माध्यमांचा बेजबाबदारपणा कुणाच्या पथ्यावर?
याकूब मेमनच्या फाशीचे उदात्तीकरण अजून ताजेच असताना जम्मू काश्मिरच्या एका गावात दोन युवकांनी एका आतंकवाद्याला पकडले. इलेक्ट्रॉनिक मिडीयाला अजून एक विषय चघळायला मिळाला. देशासह जगभरातून लोक दूरचित्रवाणी पाहत असताना आपण काय दाखवावे व काय दाखवू नये याचेही सोयरसूतक ही माध्यमे पाळत नाहीत याचा देशवासियांच्या मनात धगधगता राग आहे.
मुंबईत २६/११ ला झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे थेट प्रक्षेपण पाहून सुरक्षायंत्रणांना व पोलिसप्रशासनाला काहीच मदत झाली नाही. उलट बाहेर नेमके काय चालले आहे याची बित्तंबातमी आत लपलेल्या दहशतवाद्यांना मिळत गेली. नंतर ते थेट प्रक्षेपण बंद करण्यात आले परंतू तोपर्यंत दहशतवाद्यांनी आपला कार्यभाग साधला होता.
आता पकडलेल्या दहशतवाद्याबाबतही तेच घडताना दिसत आहे. ज्या युवकांनी त्यांना पकडले त्यांची मुलाखत घेणे हे त्या युवकांच्या जीवावर बेतू शकते हे माध्यमांनी लक्षात घ्यायला नको का? पकडलेला काही भुरटा चोर नाही तर दहशतवादी आहे.त्याला ज्यांनी कोणी पाठवले ते या सर्व घडामोडीवर लक्ष ठेवून असणारच यात शंका नाही.
विशेष बाब म्हणजे आजकाल सर्रास आरोपींना,गुन्हेगारांना बुरखा पांघरायला दिलेला असतो.कारण काय तर त्यांना उघड चेहऱ्याने नेले तर म्हणे मानवतावादाची पायमल्ली होते.मात्र पुढील अनर्थ लक्षात न घेता या बहाद्दर युवकांचे चेहरे कोणताही आडपडदा न ठेवता दाखवले गेले.या युवकांचे कार्य नक्कीच प्रशंसनीय आहे,ते देशासमोर यावे यात दूमत नाही.पण त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी ही माध्यमे घेणार आहेत का? देशातील सर्वांनाच त्यांच्या जबाबदारीची जाणिव करुन देणारी ही माध्यमे स्वत: जबाबदारीने केव्हा वागणार?
याच संदर्भात दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या आतंकवाद्याला थेट प्रश्न विचारण्याचा अधिकार या माध्यमांना आहे का? थेट माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना त्याने जी उत्तरे दिली ती खरीच असतील कशावरून? त्याच्याही कुण्या नातलगांचे जगणे मरणे तिथल्या कुणाच्या तरी हाती असेल. असे असेल तर तो निखालस खोटे बोलणार हे नक्की! ही तर तपासयंत्रणेच्या कामकाजात सरळ सरळ ढवळाढवळ आहे.म्हणजेच हा माध्यमांचा बेजबाबदारपणा आहे. या बेजबाबदारपणाला कुठेतरी आळा घालण्याची वेळ आता आली आहे.
मुळात अशा दहशतवाद्यांना सुरक्षा व तपास यंत्रणांनी आधी त्यांची कसून चौकशी करावी.ज्यांनी त्यांना पाठवले त्यांच्यापर्यंत या गोष्टीचा कानाकोपरासुध्दा पोहोचला जावू नये याची खबरदारी घ्यायला हवी. त्यांच्या चौकशीतून जे समोर येईल त्यावर अत्यंत गुप्त रीतीने कारवाई करुन दहशतवाद्यांचे पुढचे सर्व मनसूबे हाणून पाडता येतील.त्यानंतरच ही बाब माध्यमांसमोर आणली तर दहशतवादी सजग न होता गाफिल राहतील व त्यांच्या कारवायांना एक प्रकारे आळा बसेल.
हल्ली सुरक्षेच्या कारणास्तव सीसीटीव्ही कॅमेरे लावले जातात.ते नेमके कोठे आहेत हे कुणालाही माहीत न होता गुप्तरितीने बसवले गेले तर गुन्हेगारांचे गुन्हे आपोआप त्यात कैद होतील.पण माध्यमवाले त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे स्थान न् स्थान अशा रीतीने दाखवतात की ते नेमके कुणाला मदत करत आहेत असा प्रश्न पडावा.
टी.आर.पी. वाढवण्याच्या शर्यतीत आपण गुन्हेगारीला, दहशतवादाला नकळत मदतच करतोय हे माध्यमांच्या केव्हा लक्षात येणार? नागरिकांच्या सुरक्षेसाठी जी यंत्रणा राबविली जाते ती यंत्रणा खरे तर गुप्तरीतीनेच राबवायला हवी.तरच ती राबविण्यामागचे ईप्सित साध्य होईल.शत्रूला जागे करुन ही माध्यमे काय साध्य करत आहेत?
माध्यमांचे कव्हरेज नेमके कुणाच्या पथ्यावर पडते आहे हे आता केंद्र सरकारने व्यवस्थित पाहून माध्यमांच्या स्वैराचाराला थोडासा तरी निर्बंध लावला पाहीजे.नाहीतर ही माध्यमे देशहितासाठी आहेत की शत्रूहितासाठी हे तरी देशातील जनतेला सांगावे.
अनिल सा.राऊत
anandiprabhudas@gmail.com
Comments
Post a Comment