सुगला


:::::::::::: सुगला :::::::::
              (ग्रामीण कथा)

डोक्यावरच्या गवताच्या ओझ्याने तिची मान पाठ भरुन आली होती.कमरेतून निघालेली कळ थेट अवघडून गेलेल्या खांद्यापर्यंत पोहोचत होती.तरीही सुगला चालतच होती.ओझ्यामुळे तिची चाल जरा बेढबच भासत होती.पण त्या निर्जन वाटेवर ती चाल पाहणारे कुणी नव्हते म्हणून ती तशीच पाय ओढत अंतर कापायचा प्रयत्न करत होती....
     सरावण सरत आला तरी पाऊस अजून हाद्या म्हणत नव्हता.आभाळ तर भरुन यायचे पण रीते व्हायचे नाही.जिकडे बघावे तिकडे मातीच्या लेकरांची नुसती होरपळ चाललेली दिसत होती.हाता-तोंडाशी आलेला घास घारीने झडप घालून हिसकावून न्यावा तसेच या दुष्काळाने केले होते.प्यायच्या पाण्याची अजून परापत झाली नसली तरी हे दिवस असेच पुढे राहिले तर मग मात्र जगणे मुश्कील झाले असते.हाताला तर काहीच कामधंदा मिळत नव्हता.पण सुगलाने अजून धीर सोडला नव्हता.गावात जरी कुठेच हिरवे दिसत नसले तरी गावापासून तीन कोसावरच्या वाण्याच्या वस्तीवर मात्र देवाची किरपा पहिल्यापासून होती.तो जिवंत पाण्याचा भाग असल्यामुळे तिथे पाण्याचा तुटवडा नसायचा.जेमतेम का होईना पण भागता भागत होत होती.
      तिथला हरी वाणी एकदम दिलखुलास माणूस.त्याला राजकारणाची आवड नव्हती.उलट चीडच होती.श्रीमतांना चपलीजवळ आणि गरीबांना चूलीजवळ जागा द्यायची त्याची नीती होती.गरीबांच्या दु:खाची त्याला जाणिव असायची.म्हणूनच सुगलाच्या दु:खात तो तिला आपल्यापरीने मदत करायचा.सुगलाही अडी-नडीच्या कामाला धावून जायची.नाही म्हणायची नाही.जणू हरी वाण्याचे घर म्हणजे तिचे माहेरच झाले होते.हरी वाण्याची बायको कांता ही तर मायेची खाणच होती.कुण्या गरीबाला ताटातला घास काढून देण्याची दानत राखून होती आणि त्यांच्या सरु व उमा या दोन्ही मुलीतही आई-बापाचेच गुण उतरले होते.त्याला मुलगा नव्हता पण मुलींनाही त्याने काही कमी पडू दिले नव्हते.सुगलाला तर तो आपली थोरली मुलगीच मानायचा.
     काल झावळ पडायलाच हरीतात्या सुगलाच्या वस्तीवर आला होता.दिवसभर नवरा बबनबरोबर तोंडभांड झाल्याने सुगला वसरीवरच डोक्याला हात लावून भिताडाला टेकून बसली होती.एकुलता एक दहा वर्साचा पोरगा गण्या,आय ऊठत नाही बघून घरातली चिमणी पेटवायचा प्रयत्न करत होता.अशा वक्ताला हरीतात्याला दारात पाहून सुगलाला भरुन आले.पण पाचवीलाच पुजलेले आपले रडगाणे कुठपर्यंत तात्याला सांगायचे म्हणून तिने हुंदका गिळला.आत आवाज देत म्हणाली,
"ए गण्या,तांब्या भरुन आण तात्याला."
     कधी येईल तेव्हा स्वत: ऊठून तांब्या भरुन देणारी सुगला आज गणाला पाणी आणायला सांगतेय म्हणजे नक्कीच काहीतरी बिनसलेय अशी शंका तात्याच्या मनाला शिवून गेली.गावात कानावर आलेली कुणकुण खरीच आहे म्हणायचे असा विचार करुन हरीतात्याही तिथेच वसरीवर येऊन बसला.तेवढ्यात गण्याने पाण्याचा तांब्या हातात दिला.चूळ भरुन तात्याने एकवार छपरात नजर टाकली.
"का गं सुगला?अशी का चितागती बसलीय?"
"काय न्हाय तात्या..." हुंदका आवरत सुगला कशीबशी म्हणाली.
"काय न्हाय कसं?तिनी सांजंचा वकूत झालाय.कडूसं पडाय लागलं तरी तू अजून दिवा न्हाय लावला?"
"त्या माकडतोंड्याला मगाधरणं सांगतिय दिवा लाव म्हनून...एssगण्याss...काय झालं रं?आज लागंल का दिवा?"
"आय्ये,चिमणीत राकेल न्हाय वाटतं!"
"ए पोरा,आण ती चिमणी हिकडं आन् तो राकेलचा डबडा बी आण... ए सुगला,भर त्या चिमणीत राकेल...असं अंधारात बसुनि लक्षुमी यायच्या टायमाला!" तात्या जरा डाफरलाच.
    आता मात्र सुगलाला ऊठण्याशिवाय पर्याय नव्हता.ती ऊठली.आत गेली.राकेल भरुन दिवा लावला.चूलीतली राख तिथेच बाजूला सारली.चार काटक्या चूलीत कोंबून वरुन रॉकेल ओतले. चूल पेटवली व चहाला आधण ठेवले.हरीतात्याला चहा नकोच वाटत होता पण आपल्या नादाने त्या मायलेकरांना तरी मिळेल म्हणून तात्या म्हणाला,
"सगळ्यानलाच ठीव गं...सकाळपास्नं काय खाल्लं-पिल्लंय का निस्तच तोंडभांड करत दिवस घालवला?"
"तात्या,माझं कर्मच फुटकं हाय त्यला कोण काय करणार?"
"बबन्या कुठं गेला?"
"त्या हणम्यानं न्हेला फुडं घालून चाकरी धरायला.बसून खावून त्यला लय सूचाय लागलं हुतं.माझं त्वांड येकदा काळं केलं म्हंजी सगळं रांक्कीला लागंल."
"असं बोलुनि सुगला..." हरीतात्या समजावणीच्या सुरात म्हणाला.
    त्यावर उसळून सुगला म्हणाली,
"मग काय पूजा करु का त्यजी?नवरा असला म्हनून काय झालं?नवऱ्यासारखं वागाया नगं का तात्या त्यनं?"
"अगं व्हय खराय समदं...पण भांडाण कशापाय झालं?"
"हं,च्या घ्या...सांगून काय उपेग न्हाय बघा तात्या.ह्यजी चाल कडंलाच जाणार!"
     तात्याच्या हातात चहा देऊन सुगला पुन्हा आपल्या जागेवर जावून बसली.गणा पण भेदरुन तिथेच वळचणीखाली टेकला.
"ए काळतोंड्या,हिकडं खप की वळचणीखालनं...इदुळा वळचणीखाली बसुनि म्हनून किती येळा सांगायचं तुला?"
    आधीच भेदरलेला गणा गुपचुप ऊठून दुसरीकडे जावून बसला.चहाचा कप तोंडाला लावणार एवढ्यात तात्याच्या लक्ष्यात आले,
"अगं सुगला,तू बी घी च्या आन् पोराला बी दी...तरच मी पितू बघ!"
"ह्ये बघा असं गिन्यान गेल्यावनी हुतं!च्या वतून ठिवलाय पर प्यायचाच ध्येनात न्हायी."
     सुगला ऊठली.घरात गेली.एक कप गण्याला आणून दिला.घरात जावून ती चहा पिवून पुन्हा बाहेर येऊन बसली.
   चहा संपता संपता तात्याने विचारलं,"बरं आता सांग,काय तरास हाय तुला?"
    कुठून सुरुवात करावी हेच तिला कळेना.
    आज सकाळीच बबन गावात जावून माघारी आला होता.रोजच्याप्रमाणे त्याचा चेहरा आज सुतकी दिसत नव्हता तर चांगला टवटवीत वाटत होता.सुगला घरात भाकरी थापत होती.धूराने तिचे डोळे कचकच करत होते.त्यामुळे बबनचा उजळलेला चेहरा तिला नीट दिसू शकला नाही.आल्या आल्या बबनने सवयीने डेऱ्यावरचा तांब्या उचलला.बाहेर जावून चूळ भरुन, हात धुवून जेवायला बसला.सुगलाही जेवण वाढण्यासाठी ताट शोधू लागली.
"व्हय गं?"
"काय?"
"न्हवं...मी काय म्हनतूया?"
"बोला की...मी आयकतीय.भाकर करपंल हिकडं!"तव्यातल्या भाकरीला पाणी लावता लावता ती बोलली.एका हातात ताट धरुन दुसऱ्या हाताने ती भाकरीला पाणी लावत होती.
"कालपस्नं सुप्रीला वैरण न्हायी..."
"बरं...जेवण करुन आणा मग कुठनंतर दोनचार पेंढ्या."
"तसं न्हवं,आता पाऊस ना पाणी...असल्या दिसात कोण कुणाला दितूय चार दोन पेंढ्या?सगळ्यांची सारखीच बोंब."
    सुगलाने तव्यातली भाकर उलथली.आरावरची थोडी फिरवली.
"व्हय...व्हय,ते बी खरंच हाय.पर असं गप बसून कसं चालंल?कालपस्नं माझी सुप्री त्या उष्ट्या चिपाडावरच हाय."
"बरं...आधी वाढ तर.मघापस्नं नुस्तच हातात ताट घिऊन बसलीय."
"थांबा,भाकर भाजतीया!"
"अं...आज गावातला हाणमा गाठ पडला हुता....चांगुदादाचा."
"बरं..."
"आता धा वाजता यितू म्हनलाय."
"कशाला?"
"सूप्रीला इकून टाकावं म्हनतूया..." बबनच्या तोंडातून हे शब्द बाहेर पडतात न पडतात तोच सुगलाने हातातले ताट भिर्रर्रकन भिरकावून दिले.खणखणाट करत ताट अंगणात जावून पडले.आरावरची भाकर आरावर आणि तव्यातली भाकर तव्यात ठेवून सुगला उठली.तिच्या मस्तकाची शीर टरारुन फुगली होती.एका क्षणात सगळा भूतकाळ तिच्या नजरेसमोर येवून गेला.......
     रंगाने निमसावळी असली तरी नाकीडोळी नीटस आणि कामात हरिणीसारखी चपळ असलेल्या सुगलाला पदर आला तसा तिच्या आईने रकमाने सुखदेवच्या मागे स्थळे बघण्याची हुटहूट लावली.पोरीचे लग्न वेळच्या वेळी व्हायला हवे असे रकमाचे म्हणणे होते.पोरीच्या जातीला जीवापलिकडे जपावे लागते हे ही तितकेच खरे पण सुगला आता कुठे पंधराची झाली होती.एवढ्या लवकर लग्न करुन पोरीच्या जन्माचे वाटोळे कशाला करायला म्हणून सुखदेवने 'व्हय...व्हय' म्हणत रकमाची समजूत काढली होती.आता नववी आणि पुढच्या वर्षी दहावी.नववी तर संपल्यातच जमा होती.अजून एका वर्षाने काय होतेय?बघू... दहावी झाल्यानंतर स्थळे शोधायला सुरुवात करु.इकडे तिकडे बघता बघता ती दोन वर्षेही निघून जातील असा सुखदेवचा सरळसाधा हिशोब होता.
     सुखदेव जरी चौथीच्या पुढे शिकला नव्हता तरी व्यवहारात मात्र फारच हुशार होता.गावातल्या जगूची नीला...किती चुणचूणीत पोरगी होती.पण लहान वयात लग्न केले आणि पोरीला पुरते आयुष्यही बघायला मिळाले नाही...बाळंतपणात गेली ती.तेव्हापासून सुखदेवने मनात पक्के ठरवले होते कि सुगलाच्या बाबतीत आपण ही चूक करायची नाही.
     काळाला वेसण नाही.बघता बघता सुगला बऱ्यापैकी गुणांनी दहावी पास झाली.इतर मुलींप्रमाणे आपणही पुढे शिकावे असे तिला वाटत होते.पण पाठीवर पाय देवून आलेला सुमित आता आठवीत जाणार होता. तालुक्याच्या गावचा एकटीच्या शिक्षणाचा खर्च सुखदेवने कसा बसा केला होता.आता दोघांचा खर्च करायचा म्हणजे बापाला झेपण्यासारखा नव्हता.त्यापेक्षा आपणही आईबापाला मदत करुन सुमितच्या शिक्षणाला हातभार लावावा असे तिने मनोमन ठरवले होते.रकमाला पण आता सुगलाने शिकू नये असेच वाटत होते.तिची काळजी वेगळीच होती.शेवटी होय नाही करता करता सुगलाचे शिक्षण बंद झाले आणि ती रकमाबरोबर खुरपण-टुरपण करु लागली.आधीही सुट्टीच्या दिवशी आईबरोबर काम केलेले असल्याने तिची कसलीच कुरकुर नव्हती.
     मध्यतरीच्या काळात एक दोन स्थळे येवून तिला बघून गेली होती.त्यातल्या एका स्थळाला रकमाचा होकार होता पण सुखदेवला ते स्थळ काही पटले नव्हते.पोरगा एकुलता एक होता.आई त्याच्या लहानपणीच वारली होती.व्यवहारचतूर सुखदेवने आतल्या गोटातून चौकशी केली तेव्हा समजले कि त्याच्या बापाने दुसरे लग्न जरी केले नसले तरी गावातल्याच एकीबरोबर त्याचे संबंध होते.सुखदेवने स्पष्ट नकार कळवला.
     बघता बघता दीड-दोन वर्षांचा काळ लोटला.या काळातही दोन-चार ठिकाणचे पाहुणे येवून गेले होते.पण सुगला काळी असल्याचे कारण पुढे करत त्यांनी काढता पाय घेतला होता.
    एक दिवस नात्यातीलच एकाने स्थळ आणले.आई-बापाला एकटाच असलेला बबन दिसायला खास होता.त्याचीही रडतखडत का होईना पण दहावी झालेली होती.पदरी चार एकर जमीन होती पण ती नुसतीच नावाला होती.जिराईत असल्याकारणाने पिकवली जात नव्हती.बबनचे आई-बाप मोलमजूरी करत होते.पण पैसा पाळून होते.बबनही तालुक्याच्या ठिकाणी साधी भादी नोकरी मिळवण्याचा खटाटोप करत होता.ती माणसेही माणूसकीची होती.नारळ आणि मुलगी या अटीवर ते लग्नाला तयार झाले आणि सुपारी फुटली.
      "बरं झालं बाई,एकदाशी जमलं.माझ्या जीवाचा घोर संपला!" रकमा आनंदाने म्हणाली.
"व्हय तर काय...पोराला सुपारीच्या खांडकाचंसुद्दा व्येसन न्हाय."
"आता येवढीच सल मनात हाय कि पोरीच्या नशिबातलं खुरपं सुटलं न्हाय.पर कुठं तर करुनच खायाचं हाय."
"अगं,आज ना उद्या हुईल चांगलं.खावून पिवून सुखी हायती ती माणसं आताच.आपल्याला तर एका टायमाची भाकर बी मिळत न्हवती.आपुन केलंच की काम.आन् आपलं बी दिवस सरलं का न्हायतं मागं?"
"व्हय बाय,खावून पिवून सुखी ठिवलंय देवानं...तिजं बी हुईलच की कल्याण!"
"व्हय तर काय!उकंड्याचा बी पांग फिटतू.इन-इवाई अजून धडधाकट हायती.ती दोघं आन् ही दोघं...साऱ्यांनी मिळून केलं तर बंगला बांधत्याली बंगला."
     आई-बापाची ही चर्चा चालू असताना सुमित आणि सुगला जवळच झोपले होते.सुमित झोपी गेला होता पण सुगला या गप्पा ऐकता ऐकता वेगळ्याच दुनियेत रमली होती.अंगावरुन मोरपीस फिरत होते.आजपर्यंत कधीच न जाणवलेली हुरहुर मनाला आता जाणवू लागली होती.ओढ ओढ म्हणतात ती हीच का?हृदयाचा ठोका थोडा वाढला होता.कानशिले गरम झाल्यासारखी वाटत होती.सुगलाने कुस बदलली आणि नव्या नवतीच्या स्वप्नात रंगून गेली.
     सुगला जेव्हा रानात कामाला जायची तेव्हा बायातली एखाद-दुसरी म्हणायची,
"अगं सुगले,येवढी शिकली सवरली तू पर तुज्या जीभंचं वळाण काय सुटलं न्हाय बघ."
"धुरपाक्का...शिकलं म्हंजी शुद्धच बोल्लं पाह्यजे असं नसतं."
"पर नवरा शिकल्याला मिळाला म्हंजी तुझं बोलनं आयकूनच उताणा पडायचा!"
"पडू बापडीचा,पर एक सांगू का? जसं कडंचं वातावरण असतं तशी माणसाची भाषा असती."
"व्हय...व्हय...येकदम खरं हाय!"
       आणि आज तो दिवस उगवला होता.लाख स्वप्ने उराशी बाळगून सुगलाने बबनच्या दाराचा उंबरा ओलांडला होता.माहेर सोडून सासरला येताना आई,बाप,भावाला दुरावल्याचे दु:ख होते तर जोडीदाराला भेटण्याची एक अनोखी आस होती.
      खूप कौतुक झाले सुगलाचे त्या घरात.सासू-सासरे तर हिच्या स्वभावाला इतके भाळले कि त्यांनी तिला कुठे ठेवू आणि कुठे नाही असे केले.ती खरेच देवमाणसे होती.बबन तर तिचा पदरच सोडत नव्हता.दिवस म्हणत नव्हता...रात्र म्हणत नव्हता,सारखा तिला खेटूनच बसायचा.सुगलालाही ते हवेहवेसेच वाटत होते.
     नव्याचे नऊ दिवस संपले आणि बबन काम बघण्यासाठी बाहेर पडला.दिवसभर बाहेरच रहायचा आणि संध्याकाळी घरी यायचा.
    सुगलाच्या मनात संशयाची पाल चुकचुकायची.
"आवं,दिवसभर कसलं काम हुडकत असता?"
"अगं,कुठल्यातरी दुकानात काम मिळतंय का बघतूय."
"दुकानापशीच काय हाय?दुसरी कामं न्हायती का?"
"हायती की....पर आपल्या बापजल्मी कधी आपुन तसली कष्टाची कामं केली न्हायती."
"असं म्हनून कसं चालंल?पडंल ती काम करावं माणसानं."
"छ्या..छ्या!व्हायला तर नकं का?"
    हल्ली रोजच असे घडू लागले.हातात पैसा होता तोवर चंगळ होती.आता खायचे वांदे उठण्याची वेळ आली तरी बबन अजून कामच शोधत होता.सासू-सासरे मिळेल तिथे कामाला जातच होते.पण खर्चाची बाजाबूज तेवढी होत होती.सासू-सासऱ्यांनी कामाला जायचे आणि आपण घरी बसून आयते खायचे हे सुगलाच्या मनाला पटेना.ती एक दिवस म्हणालीच,
"आत्त्या,मी बी येती आजपस्नं तुमच्याबरुबर..."
"अगं सुगला,लोकं नावं ठिवत्याली आमाला."
"ठीव द्या ठिवली तर...लोकं काय आणून देत्याती का?...मी येणारच," सुगला हट्टाने म्हणाली.
"यितीय तर चल बाय."
      वर्ष सरत आले...डोहाळ्याची चाहूल लागली तरी बबनला काम काही भेटले नाही आणि त्याचा शोधही काही संपला नाही.दिवसभराच्या कामाने सुगला शिणून जायची.पुन्हा रात्रीचा त्रास वेगळाच.पण सुगलाने कंबर बांधली होती.येणाऱ्या जीवाची ती वाट पाहत होती.आज नाही उद्या तरी बबन सुधारेल असे ती स्वत:च्या मनाला समजावत होती.
    पहिले बाळंतपण म्हणून सुखदेवने सुगलाला माहेरी आणले.बबनही अधून मधून येवून जायचा.पण महिना झाला तरी बबन एकदाही आला नाही म्हणून सुगलाला काळजी वाटत होती.सुखदेव रकमाही जावई कसा काय आला नाही म्हणून सुगलालाच विचारत होते.पण आपल्या नवऱ्याचा प्रताप तिने एका शब्दानेही त्यांना कळू दिला नव्हता.
      दिवस संपले.मुलगा झाला.सव्वा महिन्याने सुखदेवने मोठ्या थाटात बारसे घातले.गणेश नाव ठेवले आणि एक दिवस बबन तिला न्यायला आला.
      सासू-सासऱ्यांना नातवाचे भारी कौतुक.बाप झाल्यावर आता तरी बबन्या सुधारेल ही त्यांची वेडी आशा..!
     गण्या वाढत होता...वाढता वाढता आता दुसरीत गेला.पण बबन सुधारेल ही आई-बापाची वेडी आशा काही फलद्रुप झाली नाही.आणि तो काळा दिवस उगवला.....
        कधी एक रुपयाही घरी न आणणारा बबन एक दिवस दीड लाख रुपये घरी घेऊन आला.सुगलाच्या काळजात चर्रर्र झाले.एवढे पैसे बघून सासू-सासरे हबकून गेले.कुठे चोरी केली की काय या भीतीने सासऱ्याचे हृदय बंद पडले....
     कसे बसे पैसे घरात नेवून ठेवले तोवर सासू बेशुद्ध पडली.सुगलालाही नेमके काय घडतेय हे कळेना.काही कळायच्या आतच त्या दोन सत्शील जीवांनी इहलोकीची यात्रा संपवली.
    एकच आरडाओरडा सुरु झाला.कसे काय झाले असे?बबनही कोसळला होता पण आता हे तारून नेणे भाग होते.म्हातारीही संपल्याचे पाहताच तो पुरता हादरला होता.सगळे खापर आता आपल्याच मस्तकावर फुटणार हे तर ठरलेलेच होते.पण  लोकांना कसे तोंड द्यायचे हे एकदा त्याने सुगलाला समजावून सांगितले.सुगला त्याच्या तोंडाकडे नुसतीच बघत राहिली.पैशापुढे माणूस एवढा निष्ठुर होतो?
    आरडाओरडा ऐकून लोक जमा झाले.बघून लोकही हळहळले.देवमाणसांनाच असे सोबत मरण येते असे बाया-बापुड्या म्हणू लागल्या.
"बबन्या...चांगली धडधाकट हुती दोघं बी.असं अचानकच कसं झालं?"
"काय सांगू आता तुमाला?....म्हाताऱ्याला 'अट्याक' आला न् म्हातारा गेला.दोन सेकंदात तर म्हातारी बी हबकून गेली.माझा सगळा आधारच तुटला...."
      जीवाला कुणाचा तरी आधार होता.पण तोही असा अचानक तुटलेला बघून एवढी खंबीर सुगलाही पार कोलमडून गेली.आज्जी-आजोबांना काय झाले म्हणून गणा सारखा विचारत होता.तसतसा सुगलाच्या काळजाला जास्तीच खडा टोचत होता.
     तेराव्याचे झाल्यावर सुखदेव त्या तिघांनाही घेऊन आला.त्या कठीण प्रसंगातही सुगलाला एका गोष्टीचे समाधान वाटत होते.ते म्हणजे अजून तरी कुणाची चोरी झाली म्हणून कानावर आले नव्हते.पोलिसही आले नव्हते.म्हणजे तो पैसा चोरीचा नव्हता.मग एवढा पैसा आला कुठून?
      दुसऱ्या दिवशी रकमा व सुखदेव गणाला घेऊन रानात गेले होते.सुमितही घरी नव्हता.हे बघून सुगलानेच विषय काढला.
"एवढं पैसं कुठनं आणलं?"
पहिल्यांदा या प्रश्नाने बबन दचकला.पण नंतर सावरत म्हणाला,
"काय म्हणणार नसशिल तर सांगतू.."
"आत्ता राह्यलंय काय?काय म्हनन्यासारखं?"
"त्ये पैसं मला मटक्यावर मिळालं हुतं."
"त्ये काय असतं अजून?"
"डावावर जसं पैसं मिळत्यातं तसंच मटक्यावरबी मिळत्यातं."
"अगं बाई...असला उद्योग सुरु केला व्हय?आधीच संसारात ध्यान न्हाय....." तिला जास्त बोलू न देता बबनने आपले म्हणणे पुढे रेटले.
"अगं धा रुपैला नौशे रुपै मिळत्यातं...मी येकदमच दोन हजार रुपै लावलं हुतं.येक लाख न् वर आंशी हजार आलं.तीस हजार उधारी हुती मटक्याची ती दिली.दीड लाख घरी आणलं.कोण द्याय लागलाय येवढं पैसं फुकट?"
"त्या तसल्या पैशाला काय जाळायचाय व्हय?सोन्यासारखी दोन माणसं हाताहाती गिळली त्यनं..."
"पर असं हुईल म्हनून मला काय सपान पडलं हुतं व्हय?"
"लोकास्नीचा तळतळाट भवला.."
"बरं मी आत्ता जातू घरला म्हागारी.त्ये पैसं तसंच घरात हायतं.त्ये मोठ्या ब्यांकीत न्हिवून ठिवतू.पर तू कुणाला म्हागचं काय सांगू नगं!"
"काय करायचाय ती करा,मला काय त्यजं?"
     सासरवाडीवरुन बबन गावी आला.आता तर त्याला रान मोकळेच होते.
     रानातून आलेल्या सुखदेवला जावाई न सांगताच गेल्याचे पाहून आश्चर्य वाटले.
"चार दिवस सुखा-दुखासाठी जावयाला आणलं पण जावाई लगीचच कसा काय गेला गं सुगला?" 
बापाने असे विचारताच सुगलाला भडभडून आले.आजपर्यंत आपल्या पोटात दडवून ठेवलेले सगळे दु:ख-कष्ट आई-बापासमोर घडाघडा ओकून टाकले.जावयाच्या ऐतखाऊपणाचे नमुने ऐकून रकमा व सुखदेव हादरुन गेले.पोरीने एवढे कष्ट सोसले पण एका शब्दाने कधी आपल्याला कळवले नाही याचा त्या दोघांनाही राग आला.
"तुझा बा अजून जित्ता हुता की...फकस्त एकदा तरी या तोंडानं सांगायचं हुतं?" रकमाने सुगलाला फैलावर घेतले.
     सुगला बिचारी काय बोलणार?गप्प बसून राहिली.
    सुखदेवने मग आपल्या लेकीची व नातवाची चांगली वास्त-पुस्त ठेवली.सुगलाला आता घराकडे जायची ओढ लागली होती.आई-बापाच्या घरी पाहुणचारापुरते राहणे ठीक आहे.आता आपल्या घरी गेलेच पाहीजे.आणि तिने घरी जायची तयारी सुरु केली.
          ...............
बबन घरी आला.तलाठ्याची गाठ घेऊन त्याला गब्बर चिरीमिरी दिली.तलाठ्यानेही तडकाफडकी म्हाताऱ्याच्या नावावर होती ती जमीन बबनच्या नावावर करुन दिली.
     मटक्याचा किडा अजून डोक्यात वळवळतच होता.तो तालुक्याच्या ठिकाणी रोज जात होता.तिथे जुगार,मटका खेळत होता.गावात याची कुणालाच साधी कुणकूणही नव्हती.त्याने आजपर्यंत किती पैसे कमवले व किती गमवले हे फक्त बबन आणि त्या मटका घेणाऱ्यालाच माहीत होते.पैशाच्या हव्यासापोटी माणूस या मटक्याच्या जाळ्यात अडकून अधिकच कंगाल होतो.बबनचेही तसेच झाले.एक लाख ऐंशी हजार मिळाले...अजून मिळवू...अजून मिळवू म्हणण्याच्या नादात महिनाभरात बबनने एक लाख चाळीस हजाराला पाणी पाजले.बदल्यात फक्त पंधरा हजार हाती आले.गेलेले पैसे वसूल करण्यासाठी पुन्हा होते ते पंधरा हजारही संपवले.पण लक्ष्मी तीन-तीनदा प्रसन्न होत नसते हे त्याला कळत नव्हते.रोख पैसा संपल्यानंतर उधार खेळ सुरु झाला.दोन हजाराचा फिगर बसल्यापासून मटका घेणाऱ्या महादेवचाही बबनच्या लाईनवर पक्का विश्वास बसला होता.उधारी आज ना उद्या एका झटक्यात वसूल होईल असे महादेवलाही वाटत होते.म्हणून तो उधार मटका घ्यायला नाही म्हणत नव्हता.
     चवली पावली आल्यासारखी वाटायची पण पुन्हा जोमाने खेळायला ती भाग पाडायची.बघता बघता पन्नास हजार... एक लाख अशी उधारी वाढतच गेली.
    शेवटी महादेव बबनला म्हणाला,
"ह्ये बघ बबन, आधी ही उधारी सार...मगच पुन्हा खेळ."
"आरं म्हादा,तू काळजीच करु नगं...आजचा फिगरच असा टाईट हाय की तू बी निल आन् मी बी मालामाल."
"त्ये खराय रं,तुझ्या लाईनी डेंजर असत्यात्या....पण समजा नाहीच फिगर बसला तर काय करायचं?"
"शंभर टक्का बसणारच...ओपन बघ कसा हालगी वाजवत यितूय ती!आन् न्हायच आला तर ही सातबारा उद्या तुझ्या नावावर."बबनने खिशातला सातबारा महादेवसमोर अक्षरश: फेकला.
    महादेव मनातून चरकला.बबनबद्दल त्याला फार वाईट वाटत होते.पण या धंद्यात भावनेला थारा नसतो.
"बरं,सांग."
"ओपन टाक पंचवीस हजाराचा,पाना टाक पाच हजाराचा आन् फिगर कर वीस हजाराचा.दीड लाखाची लेवल लागतीय मजी."
     महादेवच्या डोळ्यापुढे आता बबनची जमीन दिसू लागली होती.
........आणि ती महादेवची झालीही होती!
   आता फक्त राहती जागा तेवढी शिल्लक राहिली होती पाच-चार गुंठे.गावाला याबाबत काही माहिती असण्याची शक्यताच नव्हती.
     महिना-दीड महिना माहेरी राहून सुगला घरी आली.सोबत सुखदेव पण सोडायला आला होता.खरे तर जावयाला चार दोन हिताच्या गोष्टी सांगाव्या म्हणून तो सोबत आला होता.
       घराची पार रया गेली होती.छप्पर असले तरी माणसाच्या वावराने त्याची शोभा वाढते.पण सुगलाच इथे नव्हती म्हणल्यावर दुसरे काय होणार?अंगण उलून दाणादीन झाले होते.सासू सासऱ्याच्या खुणा अजून बुजल्या नव्हत्या.सुगलाने घर उघडून झाडलोट केली.भांडी धुतली व चहा ठेवला.बबनचा पत्ता नव्हताच.तिने पैसे ठेवलेला डबा उघडून पाहिला.धूळीशिवाय त्यात दुसरे काहीच नव्हते.ठेवले असतील बँकेत म्हणून तिने तिकडे दुर्लक्ष केले.गणाला व सुखदेवला चहा देवून ती पण चहा पीत बसली.एवढ्यात बबन आपल्याच नादात खाली मान घालून घराकडे येत असलेला तिला दिसला.ही चाल तिला जरा कशीशीच भासली.तिच्या काळजात धस्स झाले.आसपासच्या वस्तीवरील लोक त्याच्याकडेच पाहत होते.किती दिवसांनी बबन घराकडे येतोय म्हणून हसत होते.आणि अचानक बबनचे लक्ष्य समोर गेले.सासरा व बायकोला पाहून तो तिथेच घुटमळला.पुढे यायचे त्याला धाडस होईना.
"बबन पावणं...या की!तुमचंच घर हाय."
"......" बबन एक नाही की दोन नाही.
तेवढ्यात गण्या बापाला जावून चिकटला व त्याला ओढत घेऊन आला.गण्याला पाहताच बबनच्या पोटात कालवाकालव झाली.आपल्या कृत्याचा त्याला पश्चाताप झाला.येवून वसरीवर बसला.काही बोलला नाही.
    थोड्या वेळाने ऊठला आणि थेट सुखदेवच्या पायावर लोटांगणच घातले.सुगला काय समजायचे ती समजली.नवऱ्याने सगळ्या पैशाचा इस्कोट केला हे तिला न सांगताही कळले.पण सुखदेवला काही समजेना.त्याने जावयाला हाताला धरुन उठवले.
"पावणं,काय झालंय ती तर कळूद्या!"
"मला माफ करा...हितनं फुडं असं वागणार न्हाय..." आणि बबनने पश्चातापाने दग्ध होत सारी कहाणी सांगितली.सुगला डोक्याला हात लावून बसली होती.तिच्या डोळ्यापुढे गण्याचे भवितव्य रडताना दिसत होते.हतबल...हतबल झाली होती सुगला!
     सुखदेव ही चाट पडला होता हे सर्व ऐकून.आपली लेक पै-पै साठी मर-मर मरते आणि हा जावई....?
      कितीही राग आला असला तरी झाल्या गोष्टीला काही पर्याय नव्हता.सुगलाला माहेरी नेवून आपणच सांभाळ करावा असे सुखदेवला वाटू लागले.पण हे असे कुठपर्यंत चालणार?आता बबनला चांगलेच पोळले आहे तेव्हा तो नक्कीच सुधारेल असा विश्वासही वाटत होता.
    गेलेली जमीन माघारी घ्यावी एवढी सुखदेवची ऐपत नव्हती.पण व्यवहारचतूर सुखदेवच्या डोक्यात एकदम प्रकाश पडला.त्याला थोडी आशा वाटली.
"ह्ये बघा पावणं,झालं ती झालं.हितनं फुडं जर असं काय घडलं तर मी पोलिसात फिरयाद दीन."
"न्हाय मामा,आता तुमी सांगंल तसं वागतू..." बबन दयावया करत म्हणाला.
" बरं बरं...सुगला,तुझ्या सासऱ्यानी तुझ्याजवळ ठिवायला दिल्याली ब्यांकेची पासबुकं आण बघू जरा भाईर."
     सुगलाच्याही डोक्यात आता बराच प्रकाश पडला होता.तिने घरात लपवून ठेवलेली पासबुके बाहेर आणली.दैवच बलवत्तर म्हणायचे...दुसरे काय?पासबुकावर तब्बल दोन लाखाच्या आसपास रक्कम निघाली.
       लगेच माघारी जायच्या विचाराने आलेला सुखदेव घराकडे येत नसल्याचा निरोप पाठवून सुगलाच्या घरीच थांबला.बबनला सोबत घेऊन महादेवची गाठ घेतली.महादेव जमीन परत करायला तयार झाला.
"मामा,माझं पैसं मिळाल्यावर मला काय हरकत हाय वो जमीन परत द्यायला?पर बबन्या,पुना या चिखलात पडु नगं गड्या.लय वाईट नाद हाय ही!"
बबनने मान डोलावली.
    आधीच सर्व कागदपत्रे काढून ठेवल्यामुळे जमीन महादेवच्या नावावर झालीच होती.आता तीच कागदपत्रे बँकेत दाखवून वारस सिध्द करुन पैसे काढायचे होते.
    सगळ्या किचकट बाबी पार पडून दहाव्या दिवशी पैसे हातात पडले.दीड लाख महादेवला देवून जमीन गण्याच्या व सुगलाच्या नावावर केली.
    सगळे निस्तरुन झाले.सुखदेव घरी जायला निघाला.
"उद्या अजून यीन मी."
"बर," सुगला म्हणाली.
"उद्या येताना ती आपली रेडी घिऊन यीतू.आता धाव्वा संपत आलाय.चांगली खाण हाय...आता येवस्थित करुन खावा."
असे म्हणुन सुखदेवने निरोप घेतला.
       ...................
पहिल्याच वेताला सुप्रीने एका टायमाला घसघसीत चार लिटर दुध दिले.तिच्या वैरण पाण्यातच दिवस जात होता.दुसऱ्याची मजूरी करायची गरजच पडली नाही.सुप्रीने सुगलाचा संसार चालवला होता.रतिबाला दूध घालून पैसे मागे पडत होते.सुगलाच्या जीवाचा घोर संपला होता.सुगला सुप्रीला खूप जीव लावायची.सुप्री नावही तिनेच ठेवले होते.सुप्रे म्हणून हाक मारली की ती ओरडून उत्तर देत होती.इतका सुगलाने तिला जीव लावला होता.बबनही आता सुधारला आहे असे वाटत होते.
      तीच सुप्री आता दुसऱ्यांदा नवव्यात होती.आणि दुष्काळामुळे तिची वैरण पाण्याची तारांबळ होत होती.काहीतरी करुन सुगला सुप्रीला वेळच्या वेळी पोटभर खावू घालण्याची कसरत करत होती.पण कालपासून तिची थोडी आबाळच झाली होती.आणि आज बबन म्हणत होता,
"सुप्रीला इकून टाकावं म्हनतूय."
     आता मात्र इतकी वर्षे बाळगलेला सुगलाचा संयम सुटला.हातातला तांब्या भिर्रकन भिरकावून ती गरजली,
"तिज्या जीवावर प्वॉटभर खायाला मिळत हुतं तवर इकायचं ध्यान झालं न्हाय?आजच दोन चार पेंढ्या आणा म्हणलं तर लगीच इकून टाकू म्हनं!"
"ह्ये बघ,मला देणं झालंय म्हनून इकायची हाय."
    देणं हा शब्द बबनच्या तोंडून ऐकताच सुगलाच्या तळपायाची आग मस्तकाला गेली.आधीच काय कमी उपद्व्याप करुन ठेवला होता काय?तो कसातरी बापाने निस्तरला होता आणि हा म्हणतोय देणे झालेय.ती आता मात्र एकेरीवर आली.
"अजून कश्याचं देणं केलं?निवांत बसून फुकट खायाला मिळत हुतं तेवढं खाव वाटलं न्हाय का?अजून कुठं गेला हुता माज जिरवायला?"
"ये थोबाड फोडीन...लय त्वांड सोडू नकं.मटक्याचं झालं देणं... पर आता तुझ्या बापाचा रुबाब हितं दाखवू नकं."
"माझा बाप हुता म्हणून तर निस्तारलं सगळं.न्हाय तर भीक मागत फिराव लागलं असतं."
"व्हय...व्हय...माझ्याच बाचं पैसं घिऊन जमीन सोडवली तुझ्या बा नं.आन् त्यजा रुबाब कश्याला सांगती मला?त्यनं तर वाटूळं केलं जमीन तुमच्या नावावर करुन.आता सुप्रीला इकलं म्हनून काय झालं?"
"तुझ्या तोंडाला आग लागूदी तिकडं...आता खादगीला मिळणार न्हाय की ह्या घरात थारा मिळणार न्हाय.लय झालं तुझं कवतूक."
"ये थोबाड फोडीन...नीट बोल."
"आधी चार टिकल्या कमवायचं बघ...मग त्वांड फोड.मी हाय म्हनून दोन टायमाला गिळायला तर मिळत हुतं."
     तोंडभांड वाढत गेली आणि दहा वाजता नेमका हणमा आला.
"यी बाबा...जमीन झाली...मैस झाली...बाईल बी इकायची हाय.घितू का बघ?"सुगला तिरमीरीत बोलली आणि हणमा गोंधळून गेला.
"वैनी,काय बी कसं बोलता?ह्या बबन्यानं गळ घातली म्हनून आलू..न्हायतर कश्याला यितूय?जातो बाबा म्हागारी पर उगंच तोंडभांड करु नका.ये बबन्या...चल.तुला कसं फेडायचं हाय तसं फेड मालकाचं देणं.मला आज्याबात काय सांगायचं न्हाय."
"घिऊन जा त्यला.सगळं देणं फिटोस्तोर रातंध्या राबवून घ्या.म्हंजी मटका खेळावा का नगं ती कळंल."
.....आणि हणमा बबनला ओढत नेल्यासारखा घेऊन गेला.बबन सुगलाकडे डोळे लालभडक करुन बघत होता.पण ती आता त्याला घाबरणार नव्हती की दयामायाही दाखवणार नव्हती.
        ................
".....तर तात्या,ही अशी सगळी चित्तरकथा हाय बघा.काय तर खावून झोपावं वाटतंय पर ह्या गण्यासाठी जीव अडकतूय."
     सगळी कहाणी ऐकून काय बोलावे हे हरीतात्याला पण कळेना.त्याला गहिवरुन आले.
"जीव दिवून ह्या पोराला वनवाशी करती व्हय गं?त्ये काय न्हाय...तू उद्यापस्नं यी वस्तीवर.बांधा-बुंदाला पनाळ्या मस वाढल्यात्या.त्या घिऊन येत जा तुझ्या सुप्रीला.आधी-मधी कवळाभर मकवान बी आणत जा....तुझंच हाय त्येबी घर."
    तात्याच्या बोलण्याने सुगलाला धीर आला.बबन परत येईल असे तिला वाटत नव्हते.पण मनाची पूर्ण तयारी करुन तिने तात्याला निरोप दिला आणि गण्याला सोबत घेऊन तशीच झोपी गेली.
     रोजच आभाळ भरुन येत होते पण पाऊस काही पडत नव्हता.आज तर ऊनपण सकाळपासूनच तावत होते.आभाळ अजून आले नसले तरी येण्याची शक्यता होती.कारण ते रोजच येत होते.सुगलाने गण्याला शाळेत पाठवण्यासाठी जेवण तयार केले.त्याला शाळेत पाठवून तिनेही दोन घास खाल्ले.सुप्री शहाण्यासारखी गप्प होती.पोटात काही नसूनही ओरडत नव्हती.
     विळा व धडूप घेऊन ती तीन कोसावरच्या हरीतात्याच्या वस्तीवर गेली.तात्याने आधीच सर्वांना सांगून ठेवल्यामुळे गेल्या गेल्या सरुने सुगलाला आधी बळेबळे जेवू घातले.मग दोघी मिळून पन्हाळ्या कापायला गेल्या.तासा-दीडतासात खच्चून ओझे झाले.सुगलाला तर आता घरी कधी जाईन आणि हा लोण्याचा गोळा सुप्रीपुढे कधी टाकेन असे झाले होते.सरुने ओझे उचलून सुगलाच्या डोक्यावर दिले.एवढे ओझे ही बिचारी तीन कोसावर कशी नेणार हा प्रश्न तिला पडला होता पण ती काहीही करु शकत नव्हती.
      आभाळ भरुन आले होते.सुगला डोक्यावर ओझे घेऊन सुप्रीच्या ओढीने झपाझप पावले टाकत निघाली होती.दोन कोस कशी तरी चालली आणि तिची मान पाठ भरुन आली.पाय वाकडे तिकडे पडू लागले.चाल बेढब झाली .त्यात वाराही सुटला होता.घशाला कोरड पडली होती पण इथे निर्जन वाटेवर ओझे खाली टाकावे तर पुन्हा उचलून कोण देणार?म्हणून ती तशीच चालत राहिली.दहा मिनीटाच्या अंतरावर सावताची वस्ती होती.तिथे टेकू असा विचार करुन सुगला जीवाच्या कराराने चालत राहिली.कधी नव्हे तो आज आभाळाला पाझर फुटला होता.वाऱ्याचा जोर वाढला होता.पावसाचे थेंब पडल्याचे जाणवत होते.सावताचे घर आले आणि सुगलाने डोक्यावरील ओझे खाली टाकले.सावताच्या घरासमोर एक झाड होते.त्या झाडाखाली ती येऊन बसली.ऊर धपापत होता.तिला तशा अवस्थेत बघून शकुंतलाने पाण्याचा तांब्या भरुन आणला.सुगला बेताबेताने पाणी प्याली.तोवर सोसाट्याच्या वाऱ्याबरोबर मोठे मोठे थेंब पडु लागले.
"ए सुगला,चल बाय आत...!" शकुंतला म्हणाली आणि दोघी घरात जावून बसल्या.
       बाहेर धो-धो पाऊस कोसळत होता.मध्येच वीजांचा कडकडाट होत होता.त्या आवाजाने सर्वांच्याच काळजात धस्स होत होते.
   अचानक कडक्कन एवढे जोरात वाजले की जमीन हादरल्यासारखे झाले.
"इज पडली बघ कुठंतर..." सावता अनुभवाने म्हणाला.
      पावसाने तासभर नुसता धुमाकूळ घातला होता.आता जरा उघडला होता तोवर घर गाठावे म्हणून सुगलाने सावताकडून गवताचे ओझे उचलून घेतले.भिजून ते जास्तच जड लागत होते पण घर आता फार लांब राहिले नव्हते.अजून दहा मिनिटे चालले की आलेच आपले घर.माझी सुप्री केव्हापासून माझी वाट बघत असेल असा मनाशीच विचार करत सुगला घराच्या दिशेने झपाझप निघाली होती.घर डोळ्याच्या आवाक्यात आले...आणखी जवळ आले...आणखी जवळ आले.बघते तर माणसांचा घोळका तिच्याच घरी जमला होता.काही आरडाओरडा नव्हता म्हणजे भांडण तर नव्हते.मग काय झाले असेल? नवऱ्याने तर काही करुन घेतले नाही ना?....तिचे मन चरकले,पण क्षणभरच...मरु दे मेला तर...असून तर काय उपयोग त्याचा?मेलेलाच बरा...
    ती घरी पोहोचली.डोक्यावरचे ओझे खाली टाकले.
"काय झालं?"
"इज पडली.."
तिची नजर सुप्रीवर गेली....
"सुप्रेsssssss....." 
काळीज पिळवटून टाकणारा आवाज आभाळ चिरत गेला आणि सुगला धाडकन् गवताच्या ओझ्यावर कोसळली.

©सर्व हक्क लेखकाधीन
©अनिल सा.राऊत
9890884228
anandiprabhudas@gmail.com

Comments

  1. प्रति,
    अनिल सा.राऊत
    सुगला कथा खूपच छान!खूपच सुंदर writing आहे तुमची...
    खरंच...मटक्याच्या,दारुच्या नादी लागून माणसांनी संसाराची होळी केली आहे...शेवटी तर खुपच senti झाले मी!
    आणि काही संवाद तर थेट हृदयाशी भिडतात....खूप सुंदर!!!

    :.:.:.:.: रुपाली पवार :.:.:.:.:

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

सावधान..! शिक्षणाच्या गंगेत राजकिय गटाराचे पाणी मिसळतेय!

सलाईन

सरपंचाचा जीआर