आयुष्य
*आयुष्य*
गर्भातल्या गूढ अंधारातून सुरु होतो आयुष्याचा प्रवास-भविष्यकाळाच्या उदरातील अनाकलनीय दिशेने...!गूढ अंधारातून लख्ख प्रकाशात जेव्हा प्रवेश होतो आयुष्याचा-तेव्हा हसत असते प्रकाशाला निर्ढावलेले आयुष्य अन् रडत असते प्रकाशात प्रवेश करणारे आयुष्य! तिथूनच पंख फुटतात आयुष्याला...ज्याच्या त्याच्या प्राक्तनानुसार घडत जाते ज्याचे त्याचे आयुष्य...कुणाचे आयुष्य अल्पजीवी ठरते तर कुणाचे आयुष्य मध्यजीवी...कुणाचे आयुष्य सरकत जाते पूर्णत्वाकडे!
आयुष्याचा प्रवास असा क्षणा-क्षणांचे गतिरोधक पार करत सरकत असतो पुढे...कुणाचे आयुष्य ठेचकाळते अशा गतिरोधकांना...चाल धीमी होते आयुष्याची अन् कधी कधी हे आयुष्य सरकते बाजूला या प्रवासातून...इथपर्यंतच असतो त्याचा प्रवास...! बाकीची आयुष्ये मग शोधत रहातात आपल्याच प्रवासातील अडखळलेल्या गतिरोधकांची लांबी-रुंदी अन् खूश होतात पार केल्याच्या आविर्भावात!
आयुष्यालाही असतात अवस्था...बाल्यावस्था,तारुण्यावस्था आणि वार्धक्यावस्था!
भुईच्या उदरातून नुकत्याच अंकुरलेल्या अंकुरासारखे मुलायम आणि सोज्वळ असते बाल्यावस्थेतील आयुष्य...या आयुष्याला नसते जाण आणि जाणिव जगरुढीची! हे आयुष्य अगदी लुसलुसीत हिरवळ पेरते इतर आयुष्यांच्या मन:पटलावर...हे आयुष्य जोजवताना अपरिमीत आनंद ओसंडून वाहत असतो...चंद्राच्या कलेप्रमाणे वाढणारे हे आयुष्य जेवढे लोभस तेवढेच देखणे असते.मात्र,काही आयुष्यांच्या नशिबात नसते हे लोभसपण आणि देखणेपण...परिस्थीतीच्या चाकाखाली पिचलेल्या आयुष्यांकडून हा वारसा आपसूक येतो या आयुष्यांकडे...अन् पिचून,कोमेजुन जाते हे आयुष्य! कधी कधी होते कुपोषित अन् थांबतो कधी कधी अशा आयुष्यांचा श्वास...बस्स! तेवढाच वावर असतो त्या आयुष्यांचा या पृथ्वीतलावर...!
....बाल्यावस्थेच्या आधीही होतात अत्याचार काही काही आयुष्यांवर-गर्भातल्या गूढ अंधारातच! कधी आपले कुकर्म झाकून नेण्यासाठी,तर कधी ते आयुष्य असते 'ती'चे प्रतिनिधित्व करणारे म्हणून! आयुष्येच करतात त्या आयुष्यावर अत्याचार...नको असते त्यांना ते 'स्त्रीलिंगी' आयुष्य म्हणून...
ज्या आयुष्यांना लाभते मायेचे पांघरुन,ती आयुष्ये वाढत जातात कले-कलेने अन् प्रवेश करतात तारुण्यावस्थेत-मध्यावस्थेत! या आयुष्याला लाभतात सप्तरंग इंद्रधनुष्याचे...मोरपंखी स्वप्नांचे लागतात वेध...कानात वारे भरलेल्या वासरांसारखे उनाड असते हे आयुष्य अन् तरीही काहीतरी करुन दाखवण्याच्या इर्षेने झपाटलेले असते हे आयुष्य! मखमली पायघड्या अंथरलेल्या असतात काहींच्या वाटेवर...तर काही मार्गक्रमण करत असतात...रडत-खडत,ठेचकाळत काटेरी वाटेवरुन...एका निश्चित ध्येयाकडे! अशीही असतात काही आयुष्ये-स्वप्नांची चाड नसलेली...घुटमळत रहातात तिथल्या तिथेच अंधाऱ्या वाटेवर..कधी दाखवलाच दिवा कुणी प्रकाशवाटेचा...तर...तर...चालण्याएवढेही उरलेले नसते त्राण त्यांच्या पायात...खितपत पडतात दारिद्र्यात अशी आयुष्ये...हातपाय न हलवता! याउलट पोहोचतात कितीतरी आयुष्ये यशोशिखरावर...अमाप कष्टांच्या जोरावर...!
एका नविन पर्वाची सुरुवात होते आयुष्याची याच टप्प्यावर...रंगबिरंगी स्वप्ने सजवण्यासाठी हवा असतो जोडीदार-आयुष्यालाही! हातात हात घालून चालत असतात ही दोन आयुष्ये-पुन्हा एक आयुष्य जन्माला घालण्यासाठी...वंशावळ चालवण्यासाठी!
आयुष्यालाही मन असतं...आयुष्यालाही हवा असतो विश्वास...याच वळणावर खूप जपावं लागतं आयुष्याला...जे हवं ते नाही मिळालं तर नाराज होतं आयुष्य...कुणी साथ देता देता मध्येच सोडून गेलं तर धीर सोडून बसतं आयुष्य...अन् जे नको असतं व्हायला तेच घडून जातं! परिस्थीतीला सामोरं जायचं सोडून फासावर लटकतं आयुष्य...स्वत:वर विषप्रयोग करुन घेतं आयुष्य...असं आयुष्य येऊ नये कुणाच्या वाटेला...आयुष्य कसं खळाळतं असावं!
आयुष्याला लाभतो जोडीदार महत्प्रयासाने अन् जपावा लागतो तळहातातल्या फोडाप्रमाणे...पण...उठतात काही आयुष्ये एकमेकांच्या जीवावर-तारुण्याच्या धुंदीत! कधी कधी होतात विलग क्षुल्लक कारणावरुन अन् लोटतात एकमेकांना दु:खाच्या खाईत...!
याउलट एकमेकांची मने जपत सुखाने पुढचा प्रवास करत रहातात काही आयुष्ये...जगण्याचा आनंद घेत अन् जगण्यातला आनंद इतरांना वाटत...हेच असते आयुष्याचे सार्थक...यालाच म्हणतात यशस्वी आयुष्य..! येतात संकटे या आयुष्यांवरही मात्र दोघे मिळून करतात त्यावर मात अन् होतात विजयी!
पूर्वेच्या गर्भातून प्रसवणारा सूर्य चढत जातो मध्यापर्यंत अन् मध्यावरुन कलतो हळूहळू पश्चिमेच्या डोहात....तसंच असतं आयुष्याचंही! मध्यावरुन कलत जाते आयुष्य वृद्धावस्थेकडे! या टप्प्यावर नसतो भरवसा कोणत्याच आयुष्याचा...नसतो नेम कधी होईल अस्त याचा...काही आयुष्ये असतात भाग्यवान...जगतात स्वत:च्या निवासात...एकोप्याने...मात्र,काही काही आयुष्यांना दाखवली जाते वृद्धाश्रमाची वाट- आपल्याच वारस आयुष्याकडून...!
काही आयुष्ये जातात पुढील दीर्घ प्रवासाला..एका आयुष्याला मागे ठेऊन...छाटलेले असतात हातपाय या आयुष्यांचे - वार्धक्याने! सुखासुखी निरोप घेतात या जगाचा काही आयुष्ये...तर खितपत पडतात काही आयुष्ये प्राक्तनाचे भोग भोगत...शेवटी जावेच लागते आयुष्याला- पुढच्या प्रवासाला...कोणत्याही...!
✒ *अनिल सा.राऊत*
📱 _9890884228_
Comments
Post a Comment