Posts

Showing posts from 2019

गुलाब आणि धोतरा

अतिलघूकथा गुलाब आणि धोतरा        एकदा काय झाले...गुलाबाची आणि धोत-याच्या फुलाची दोस्ती झाली.जिथे जिथे गुलाब असे तिथे तिथे धोत-याचे फूलही असे.कुठेतरी उकिरड्यावर फुलून दुर्गंध पसरवणा-या धोत-याच्या फुलाच्या वाट्याला नेहमी हेटाळणीच आलेली होती.पण गुलाबाच्या संगतीने त्याची दुर्गंधी तर कमी झालीच पण गुलाबाचा सुगंध ही त्याच्या काही पाकळ्यांना लागला.गुलाब बिचारा अबोल..धोतरा बोलघेवडा! आपल्या बोलघेवड्यापणाने त्याने लोकांना भूरळ पाडली.लोकही आता धोत-याची हेटाळणी करत नव्हते. ...आणि म्हणूनच त्याला असे वाटू लागले की लोक गुलाबापेक्षा आपल्यालाच जास्त मानतात.तो स्वतःला गुलाबापेक्षाही श्रेष्ठ समजू लागला.गुलाबाबरोबर फिरुन उगीच वेळ वाया घालवण्यापेक्षा आपण आपलीच किर्ती वाढवण्यासाठी वेळ खर्ची घालावा असा त्याने निर्णय घेतला...आणि गुलाब व  धोत-याच्या फुलातील दोस्तीत अंतर पडू लागले.बिचारा गुलाब मूकपणे अश्रू ढाळत एकटाच आपल्या ध्येयाकडे वाटचाल करत राहिला. ....आज गुलाबाला फुलांच्या राजाचा मान आहे.धोत-याचे फूल दुर्गंधी पसरवत तिथेच उकिरड्यावर उभे आहे..! © अनिल एस.राऊत

दारुपुराण : भाग १/अशोक आणि समाधान

....गोष्ट रात्रीचीच...ज्यांचं आयुष्य सालं घालण्यातच गेलं त्या अशोकने कंपनी हवी म्हणून मला सोबत येण्याचा आग्रह केला.गेलो...त्यांनी त्यांचा ब्रँड घेतला व मी कोल्ड्रींक्स...      अशोक ख-या अर्थाने सालगडी..किती वर्षे झाली एकाच शेतक-याकडे सालावर आहे हे मलाही नक्की माहीत नाही...बाहेरगावहून येऊन इथे चाकरी करत करत अशोकने चिंचेचा व्यापार ही केला..बायको,मुलगी व मुलगा असा त्याचा परिवार.मुले हुशार तर होतीच पण बापाच्या गरीबीची आणि कष्टाची त्यांना जाण होती..मुलगी दहावी बारावी शिकली..तिचे लग्न थाटात लावून दिले.चाकरी करत करत मुलगा समाधान याला इंजिनियर केले.तो आज ४५ हजार पगार घेतोय.अगदी शांत,समजूतदार व निर्व्यसनी मुलगा.दिवस निवांत बसून खाण्याचे,पण अशोकने चाकरी सोडलेली नाही.खर्चापाण्यासाठी समाधाकडून एक रुपयाही घेत नाही.त्याचे समाधानला एकच सांगणे आहे," तू मला एक रुपयाही देऊ नको.सालं घालून मी जेवढं आणि जसं कमवलं तसंच तू तुझ्या तुझ्या भविष्यासाठी कमवून ठेव यातच मला समाधान आहे."     समाधान अशोकचे समाधान नक्कीच करणार यात शंका नाही.कारण त्याला आपल्या भूतकाळाची जाण आहे.   ...