सुगला
:::::::::::: सुगला ::::::::: (ग्रामीण कथा) डोक्यावरच्या गवताच्या ओझ्याने तिची मान पाठ भरुन आली होती.कमरेतून निघालेली कळ थेट अवघडून गेलेल्या खांद्यापर्यंत पोहोचत होती.तरीही सुगला चालतच होती.ओझ्यामुळे तिची चाल जरा बेढबच भासत होती.पण त्या निर्जन वाटेवर ती चाल पाहणारे कुणी नव्हते म्हणून ती तशीच पाय ओढत अंतर कापायचा प्रयत्न करत होती.... सरावण सरत आला तरी पाऊस अजून हाद्या म्हणत नव्हता.आभाळ तर भरुन यायचे पण रीते व्हायचे नाही.जिकडे बघावे तिकडे मातीच्या लेकरांची नुसती होरपळ चाललेली दिसत होती.हाता-तोंडाशी आलेला घास घारीने झडप घालून हिसकावून न्यावा तसेच या दुष्काळाने केले होते.प्यायच्या पाण्याची अजून परापत झाली नसली तरी हे दिवस असेच पुढे राहिले तर मग मात्र जगणे मुश्कील झाले असते.हाताला तर काहीच कामधंदा मिळत नव्हता.पण सुगलाने अजून धीर सोडला नव्हता.गावात जरी कुठेच हिरवे दिसत नसले तरी गावापासून तीन कोसावरच्या वाण्याच्या वस्तीवर मात्र देवाची किरपा पहिल्यापासून होती.तो जिवंत पाण्याचा भाग असल्यामुळे तिथे पाण्याचा तुटवडा न...