खेड्यातली दिवाळी
खेड्यातली दिवाळी
"मना-मनात नैराश्याचा अंध:कार आहे
संपत्तीने श्रीमंत पण प्रेमाचा भुकेला आहे!
ओठावर हसु तर आहे पण
काळजावर दुःखाचा भडीमार आहे !
घ्या एक पणती हाती जरा मानवतेची
सगळ्यांना प्रकाश आता वाटायचा आहे !
उजळुन चेहरा प्रेमाने सत्याचा
आनंद सर्वांचा साजरा करायचा आहे... !"
नैराश्याच्या गर्तेतून आशेच्या सागरात मुक्त विहार करण्यासाठी प्रेरणा देणारा भारतीय सण म्हणजे दिवाळी!लक्ष लक्ष दिव्यांनी अंगण उजळून निघत असताना मनाचा कोपराही प्रज्वलित अन् प्रकाशमय होऊन जातो.सर्व संकटांचा आणि दु:खाचा क्षणभर विसर पडून आनंदाचा क्षण भरभरुन साजरा करण्याची उर्मी हा दिवाळी सण घेऊन येतो.
ज्याप्रमाणे प्रत्येक चार कोसावर भाषेच्या अलंकारात,शब्दात व नादामध्ये जसा फरक पडत असतो तसाच तो रितीरिवाजातही थोड्याफार प्रमाणात जाणवत असतो.आनंद तोच असतो पण साजरा करण्याची पद्धत काही अंशी बदललेली असते.हेच वेगळेपण लक्षात घेऊन खेड्यातली दिवाळी कशी साजरी होते हे पाहणे औत्सुक्याचे होईल.कारण आपल्या भारतीय संस्कृतीचा डंका सातासमूद्रापार वाजत असला तरी ही संस्कृती जतन करण्यामध्ये शहरांपेक्षा खेड्यांचा सहभाग जास्ती आहे.जिथे संस्कार आहेत तिथे माणुसकी आहे आणि जिथे माणुसकी आहे तिथे संस्कृती आहे.खेड्यात अजूनही माणुसकी टिकून आहे म्हणजेच संस्कृतीचे रक्षण करणारे खेड्यातच आहेत असे म्हणणे अतिशयोक्ती ठरु नये.
दसऱ्याचे सोने लुटून आल्यानंतर लगेचच दिवाळीच्या तयारीचे वेध लागतात.गावातल्या दुकानातून गतवर्षीचे फटाके नव्या स्वागतासाठी सज्ज असतात.या फटाक्यांचे अधून मधून येणारे आवाज दिवाळी जवळ आल्याची मनाला चाहूल लावून जातात.इथून खरी दिवाळीची तयारी म्हणजे काय असते याची जाणिव होते.मला एवढे तेवढे ड्रेस,अमूक इतके फटाके अशी मुलांची मागणी सुरु होते.आई-बापाला या मागणीचे खूप अप्रुप वाटत असले तरी अजून पैशांची तजबीज झालेली नसते.मग सुरु होतो या पैशांच्या जुळवणीचा खेळ!खेळच नाहीतर दुसरे काय म्हणायचे?सगळी सोंगे करता येतात पण पैशाचे सोंग करता येत नाही.ज्यांच्याकडे असतील ते निर्धास्त असतात पण ज्यांच्याकडे नाहीत ते उधार-उसने अथवा प्रसंगी कर्ज काढून जुळणी करतात.
एकदा पैशांची जुळणी झाली की मग आठवडा बाजाराचा दिवस बघून ही माय-लेकरांची जत्रा जवळच्या बाजारात पोहोचते.बाजार तर बाजारच असतो.हरत-हेचे कपडे,नवनविन फटाके,मातीच्या पणत्या,आकाशकंदील,रंगबिरंगी रांगोळी,उटणे,अगरबत्त्या,सुवासिक तेले,सुगंधी साबणे यांची अगदी रेलचेल असते.किराणा मालाची पालेही गोडेतेल,तुप,डालडा,बेसन,रवा,दाळी,दाळे,साखर,तयार पीठ,काजू,बदाम यांनी हाऊसफुल्ल भरलेली असतात.भांड्यांच्या दुकानात झाऱ्या,शेवगे,कढई यांची भाऊगर्दी झालेली असते.
कपड्याच्या दुकानात घासाघिस करुन मुलांना हवे तसले पोषाख घेतले जातात.मोठ्यांना घेतले तर घेतले नाहीतर नाही घेतले तरी चालतात पण बहीणींसाठी साडी,इरकल,ब्लाऊज व चोळीचा खण मात्र आवर्जून घेतला जातो.
खिशातल्या नोटांची किंमत व कागदावरची खरेदीयादी यांची सांगड घालून सारा सरंजाम एकदाशी घरी आणून ठेवला जातो.हल्ली सर्रास रेडिमेड कपडे वापरात असले तरी जुन्या मंडळींना मात्र टेलरच्या दुकानाचे उंबरठे झिजवावे लागतात.
बघता बघता दिवाळी अगदी दाराशी येवून रेंगाळते.तिच्या स्वागतासाठी 'गवळणी' उभ्या केल्या जातात.अश्विन कृष्ण पक्ष द्वादशीला म्हणजेच 'बारशी'ला पहिल्या गवळणी दारात हजेरी लावतात.यालाच 'पहिला दिवा' असेही म्हणतात.
* गवळणी *
आपल्या भारतीय संस्कृतीत गोमुत्राला जेवढे महत्त्व आहे तेवढेच महत्त्व गाईच्या शेणालापण आहे.आता काळ बदलला पण पूर्वी सडा सारवण हे शेणानेच व्हायचे.खेड्यापाड्यात अजूनही होते.तर या शेणापासून द्वादशीच्या सूर्योदयाला गवळणी सजवल्या जातात.अंगणात प्रथम गाईच्या शेणाने सडा सारवण केले जाते.त्यानंतर शेणापासून शंकूच्या आकाराच्या गवळणी व एक 'पेदा' तयार केला जातो.पेदा हा आकाराने गवळणींपेक्षा मोठा असतो.गवळणींच्या माथ्यावर टोपलीचा आकार बसवला जातो तर पेद्याच्या माथ्यावर वासुदेवासारखी टोपी असते.या गवळणीभोवती सुरेख रांगोळी काढली जाते.या गवळणींची हळदी-कुंकू व फूले वाहून यथासांग पूजा केली जाते.या गवळणी सलग पाच दिवस तयार केल्या जातात.पहिल्या गवळणी मोडून त्यात थोडे ताजे शेण मिसळून नविन गवळणी उभ्या केल्या जातात.पहिल्या दिवशी पाच,दुसऱ्या दिवशी सहा,तिसऱ्या दिवशी सात,चौथ्या दिवशी नऊ अशा चढत्या क्रमाने असतात व उभा पेदा कायम असतो.मात्र पाचव्या दिवशी हा पेदा झोपलेल्या अवस्थेत असतो व त्याला कासवासारखा आकार दिलेला असतो.या दिवशी पाच ते सात थरांचा डोंगर उभारुन त्यावर दोन गवळणी बसवलेल्या असतात.त्या बहुतेक शिव-पार्वतीचे प्रतिनिधित्व करत असाव्यात.तर डोंगरासमोर द्रौपदी(धुरपा) व कोता या लेकुरवाळ्या गवळणी वाजंत्र्यांच्या जथ्यासह उभ्या असतात.या देखाव्यापुढे गोवरीच्या आरावर (निखाऱ्यावर) एका लहान भांड्यात दूध उकळण्यासाठी ठेवले जाते.जेव्हा हे दूध ऊतू येवून खाली सांडते तेव्हा या गवळणींना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो.त्या दिवशी दिवाळीचा 'पाडवा'ही असतो.
धनत्रयोदशीला खेड्यात विशेष अशी काही हालचाल नसते.पण फटाक्यांचा आवाज मात्र वाढलेला असतो.
* पहिली आंघोळ *
दिवाळीचा तिसरा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी.या दिवसाला पहिली आंघोळ असेही म्हणतात.या दिवशी भल्या पहाटे घरातील लहान-थोर पुरुष मंडळींना झोपेतून उठवले जाते.घरात बहीण असेल किंवा सासरहून आली असेल तर ती आपल्या भावांच्या सर्वांगाला उटणे व ज्वारीच्या पीठाची कणिक लावते.सर्वांगाचा मळ निघावा असा त्यामागचा हेतू असतो.नंतर सुगंधी तेल चोपडले जाते.कानातही सोडले जाते आणि डोक्यालाही लावले जाते.हे सर्व उरकल्यानंतर यथासांग शाम्पू व सुगंधित साबण लावून आंघोळ घातली जाते.आंघोळ होताच औक्षणाचे ताट आणले जाते.या ताटात कणकेच्या दोन पणत्या व दोन मुटके असतात.पंचारती,ओले कुंकू,तांदूळ व साखर किंवा पेढे असतात.औक्षण करताना प्रथम डावीकडून उजवीकडे एक पणती अभ्यंगस्नान झालेल्या व्यक्तीच्या अंगावरुन ओवाळून खाली ठेवली जाते.नंतर दुसरी पणती उजवीकडून डावीकडे ओवाळून खाली ठेवली जाते.नंतर मुटक्यांचे पण असेच केले जाते. नंतर ओल्या कुंकवाचा कपाळी टीळा लावून त्यावर अक्षता (तांदूळ) चिकटवल्या जातात.तोंड गोड करण्यासाठी साखर किंवा पेढा भरवला जातो व पंचारतीने ओवाळले जाते.मग बंधुराज बहिणीला ओवाळणी टाकतो.ही ओवाळणी पैशांच्या किंवा कपड्यांच्या स्वरुपात असते.जर घरात बहीण नसेल तर आई किंवा घरातील कुणीही स्त्री हे अभ्यंगस्नानाचे कार्य पार पाडते.पण घरातील पुरुषांची आंघोळ ही सुर्योदयापूर्वीच व्हायला हवी असा अलिखित नियमच आहे.
आंघोळ होताच लहान-थोर मंडळी फटाक्यांची आतषबाजी करुन आनंद साजरा करतात.
दिवाळीचा चौथा दिवस हा अमावस्येचा असतो.अमावस्या ही नेहमीच निषिद्ध मानली जाते त्यामुळे हा दिवसही शांततेतच जातो.पाचवा दिवस हा मुख्य दिवस असतो.
*दिवाळी पाडवा *
दिवाळीचा पाचवा आणि मुख्य दिवस म्हणजे पाडवा.यालाच बलिप्रतिपदा असेही म्हटले जाते.घरात फराळाची कितीही रेलचेल असली तरीही या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो.या काळात पीके ऐन भरात आलेली असल्याकारणाने ज्वारी,गहू किंवा कोणत्याही पिकाच्या रानात पाच पांडव पुजले जातात.
एका लहान मडक्याला (गाडगे) बाहेरील बाजूने पूर्ण चूना लावून पांढरे केले जाते.तर मोठ्या मडक्याला (मोरवा) चून्याचे पट्टे ओढले जातात.लहान मडके, मोठे मडके,झाकणी,एक काठी,लहान चपटी पाच दगड व नैवेद्य असा सगळा सरंजाम घेऊन रानात जातात.तिथे एक काठी उभी रोवून काठीवर लहान मडके पालथे ठेवले जाते.तिथेच खाली पाच दगडांना चुन्याचे ठिपके देवून पाच पांडव तयार केले जातात.अष्टगंध वगैरे लावून पूजा केली जाते.जो नैवेद्य असतो तो मोठ्या मडक्यात ठेवून वरुन झाकणी झाकली जाते.नंतर हे मोठे मडके तिथेच जमिनीत फूटभर खड्डा करुन पुरले जाते.हेच मोठे मडके पीक काढणीवेळी उकरुन वर काढले जाते आणि खळ्यात नेवून पुन्हा यथासांग पूजले जाते.पाच पांडवांना नैवेद्य दाखवून झाल्यानंतर अंगणातल्या गवळणींना नैवेद्य दाखवला जातो.
दिवाळीचा सहावा दिवस हा बहीण-भावाच्या प्रेमाचे प्रतिक असलेला दिवस असतो. या दिवसाला भाऊबीज असे म्हणतात.भाऊबीजेला भाऊ आपल्या बहिणीच्या घरी आंघोळीसाठी जातो.सोबत भेटवस्तू व फराळ न्यायलाही तो विसरत नाही.पहिल्या आंघोळीप्रमाणेच हाही सोहळा चालतो.बहीण जर माहेरी आलेली असेल किंवा अविवाहित असेल तर ही आंघोळ स्वत:च्याच घरी होते.आणि बहीणच नसेल तर कमीत कमी एखादी तरी मानलेली बहीण असतेच असते.
भाऊबीज झाली की दिवाळीचा मुख्य सण संपन्न होतो.मात्र संपूर्ण दिवाळी संपत नाही.
* दिव्यांचा सण *
खरे म्हणजे दिवाळी सण हा दिव्यांचा सण म्हणूनच ओळखला जातो.कारण दिव्यांच्या प्रकाशात जीवनातील अंध:कार दूर करुन आनंदाचे चार क्षण उपभोगण्याचा हा सण असतो.द्वादशीपासूनच या दिव्यांच्या सणाला सुरुवात होते.दिवस मावळताच तिन्ही सांजेला घरात आणून ठेवलेल्या पणत्या तेल-वात लावून प्रज्वलित केल्या जातात.या पणत्या दारात,अंगणात व तुळशीजवळ ठेवून अंगण सुशोभित व प्रकाशमय केले जाते.जोडीला बांबूच्या किंवा इतर कुठल्याही उंच काठीला आकाशकंदील बांधून त्यात विद्युत दिवा सोडला जातो व ती काठी घराच्या दाराजवळ उभी केली जाते.पक्के घर असेल तर घरावर ही काठी उभी केली जाते किंवा आकाशकंदील पोर्चमध्ये लावला जातो.सोबतच शक्य असेल तिथे विद्युत रोषणाई ही केली जाते.एकूणच हा प्रकाशाचा उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जातो.
* दिवाळीचा फराळ *
मुलांना कपडे,फटाके आणि मिठाई यासाठीच दिवाळी हवी असते.दिवाळीचा फराळ म्हणजे मेजवानीच असते.ज्याच्या त्याच्या ऐपतीप्रमाणे हा फराळ कमी जास्त प्रमाणात तयार केला जातो.पण आवर्जून केलाच जातो.नानाविध प्रकारांनी ही फराळाची मेजवानी सजवली जाते.यात प्रामुख्याने करंजी (कानुला),शेव-चिवडा,अनारसे,रव्याचे (गऱ्याचे) लाडू,बेसनलाडू,बुंदीचे (दाळीचे) लाडू,चकली (काटीशेव),शंकरपाळी आदी पदार्थांचा समावेश असतो.
पूर्वी दाळीचे लाडू करायचे म्हटले तर आधी शेवग्याच्या सहाय्याने शेव पाडली जायची.ती शेव गरम आहे तोवरच चुरावी लागायची.हात होरपळून निघायचे पण नाईलाज असायचा.कारण हे लाडू सर्वांच्याच आवडीचे असायचे.आणि हे चुरण्याचे काम बहुधा लहान मुलांवरच सोपवले जायचे.ही चुरलेली शेव नंतर साखरेच्या पाकात घालून त्याचे लाडू वळले जायचे.आता झाऱ्याच्या सहाय्याने बूंदी पाडली जाते किंवा ज्यांना शक्य आहे ते गावातील आचाऱ्याला घरी बोलवून शेव-चिवडा व बूंदीचे लाडू तयार करुन घेतात.बुंदीला कळी असेही म्हणतात.कुणी नुसतीच बूंदी ठेवते तर कुणी लाडू बांधतात.बाकीचे सगळे पदार्थ हे घरातील महिलाच बनवतात.
हा फराळ तयार झाला कि आसपासच्या शेजाऱ्यांना मोठ्या आनंदाने पोहोच केला जातो.अशी फराळाची देवाण-घेवाण सुरूच राहते.यातूनच माणूसकीचे दर्शनही घडते.
* तुळशीचे लग्न *
कार्तिक शुक्ल पक्ष द्वादशीला तुळशीच्या लग्नाचा सोहळा असतो.याला तुलशीविवाह असे म्हणतात.यादिवशी अंगणातल्या तुळशीचा विवाह श्रीकृष्णाबरोबर लावला जातो.आणि हा विवाह नेहमी गोरज मुहूर्तावरच असतो.
या दिवशी तुळशीभोवती सडा सारवण करुन रांगोळी रेखली जाते.असेल तर तुळशी कुंडी व तुळशी वृंदावन रंगविले जाते.वाड्यासहीत चार ऊस तुळशीच्या चारी बाजूंना उभे करुन मांडव तयार केला जातो.कापसाच्या माला तयार करुन तुळशीला घातल्या जातात.सोबतच बांगड्या,लहान आरसा-कंगवा भेट म्हणून ठेवला जातो.तुळशीजवळ देव्हाऱ्यातील बालश्रीकृष्णाची मुर्ती ठेवून पुजले जाते.कुणी पुस्तक वाचून,कुणी अॉडिओ डिवाईस वापरून तर कुणी मोबाईलवरुन मंगलाष्टके वाजवून अक्षता टाकतात.काहीजण नुसत्या अक्षताच टाकून तुळस व श्रीकृष्णाचे लग्न लावतात.लग्न लागताच फटाके फोडले जातात.
जिथल्या तिथल्या रितीरीवाजानुसार या संपूर्ण सणात थोडाफार फरक पडत असेल पण आनंद मात्र तोच असतो.
तुळशीच्या लग्नाचा सोहळा संपला की या आनंददायी दिवाळी सणाची सांगता होते आणि विवाहेच्छुकांना 'लग्नसराईचे' वेध लागतात.
©अनिल सा.राऊत
9890884228
anandiprabhudas@gmail.com

खूप छान !!!
ReplyDelete