतेचे दर्शन होण्यासाठी हे एकच उदाहरण पुरेसे आहे.तसे पहायला गेले तर यांच्या कार्य आणि कर्तृत्वाचा(अनौपचारिक स्थितीतल्या अर्थात पडद्यामागच्या) इतिहास-भूगोल लिहायचा म्हटले तर पृथ्वीवर जसे सात खंड आहेत तसे सात खंडातही यांचे कार्य-कर्तृत्व(?)बसणार नाही म्हणून वानगीदाखल हे एकच उदाहरण पुरेसे आहे.

-:शिक्षणाचे खासगीकरण:-

लोकशाहीत जनमताला फार महत्त्व असते.या जनमतातून निवडून आलेले लोक सरकार चालवतात.म्हणजेच पर्यायाने हे राजकिय राजेच सरकार चालवतात.आणि यांना कोणतेही निर्णय घेण्याची मुभा असते.कायद्यातले कच्चे दुवे हेरुन हे काहीही करायला तयार असतात.मुळात पूर्वीची मानसिकता आताच्या नेत्यांमध्ये राहिलेली नसल्यामुळे त्यांच्याकडून नि:स्वार्थ निर्णयाची अपेक्षा करणेच चूक आहे.याच स्वार्थी भावनेतून या सरकारांनी(राजकिय राजांनी) शिक्षणाचे खासगीकरण करण्याचा घाट घातला आणि तो आता जवळ जवळ पूर्णत्वासही नेण्यात आला आहे.याचे जीते-जागते उदाहरण म्हणजे त्या मरणासन्न अवस्थेला पोहोचलेल्या सरकारी शाळा आणि रोजच्या रोज तरुण होत जाणाऱ्या राजकिय शिक्षणसम्राटांच्या खासगी संस्था-शाळा!
       सरकारी शाळांना जर योग्य ते आर्थिक स्त्रोत पुरवले असते,त्यांची गुणवत्ता वाढवली असती तर अशा शाळांकडे विद्यार्थी-पालकांची रीघ लागली असती.मोफत शिक्षणामुळे विद्यार्थ्यांची संख्याही वाढली असती.सरकारी तिजोरीतला पैसा या शाळांवरच खर्च झाला असता आणि शिक्षणसम्राट तयार झाले नसते.म्हणूनच शिक्षणाच्या खासगीकरणाचा सहेतूक घाट घातला गेला.त्याचे फळ आज सर्वच राजकिय शिक्षणसम्राट शासकिय अनुदान व डोनेशनच्या रूपाने चाखत आहेत.ज्याला राजकिय वरदहस्त नाही असा एक तरी शिक्षणसम्राट या देशात असेल का? शंकाच आहे!

-:रोगाची लागण:-

मिरच्या जशा कधीच गोड नसतात तसेच कोणताही रोग कधी चांगला असूच शकत नाही.रोग हा रोगच असतो.त्याचा जिथे फैलाव होतो तिथे त्या रोगाचे विषाणू आनंदी असतात तर ज्यांना रोगाची लागण होते ते आतून पोखरले जातात.हे रोग पसरवणारे विषाणू घाणीतूनच पैदा होतात आणि स्वत:च्या अस्तित्त्वासाठी घाणीचीच पैदास करतात,कारण त्यांना जगायचे असते.दुसऱ्यांच्या दु:खाशी,यातनांशी त्यांना काहीही देणे-घेणे नसते.
     ज्या गोष्टीकडे पाहून बाह्यमाणसाला त्याची किळस येते तेच या रोगजंतूंचे उगमस्थान आणि निवासस्थान असते.
        आजची राजकिय परिस्थिती पाहता,जे काय चालले आहे ते नक्कीच समर्थनिय नाही.सामान्य माणसाला हे सर्व बघून किळस आल्याशिवाय राहत नाही.अजून एका गोष्टीकडे पाहून माणसाला किळस येते,ती गोष्ट म्हणजे `गटार'! म्हणजे राजकारण आणि गटार यात काहीच तफावत राहिलेली दिसत नाही.याचाच अर्थ राजकारण हे आता राजकारण राहिलेले नसून त्याची एक `गटार' झाली आहे आणि शिक्षणासारख्या पवित्र गंगेत या राजकिय गटाराचे पाणी मिसळत असल्यामुळे शैक्षणिक गंगेचे पावित्र्य धोक्यात आलेले आहे.

-:नेमके काय झाले?:-

जिथे जिथे पैसा आहे तिथे तिथे राजकिय व्यक्तींचा शिरकाव हा ठरलेला आहे.आणि जिथे जिथे यांचा शिरकाव झालेला आहे त्या त्या क्षेत्राची वाट लागल्याशिवाय राहत नाही.त्याचे उदाहरण म्हणून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (BCCI) पाहता येईल.पैशासाठी वाट्टेल ते करायला ही मंडळी मागेपुढे पाहत नाहीत.मग अशा रोगजंतूंचा प्रादुर्भाव जर शिक्षणक्षेत्राला झाला तर शिक्षणक्षेत्राची वाट नाही लागली तरच नवल म्हणावे लागेल.
     भारतावर राज्य करण्यासाठी आलेले इंग्रज गेले.ते गेले पण आपले कायदे इथे शाबूत ठेवून गेले.भारतीय समाजाची मानसिकता ठळक शब्दात अधोरेखित करुन गेले कि भारतीय जनता खूपच भोळी आहे.एखादे गाजर दाखवले की यांचे पोट आपोआप भरते.हाच धागा पकडून या राजकीय नेत्यांनी खासगीकरणाच्या माध्यमातून चांगल्या दर्जाच्या शिक्षणाचे गाजर दाखवले आणि इथली भोळी जनता एका नव्या स्वप्नाला उरात बाळगुन आपसुक त्या जाळ्यात जावून अडकली.
       शिक्षणाच्या अमाप सोयी उपलब्ध करुन देताना जे सरकार चालवत होते त्यांनी आपल्याच नातलगांना,आपलीच हुजरेगिरी करणाऱ्यांना संस्थाचालक आणि सचिव केले.जेणेकरुन पैशाचा ओघ आपल्याकडेच यावा.अशा संस्थांना त्यांनी खिरापतीप्रमाणे सरकारी तिजोरीतून अनुदान वाटले.तिकडून उपसायचे आणि इकडे आपली तुंबडी भरुन घ्यायची असा उद्योग सुरु झाला.प्रचार मात्र असा केला की जणू राजा हरिश्चंद्राने उदार होवून दान दिले आहे.
        संस्था तर उभ्या झाल्या...मग शिक्षक भरती करताना गुणवत्तेचा निकष न लावता बँक बॅलन्सचा विचार केला गेला.एवढ्या मोठ्या रकमा संस्थाचालकांच्या घशात घालूनही ना पोच मिळाली,ना पावती,ना पगार! या पैशातून म्हणे शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन दिल्या.अरे,इथे गुणवत्तेशी तडजोड करुन ते दुसऱ्या कोणत्या सुविधा देणार आहेत? मूळ पायाच जर मजबूत नाही तर बाकीच्या वल्गना काय कामाच्या?
        संस्था वाढली,संस्थेचा कारभार वाढला तशी विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी डोनेशनची कल्पना पुढे आणली गेली.ती ही स्वत:ची तुंबडी भरण्याचा एक मार्ग म्हणूनच.आणि त्याला `देणगी' असे गोंडस नाव दिले. या रकमेतून काय सुविधा दिल्या याचे गुपित मात्र पालकांच्या समोर कधीच उघड केले जात नाही.डोनेशनची कॅशमेमो(पोचपावती)तरी दिली जाते की नाही याबाबतही शंकाच आहे.
      अशा संस्थांमधून फक्त पाठांतरीत विद्यार्थी घडवले जातात.संस्कार आणि सुसंस्कारासाठी त्यांच्याकडे वेळ असतोच कुठे?जे शिक्षण जीवनात उपयोगी पडते तेच खरे शिक्षण.जीवन हे पाठांतर करुन जगता येत नाही.त्यासाठी कलात्मक प्रयत्न करावे लागतात.आणि नेमके हेच शिक्षण आज विद्यार्थ्यांना मिळत नाही.नुसती सुशिक्षीत बेकारांची उत्पत्ती यातून होते.जगण्यासाठी धडपडताना या सुशिक्षीत बेकारांनी क्षणोक्षणी आपलेच पाय धरावेत अशी पुरेपूर व्यवस्था करुन ठेवलेली आहे.
      आपलीच संस्था कशी श्रेष्ठ आहे हे दाखवण्यासाठी वर्तमानपत्रांची पानेच्या पाने भरुन जाहिराती दिल्या जातात.जे जे चमकते ते ते सोनेच असते असे नाही.पण पितळेला सोन्याचा मुलामा देवून चमकवण्याचा अट्टाहास सुरु असतो.तो केवळ डोनेशनचा स्त्रोत अर्थात विद्यार्थी-पालक आपल्याकडे वळवण्यासाठी असतो आणि त्यात ते यशस्वीही होतात कारण वाईटाचा प्रसार चांगल्यापेक्षा कैकपटीने जास्ती होतो हे कटुसत्य आहे.
      हे असे घडत असताना शिक्षणाचे,शिक्षणाच्या दर्जाचे काय होतेय याकडे हेतूपुरस्पर डोळेझाक केली जाते.कारण गटारातल्या रोगजंतूंना स्वत:चे जीवनमान वाढवायचे असते,त्यांना जगायचे असते.ते थोडाच पीडितांचा विचार करणार आहेत?

-:राजकीय रोगजंतूंची पिलावळ:-

जिथे जिथे या रोगजंतूंचा प्रादुर्भाव झाला तिथे तिथे त्यांनी आपल्या वंशजांची निर्मिती केली.राहण्याची जागा जरी वेगवेगळी असली तरी या रोगजंतूंनी आपापल्या निवासस्थानांच्या नावाखाली `संघटना' उभी केली.या संघटनांच्या माध्यमातून त्यांनी गुण्यागोविंदाने शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात राजकारणाचे विष पेरले.या विषातूनच त्यांची पिलावळ निर्माण झाली आणि तीही शिक्षण घेण्याचे बाजूला ठेवून शिक्षणक्षेत्राचे लचके तोडू लागली.याचे ज्वलंत उदाहरण म्हणून पुण्याच्या FTII (Film and Television Institute of India)या संस्थेचे देता येईल.या संस्थेत चित्रपटक्षेत्राशी संबंधित सर्व प्रकारचे प्रशिक्षण घेता येते.गेल्या काही दिवसापासून या संस्थेतील विद्यार्थी संघटनांनी शिक्षण न घेण्याचा निर्णय घेतला.कारण काय तर या संस्थेचे अध्यक्ष त्यांना पसंत नाहीत.अरे,आपण शिक्षण घ्यायला आला आहात,अध्यक्ष निवडायला नाही.ज्यांना खरेच काही शिकण्याची चाड आहे ते असे उपटसूंभासारखे आंदोलन करणार नाहीत.पण याही गोष्टीला नाईलाज आहे कारण त्यांना `त्या' रोगजंतूंनी आपले लक्ष्य केले आहे,त्यांचा मेंदू बधिर केला आहे.जोपर्यंत या रोगाचे जंतू त्यांच्या मेंदूतून जाणार नाहीत तोपर्यंत `वाघिणीचे दूध' त्यांना पचनी पडणार नाहीच.

-:आजच्या शिक्षकांची मानसिकता आणि कृतार्थता:-

पूर्वीच्या शिक्षकांची बरोबरी करु शकणारा शिक्षक सापडणे आज महाकठीण काम आहे.आजच्या शिक्षकांची पूर्वीच्या शिक्षकांशी तुलना करणे म्हणजे पूर्वीच्या गुरुवर्यांचा अपमान केल्यासारखे व्हावे इथपर्यंत आजच्या शिक्षकांची मानसिकता खालावलेली आहे.
      मुळात त्यांची भरतीच गुणवत्तेच्या कसोटीवर झालेली नसते.त्यामुळे ते काय दर्जेदार विद्यार्थी घडवणार?आणि अपेक्षा तरी कशी धरणार?
      या शिक्षकांना शिकवण्यापेक्षा गावातील,वार्डातील राजकारणात जास्त रस असतो.कारण त्यांची नोकरी `त्या' राजकारण्यांच्या हातात असते.त्यांच्याशी लाळघोटेपणा केल्याशिवाय नोकरी टिकत नाही.आणि नोकरी टिकवणे ही त्यांची प्राथमिकता व हीच त्यांची कृतार्थता असते.
       खासगी संस्थेतील शिक्षकांची तर गोष्टच निराळी असते.एका शब्दात `संस्थाचालकांचे गुलाम' अशी त्यांची व्याख्या करता येईल.तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन केल्याशिवाय त्याचा चरितार्थच चालत नाही.

-:सारांश:-

एकूण अशी सगळी भयानक परिस्थिती असताना त्यातून चांगले काही उपजेल अशी आशा करणेही धोक्याचे होईल.कारण इथे निर्मळ गंगेत गटारगंगेचे पाणी मिसळले आहे.

*अनिल सा.राऊत*
E-mail:- anandiprabhudas @gmail.com






Comments

  1. या लेखावर आलेल्या काही प्रतिक्रिया:-
    ..................................................
    अनिलजी,

    कटुसत्य ह्या नावातच सारे काही आले.
    विविध क्षेत्रातील अनियमिततेवर भाष्य करणं ओघानं आलंच.त्यातील अप प्रवृत्तीवर प्रहार करणं आलंच!
    शैली स्वीकारणे लेखकाधीन बाब आहे.
    इतर अनेक क्षेत्रांपेक्षा शिक्षणशास्त्रावर जास्त बोललं जातं, ही वस्तुस्थिती आहे.
    शिक्षण हे कालमानाप्रमाणे बदलत जातं.तत्कालीन सामाजिक परिस्थिती नुसार त्या क्षेत्राची रचना, कार्यपद्धती ठरत असते.त्यामध्ये स्वार्थही असू शकतो!
    गुरूकुल पद्धत मागे पडलीच आहे. कालांतराने सध्याची शाळा पद्धतही बंद होईल! त्यावेळी मग आजच्या अनिष्ट बाबीच धराशयी होतील!
    आता सद्य:स्थितीकडे वळू या!
    शिक्षणक्षेत्र कुणी कलुषित केलं ते सांगायची गरज नाही.
    सध्याच्या चंगळवादी,कामचोर संस्कृतीत अनेक क्षेत्रातील कर्मचारी कर्तव्यहीन झाल्याचे दिसून येते.निरीक्षणीय यंत्रणाही कर्तव्यहीन झाली आहे. अर्थात हे शंभर टक्के खरे नाही.आजही स्वतःच्या कारमधून सुट्टीच्या दुस-या दिवशी मुलांना वस्तीवरून शाळेत आणणारे शिक्षक मी पाहिलेत! तन-मन-धन खर्चणारेही आहेत! समर्पित शिक्षकही आहेत! पण अशी टक्केवारी कमी आहे! सा-या समाजात जे चाललंय त्याचं प्रतिबिंबही पडणारच म्हणा!
    राजकारणाने,राजकारण्यांनी या क्षेत्रात धुमाकूळ घातलाय! त्यांना आवरण्याची कुणाचीही इच्छाशक्ती नाही!कुंपणच शेत खातंय! हे बदलेल पण वेळ लागेल!
    सध्याचा अभ्यासक्रम चांगला आहे.क्रियाशीलतेला वाव देणारा आहे. शिक्षक शिकवतात.परिस्थिती भयानक नाही.चिंता करण्यायोग्य मात्र आहे.मुलं सहा तास शाळेत असतात;उर्वरित वेळ घरी असतात हे विचार करण्याजोगे आहे.
    तथाकथित सुप्रसिद्ध शाळा हा खरं तर चर्चेचा विषय का करतात ते कळत नाही. याचा संबंध देणगीशी अधिक आहे. अनिताजींचं मत योग्य आहे की देणगी देऊन शिकायचंच नाही.
    कॅपिटेशन अॅक्ट असूनही पालकांनीच तो निष्क्रीय ठरवलाय जणू! आता शिक्षण हक्क कायदा हा आशेचा किरण आहे.तरीही या क्षेत्रातील अपप्रवृत्तींचा नायनाट करण्यासाठी शुद्ध,समर्पित,निस्पृह,धडाडीच्या लोकांची गरज आहे.
    काही संस्था स्वार्थासाठी ' अहवाल ' प्रसिद्ध करतात,हा तर संशोधनाचाच विषय आहे!
    एक मात्र खरं की, या क्षेत्रात बदल हवा असं बहुतांश लोक म्हणतात;पण काय हवे ते मात्र ते सांगत नाहीत.
    संवेदनशीलता कमी व्हायला नकोय पण तीच कमी होतेय.
    कामावरून काढून टाकलेल्या शिक्षकाना मी कामावर घ्यायला लावलंय!
    आपण सडेतोड लिखाण केलं आहे.तो आपला हेतु असावा.
    आपल्याला काय हवंय ,अपेक्षित आहे तेही मुद्देसूदपणे मांडायला हवं
    वाचकांना मार्गदर्शन होईल याकडेही कटाक्ष हवा!
    पुराव्या बद्दल तुम्ही भाष्य केलंच आहे पण भक्कम पुरावे ठेवून लिखाण केलेलं केंव्हाही चांगलं!
    केवळ कठोर लिहिल्यानेच कार्यभाग साध्य होतो असंच काही नाही!
    एका चांगल्या विषयावर लिखाण केलंय तुम्ही!
    आता पाठपुरावा हवा.
    पालकांनी स्वतः सावरायला हवं आणि पाल्यालाही सावरायला हवं, हेच खरं!
    कदाचित माझी मतं तुम्हाला प्रेरणा देऊ शकणार नाहीत!
    असो. लिखाणा बद्दल धन्यवाद!

    ----------- रवींद्र काळे
    उपशिक्षणाधिकारी,मुंबई
    ................................................

    अनिल जी,

    लेख खुपच छान
    पुर्ण अभ्यास दिसतोय तुमचा ..माझा एवढा अभ्यास नाही .. पामर काय बोलणार .......
    भाषाशैली लेखासाठी उपयुक्त .......पण डोनेशन पद्धत चुकीची आहे ..
    सरकारचे काही नियंत्रण नाही ....शिक्षण क्षेत्रात तरी स्वच्छता हवी एवढीच अपेक्षा!
    आनंद झाला लेख वाचून!!

    -----------अनिता सावंत
    मुंबई
    ................................................

    राऊतसर,

    तुमचा दै.कटुसत्य मधला शैक्षणिक लेख काल रात्री ऊशिरा वाचला...छान आहे.. आजची शैक्षणिक वस्तुस्थिती अगदी रोकठोकपणे आणि योग्य शब्दात मांडली आहे...सत्य आणि अपरीहार्य...आणि सर्वसामान्यांची हतबलता ...शिक्षण म्हणजे केवळ पैशांचा बाजार.....!

    ---------- जयश्री जाधव-माळी
    पुणे
    ..............................................

    ReplyDelete
  2. अजून एक प्रतिक्रिया

    बरबटलेल्या शिक्षण व्यवस्थेची लक्तरं अगदी मुद्देसुदपणे मांडणी करुन लेखकाने वेशीवर टांगली आहेत. -सिध्देश्वर खिलारे,खवणी.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

नागपंचमी: काल आणि आज

एक ओवाळणी-माझ्या `त्या' बहीणीसाठी...