एक ओवाळणी-माझ्या `त्या' बहीणीसाठी...
बहीण-ज्यांना नाही त्यांनाच तिची उणीव जाणवते.ज्यांना असते त्यांनाही जाणवते पण ती सासरी गेल्यावर...! आज रक्षाबंधन! बहीणीची आठवण तर येणारच...पण या पामराला तेवढेही सुख नाही.बहीण नसल्याची खंत मनात आहेच पण ज्यांनी ज्यांनी बहीणीचे प्रेम दिले त्यांची आज प्रकर्षाने आठवण येते आहे.त्यांची राखी आता पहिल्यासारखी येत नाही मात्र मी माझी ओवाळणी अशी शब्दरुपात पोहोच करतो आहे. सन १९९८ चा तो काळ होता. मी नुकताच कविता लिहू लागलो होतो.ज्या काही चार-दोन कविता लिहील्या होत्या त्या जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या वर्तमानपत्राच्या कार्यालयात पोहोच करुन आलो होतो.आपलेही नाव पेपरात छापून येणार या आनंदाने गडी हवेतच तरंगत होता.पण कशाचे काय अन् फाटक्यात पाय....वर्तमानपत्राची दर रविवारची पुरवणी मला हळूहळू हवेतून जमिनीवर आणत होती.बघता बघता सहा महीने उलटले आणि एका रविवारी स्वारी कवितांसहीत पेपर आऊट झाली. पहिली कविता छापून येण्याचा आनंद काय असतो ते वर्णन करुन सांगू शकत नाही.आनंदाने गगनाची शीव केव्हाच ओलांडली होती.एक अनिल आज `कवी अनिल' झाला होता. अशाच ...