एक अनोखी लवस्टोरी




 प्रिय सोनुल्या,
                हॅप्पी बर्थ डे टू यू...
माझ्या शोन्या,तुला जन्मदिनाच्या लाख लाख शुभेच्छा!!
    तुझ्या जन्मदिनाच्या इव्हेंटला मी हजर राहू शकत नाही म्हणून स्वॉरी यार!परत भेटल्यावर मी याची भरपाई करेन.सध्या आई-बाबांचे भांडण सुरु आहे त्यामुळे मी थोडी अपसेट आहे.म्हणून तुला भेटायला येऊ शकत नाही.तू समजून घे रे...स्वीटू!
     ये नॉटी,मनातल्या मनात काय विचारतोस काय झाले म्हणून?तू तर माझ्या ह्रुदयात असा फिट्ट बसला आहेस कि तुझे मन मी इथे बसून ओळखू शकते.जा...तुला नाही विश्वास पटणार!तिकडे अजून कुणीतरी असेल ना...म्हणून माझे मन तुला कळतच नाही.जावू दे...फॉरगॉट इट...तू अस्साच माझ्या ह्रूदयात कायम रहा.आणि हो,मला पण तुझ्या ह्रुदयात अस्सेच जाम फिट कर.माझे पण मन तुला कळले पाहिजे ना!आता मी इकडे किती जळतेय तुला काय ठाऊक?काय शोन्या तू पण ना...नाही...नाही...तो स्टोव्ह वगैरे भडकून जळण्याचा हा वेडा प्रकार नाही.आणि वेड्या,आता साडीच कुठे असते रे पेटायला?...मी तर जीन्स पँट आणि शॉर्टसच घालते ना.त्यामुळे नो आग...नो  जाळ!समजले का मठ्ठा?तू तर ना...नुसता `हा' आहेस.बरे असू दे....
       त्याचे असे झाले,माझी आई ना...स्वारी!माझी मॉम ना खूपच मॉडर्न विचारांची आहे.तिच्या संस्कारातच मी लहानाची मोठी झाले.पण बाबा ना....अरेरेरे....अजूनही जुन्या युगातून बाहेरच आलेले नाहीत.संस्कार आणि नीतिमत्ता यांचेच सारखे डोस पाजत असतात.त्यांच्या विचारांना ऊंचीच नाही.सारखे तेच ते खुजे विचार आमच्या माथी मारत राहतात.आणि मॉमला तर त्यांचे हे वागणे अज्जिबातच आवडत नाही.मग खटके उडतात अधून-मधून!मला मात्र त्या कडाक्याच्या कोलाहलातही तुझ्या गोड आवाजाचेच सूर ऐकू येतात.
....तर आताच्या खटक्याचा विषय जरा वेगळा आहे.आपल्या दोघांच्या प्रेमलीला आमच्या या सडक्या मेंदूच्या बाबांच्या कानावर आल्यात आणि त्यांना ही आपली प्रेमलीला `लफडे' वाटतेय...नॉन्सेन्स विचार!अस्सा राग आला म्हणून सांगू...मॉमला स्पष्ट शब्दात मी फटकारले-`हे बघ मॉम,तू तुझ्या नवऱ्याला लवकरात लवकर आवर...मी काही आता लहान बेबी नाही.माझ्या शोन्यावर माझे हार्टली लव आहे. काहीही झाले तरी मी मागे हटणार नाही.आणि काय गं?व्हॉट मीन्स `लफडे'? आमच्या प्रेमाला लफडे म्हणताना त्यांच्या `टंगे'ला काहीच कसे झाले नाही? हे बघ मॉम,आता शेवटची वॉर्निंग देतेय तुला...त्यांना तुझ्यापरीने आवर!माझ्या पर्सनल लाईफमध्ये लुडबूड करायचा त्यांना काहीएक अधिकार नाहीए...!
         झाssले! मॉम आणि बाबांमध्ये स्पार्क उडाला ना...पण मॉम ना बॉम्ब आहे बॉम्ब...बाबांच्या बुरसटलेल्या विचारांना आणि संस्कृतीला तिने असे सँडलखाली तुडवले म्हणतोस ना...बाबांना तिने जाम झापले.बाबांचा राग पण पराकोटीला पोहोचला होता.पण करतात काय? `हे जगनियंत्या,मी हरलो रे बाबा आज...!' असे म्हणत देवघरात जे जावून बसलेत ते दोन दिवस झाले बाहेर नाही आलेत.त्यांचा तो देव त्यांना या आपल्या युगातल्या विचारांनी जगण्याची सद्बुध्दी देवो!
      काय म्हणालास? हं...अरे मला भेटणे जमले नाही.तू तरी कमीत कमी एखादा कॉल करायचास? नाहीतर वॉटस् अपवर मेसेज टाकायचास?...मी दिले असते ना सवडीने उत्तर...पण तुझे मुळी माझ्यावर प्रेमच नाही! ज्जा...मी नाही बोलणार तुझ्याशी!...कट्टी...!कट्टी...!!कट्टी!!!
      हं! नाही राहवत रे शोन्या तुझ्याशी बोलल्याशिवाय...मोबाईलवर तासनतास गुलूगुलू बोलत बसलो तरी माईंड समाधानी होत नाही बघ.कारण प्रत्यक्ष आपण जेव्हा भेटतो ना...तू बोलतच नाहीस काही,सारखा आपल्या खोड्या काढत रहातोस माझ्या.पण काहीही म्हण हां...प्रेम करण्यातला आनंद काही औरच असतो डियर...अंगावर मोरपीस फिरल्यासारखे वाटते!
     काय विचार करतोयस?लग्नाचा? कमाल आहे हां तुझीपण...अरे,लिव्ह इन रिलेशनशिपचा जमाना आलाय आणि तू लग्नाच्या गोष्टी करतोयस?खुळचटच आहे! दोन वस्त्रांच्या गाठी मारुन तांदळाचे चार दाणे डोक्यावर पडले म्हणजे झाले का लग्न? आपण असे फ्री माइंडेड...त्या तसल्या जूनाट बंधनात अडकण्यात मला तरी इंटरेस्ट नाही बच्चू...लाईफ एन्जॉय करायचे असेल तर माणसाने कसे रिलॅक्स-रिलॅक्स असायला हवे.लग्न करा...मुले जन्माला घाला...त्यांची शी-सू काढा...छी:छी:छी: मला नाही जमणार हे....
      बरे बाबा! स्वारी... मी करेन तुझ्याशी लग्न!हां...ते ही आहेच ना.आजपर्यंतच्या सगळ्या लवस्टोरीज अधूऱ्याच राहिल्या आहेत.लग्नाच्या निमित्ताने तरी आपली लवस्टोरी पूर्णत्वास जाईल हे तुझे म्हणणे अगदी करेक्ट आहे.पटतेय रे मलापण हे!पण काय आहे सांगू का?...लग्न केल्याने माझे स्वातंत्र्य धोक्यात येईल ना! हां...आहे त्यावरही उपाय...पण तुला पटेल की नाही माहिती नाही.तरीही मला खात्री आहे तुलाही पटेलच म्हणून...कारण तू ही माझ्यासारखाच ना!
       आधी तू त्या घाणेरड्या गावातली तुझी गाई-गुरे विकून टाक.नुसते नाव काढले तरी बघ मला कशी किळस येतेय ती...व्याsssक्....! कसा राहतोय काय माहीत त्या घाणीत?...डर्टी मॅन!आणि हो,तिथले ते सारे गायरानही फुकून टाक...शेतकरी नवरा मला नाही आवडणार!खूप पैसा येईल तुझ्या या इस्टेटीचा...तो पैसा घेऊन इकडे ये स्मार्ट सिटीत...इथे मस्तपैकी आलिशान बंगला घेऊ,आलिशान गाड्या घेऊ...मग काय!लाईफ तो झिंगालाला......
    काय म्हणालास?तुझे आई-वडील आणि भावाला घेऊन येतो म्हणतोस?तुला ना खरेच अक्कल नाही.आपल्या दोघांच्या मध्ये आता त्यांचे काही काम आहे का?आणि जर तुला कुणी मायेचे हवे असेलच तर ऑलरेडी माझी मॉम आहेच इथे.त्या म्हाताऱ्यांचा जर तुला एवढा पुळका येत असेल तर बाय...गुड बाय!मला पुन्हा तुझे काळे तोंड दाखवू नकोस!
     गंमत केली म्हणतोस? बरे...बरे!ऑलराईट...!!पण आता मी गंमत करत नाहीए,सिरीयसली सांगतेय...आपल्यातल्याच काही दयावान लोकांनी म्हाताऱ्यांसाठी वृध्दाश्रमांची खूप छान सोय करुन ठेवली आहे.त्यांना तिथे ठेवून तू एकटाच ये...तुझ्या भावाचा पण विचार करण्याची काहीएक गरज नाहीए...त्याचे  हातपाय धडधाकट आहेत!तू काय ठेका घेतलाय का साऱ्यांना पोसण्याचा?
     आणि हो,ती तुझी हार्मोनियमची पेटी-बिटी पण आता आणण्याची गरज नाही...इथे डीजे सिस्टीम आहे...ढ्यँणsssढ्यँणsssढ्यँणsss
                 बरे बाssssssय!
             
                  तुझीच पिल्लू
                          छकूली
(ता.क.- बाय चान्स...समजा आपल्या चैनीला पैसे कमी पडू लागले तर तू बिनधास्त आसाराम हो...मी राधे माँ होईन)
©सर्व हक्क लेखकाधीन
©अनिल सा.राऊत
9890884228
anandiprabhudas@gmail.com

Comments

Popular posts from this blog

नागपंचमी: काल आणि आज

सावधान..! शिक्षणाच्या गंगेत राजकिय गटाराचे पाणी मिसळतेय!

एक ओवाळणी-माझ्या `त्या' बहीणीसाठी...