सरपंचाचा जीआर
::::::::::::::: सरपंचाचा जीआर ::::::::::::
चणेवाडीच्या ग्रामपंचायतीची निवडणूक लवकरच लागणार होती.सरपंच मदनराव यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपत आला होता.या पाच वर्षांच्या आतापर्यंतच्या कार्यकाळात त्यांनी गावात तब्बल पन्नास कोटींची विकासकामे केली होती.पण ती मदनरावाशिवाय कुणालाच दिसत नव्हती.आणि दिसणार तरी कशी?सगळ्या योजना कागदावरच होत्या.पन्नास कोटी मात्र सरपंचांच्या खिशात जमा झाले होते.आता निवडणुकीला उभे रहायचे तर विरोधकांच्या हाती आयते कोलीत दिल्यासारखे होईल.गेल्या वेळीच विरोधकांनी आणि नुकत्याच उदयास आलेल्या सटरफटर पुढाऱ्यांनी मदनरावांवर नाही नाही ते आरोप केले होते.आता तर त्यात आपल्याच गटातले काही लोक सामिल होणार हे तर उघडच दिसत होते.कारण अडीच वर्षे मदनरावांनी सरपंचपद भोगायचे व उरलेली अडीच वर्षे श्रीपतरावांनी सरपंचपद उपभोगायचे असे आधीच ठरले होते.पण आपल्या कामाचे अधिकारी आणि कामाच्या योजना यांची ओळख व्हायलाच मदनरावांचा एक-दीड वर्षांचा काळ लोटला.परिणामी मदनरावांनी आधी ठरल्याप्रमाणे अडीच वर्षानंतर सरपंचपद सोडले नाही.त्यांच्याविरुध्द अविश्वास ठराव आणण्याचा श्रीपतरावांनी प्रयत्न केला पण मेंबरांना लाख लाख रुपये देवून मदनरावांनी हा डाव हाणून पाडला.
आता मात्र तशी परिस्थिती नव्हती.पैसा मुबलक होता पण माणसांचे पाठबळच नव्हते.काय करावे मदनरावांना सुचतच नव्हते.शेवटी एक मिटींग घ्यायची असे त्यांनी ठरवले.जे येतील ते आपले,जे येणार नाहीत ते कुणाचे?हे तरी ओळखू येईल असा साधा सरळ विचार करुन मदनरावांनी आपल्या बंगल्यावर मंगळवार गाठून बैठक बोलावली.
पूर्ण चणेवाडीत दोनच इसम तेवढे शहाणे होते.एक होता रामभाऊ.आणि दुसरा होता भाऊराव!रामभाऊला लोक प्रेमाने 'अतिशाना' म्हणायचे तर भाऊरावला 'दीडशाना' म्हणायचे.अतिशाना होता मदनरावांच्या कंपूत,तर दीडशाना होता विरोधातल्या सोपानदादांच्या कंपूत! गावातले सगळे राजकारण या दोघांच्या 'काड्या'वरच चालायचे.
मंगळवार उजाडला.मदनरावांनी मस्त जेवणाचा बेत ठेवला होता.सोबत पेयपानाचा पण कार्यक्रम होताच.मिटींगचे तिकडे काहीही होवो पण आज फुकट प्यायला मिळणार म्हणून पिदूडे सकाळपासूनच बंगल्यावर घारीसारख्या घिरट्या घालत होते.काहीजण दिवस बुडण्याची वाट बघत आणि तुळजाभवानीचा उपवास धरल्याचे सांगत घरी जेवण करायचे टाळत होते.तर काहीजण आचाऱ्याच्या हाताखाली आपणच थांबणार म्हणून दिवसभर बंगल्यावर ताटकळत बसले होते.
बंगल्यावर सकाळपासूनच माणसांची रीघ लागलेली बघून मदनरावांना हायसे वाटले.आहेत...आहेत...अजूनही आपल्यामागे लोक आहेत असे वाटून त्यांनी बिर्याणीचा बेत नव्याने आखला.रस्सा आणि भाकरीचा आधीचा बेतही तसाच ठेवण्यात आला.ज्याला जे पाहिजे ते घेतील असा मदनरावांचा सुज्ञ विचार होता.
तिसऱ्या प्रहरापासूनच भट्टया पेटल्या.सहा वाजता तर सगळा बंगला घमघमाटाने भरुन गेला.
लोक फक्त खाण्यापुरते गोळा होतात असा कयास करुन सोपानदादांनी या बैठकीकडे विशेष लक्ष्य दिले नाही.आणि लक्ष्य देण्यासारखे काही विशेष असे या बैठकीत घडणार नव्हते हे त्यांना माहीत होते.कारण लोक मदनरावांच्या कारभाराला आणि श्रीपतरावांच्या सत्तापिपासूपणाला वैतागले आहेत हे सोपानदादा जाणून होते.मदनरावांच्या विरोधात एवढा जहाल प्रचार करु की त्यांची हक्काची मतेसुद्धा आपल्या पदरात पाडून घेवू.श्रीपतराव मधूनच चुळबुळ करतील पण त्यांचीही नांगी ठेचून काढू.एकूणच यावेळी गावाची सत्ता आपल्याकडेच येणार या विश्वासाने सोपानदादा एकदम शांत होते.
रात्रीच्या आठ वाजल्या आणि मदनदादांच्या बंगल्यावर झोकात बैठक सुरु झाली.जवळ जवळ शंभर दीडशे लोक बैठकीला आले होते.म्हणजे कमीत कमी नव्वद एक उंबरा तरी आपल्या पाठीमागे आहे याचे समाधान मदनरावांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते.
नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे मदनरावांचा हुजऱ्या गणपत कडूबोले बोलण्यास उभारला.गणपतच्या आडनावावर जायचा कुणी प्रयत्न करत नव्हते कारण आडनाव जरी कडूबोले असले तरी तो फार गोडगोड बोलायचा.
"माननिय अध्यक्ष सरपंच मदनरावजी आणि बैठकीसाठी उपस्थित सर्व पाठीराख्यांनो,आपल्या सरपंचसाहेबाजींनी त्यांच्या आतापर्यंतच्या साडेचार वर्षांच्या सफल कारकिर्दीत गावाच्या विकासासाठी तब्बल पन्नास कोटींचा निधी शासनाकडून खेचून आणला (हशा) हसण्यावर नेवू नका,दात दिसतात.तर मी काय म्हणत होतो?"
"पन्नासाची क्वाटर खेचून आणली," फुल्ल टाईट भिम्या आस्ते वदला.
"तर पन्नास कोटीचा निधी गावाच्या विकासासाठी सरपंचसाहेबाजींनी खर्च केला.गंगा,यमुना आणि सरस्वती या नद्या आपल्याला माहीत आहेत.पण यातल्या गंगा आणि यमुना या दोनच नद्या आपल्या डोळ्यांना प्रत्यक्ष वाहताना दिसतात.बरोबर ना?"
"एकदम बरोबर...जीजी" बैठकीतल्या सर्वांनी एका सुरात दाद दिली.
गणपतला प्रत्येक गोष्टीत जी..जी..म्हणायची सवयच होती म्हणून सर्वजण त्याला 'जीजी'च म्हणायचे.
"पण सरस्वती कुणी पाहिलीय का?"
"नाही जीजी," पुन्हा बैठक उसळून बोलली.
"तर सरस्वती नदी आहे पण ती डोळ्यांना दिसत नाही.म्हणजेच ती झाकरीत आहे."
बैठकीतल्या सर्वांनी सरस्वती नदीला पवित्र भावनेने हात जोडले.
"आपल्या गावचा विकास पण असा झाकरीतच आहे.तो डोळ्यांना दिसत नसला तरी तो झालाय हे तुम्हाला मान्य आहे का?"
"मान्य नसायला काय झालं...सरसपती नदी हाय म्हनल्यावर इकास पण असायलाच पाह्यजे," नागोबासारखे डुलत डुलत नाग्याने ठरावाला संमती दर्शवली.सर्वांनी माना डोलावून ठरावाला अनुमोदन दिले.
"पण आपल्या सरपंचसाहेबाजींनी गावाचा काहीच विकास केला नाही.सगळा पैसा स्वत:च्या घशात घातला..." गणपतला मध्येच तोडत मदनराव ओरडले,
"आरं गणपा,काय बोलतूयास?"
"हां जी,सरपंचसाहेब...तेच तर बोलतोय.आपल्या सरपंचसाहेबाजींनी गावाचा काहीच विकास केला नाही.सगळा पैसा स्वत:च्या घशात घातला असे आपले विरोधक बोंबलत आहेत.सरस्वती नदी पुण्यवान माणसांनाच दिसते,तसा आपल्या गावचा विकासपण पुण्यवान माणसांनाच दिसतो.तुम्ही सगळेजण पुण्यवान आहात म्हणून तुम्हाला विकास दिसला.आपले विरोधक एवढे पापी आहेत की पुढच्या पाच वर्षांचापण विकास त्यांना दिसणार नाही."
बैठकीत टाळ्यांचा पाऊस पडला.
"सरपंचसायेब,बिराणी करपल्यासारका वास यितुय.." भूकेने पोटात कावळे ओरडू लागलेला शिरपा बैठकीचे ध्यान जेवणाकडे वळवण्याच्या हेतूने बोलला.
"व्हय..व्हय सरपंचसायेब,तसंच वाटाय लागलंय," सगळ्यांनी एका सुरात बिर्याणी करपत आहे याला दुजोरा दिला.
"गप बसा रे...आजून बैठक सुरु झाली न्हायी तवर भूकाच बऱ्या लागल्या?" मदनरावांनी बैठकीतल्या सगळ्या कावळ्यांना प्रेमाने झापले.
जीजी पुन्हा बोलणार तेवढ्यात मदनरावांचा उजवा हात शंकऱ्या ऊठून उभारला.
"जी जी...तू बस आता,जरा मी बोलतू.तर मंडळी,बिराणीच्या निस्त्या वासानं जसं प्वॉट भरत न्हाय तसं निस्त्या गुळमाट बोलण्यानं निवडणूक जिंकता येत न्हाय.कायतरी ठोस निरणय घ्यायला लागंल तवाच औंदाची निवडणूक आपल्या मालकाला सोपी जाईल."
"ए शंकऱ्या,आक्षी शंभर आणे खरं बोल्लास बघ," जीजीच्या गोड बोलण्याला वैतागलेला म्हातारा सदा मध्येच बोलला.
"तर आता सा म्हैन्यावर निवडणुका आल्यात्या.गावातल्या लोकास्नी काम दिसावं लागतं तवा लोकं मतं टाकत्याती.आपल्या गावातली सगळीच लोकं काई तुमच्यावणी पुण्यवान न्हायती-इकास दिसायला!तवा लोकं आपल्याम्हागं वळवायला काय काय कराय पाह्यजे हे ठरवायला ही मीटिंग बोलवलीय.तवा येकायेकाने आपली आयडिया मालकास्नी सांगावी.मी बसतू आता."
शंकऱ्या बसताच भिम्या ओरडला,
"सर्रर्रर्रपंच,आत्तापस्नंच खंबं वाटायला सुर्रवात करा..म्हंजी सोमरस पिऊन गावातली सगळीच लोकं पुण्यवान व्हत्याली आन् त्यास्नी बी इकास दिसंल..."
"ए बेवड्या,बस खाली...हातभट्टयाच सुरु कराय पाह्यजेत्या तुमच्यासाठी!" सरपंचसाहेब वैतागून म्हणाले.
"सरपंचसायेब,ज्याला नड आसंल त्येला आताच धा-ईस,धा-ईस हजार दिवून नड भागवा...झक मारत आपल्याम्हागं येत्याली," सावकाराच्या देण्याखाली दबलेल्या नामाने आपली आयडिया सुचवली.
"सरपंचसायेब,शिरपतरावास्नी आपल्या बाजूनं वळवायचं बघा."
"मतदान होस्तोर सोसाट्या आडवा..."
"रेशन बंद करा..."
"राकेल दिवू नका..."
"सोपानदादालाच म्यानेज करा..."
"वाटा आडवा...""
यातली एकही आयडिया मदनरावांना पटल्याचे त्यांच्या चेहऱ्यावरुन दिसत नव्हते.त्यांचे विचार वेगळ्याच दिशेने सुरु होते.साप तर मेला पाहिजे पण काठीही शाबूत रहायला हवी.पण अशी कोणती आयडिया आहे हे काही त्यांच्या ध्यानात येत नव्हते.डोके खाजवता खाजवता मदनरावांचे लक्ष्य आपल्या हुकमी एक्क्याकडे गेले.हुकमी एक्का आतापर्यंत एक शब्दही त्या बैठकीत बोलला नव्हता.
"ए अतिशान्या,लेका बोल की कायतरी!" सरपंचांनी असे म्हटल्याबरोबर सगळ्या बैठकीचेही ध्यान अतिशान्याकडे गेले.
"ये बोल बाबा कायतरी...तू बोल्ल्याबिगर हा तिडा सुटायचा न्हाय." असे एक दोघे म्हणताच अतिशाना ऊठून उभारला.
"ह्ये बघा मंडळी,सौ सुनार की येक ल्योहार की असा आपला दणका असतूया.म्हणून आधी मधी कुणीच त्वांड खुपसायचं न्हाय.मी आन् सरपंचसायब दोघंच बोलणार...ते बी सगळ्यांम्होरं..."
"व्हय..व्हय चालंल.तुझ्या करतूतवावर ईस्वास हाय आमचा,"बैठकीच्या वतीने इसाक बोलला.
"तर सरपंचसायेब....गांधीबाबा,चाचा न्हेरु,सावरकर,टिळक,इंद्रा गांधी,राज्यू गांधी ह्ये कोण हुते?"
"आरं त्ये लय मोठ्ठं पुढारी हुते."
"पुढारी म्हंजे काय करत हुते?"
"आपल्या देशाला सवतं केलं,नंतर देश चालवला."
"देश चालवला म्हंजे काय केलं?"
"अं...देश चालवला म्हंजे देशाचा कारभार बघितला."
"कारभार बघितला म्हंजे नेमकं काय केलं?"
"देशातल्या जनता जनारदनाच्या अडीअडचणी समजून घिऊन त्या मार्गी लावायचा परेत्न केला.जनतेसाठी कितीतरी योजना आणल्या.देशाची गरीबी हटवायचा परेत्न केला.लय लय काम केलं त्यांनी देशासाठी.म्हनून तर आपुन सगळे त्यास्नी 'राष्ट्रपुरुष' म्हणतो."
"म्हंजे आपल्या सगळ्यांच्या मनात त्येंच्याबद्दल आदर हाय."
"व्हय..व्हय,एकदम बरोब्बर!"
"जर समजा...आता या बैठकीत मी या सगळ्यांइरुद्ध वाईट-वंगाळ बोल्लो तर काय हुईल?"
मदनराव नुसत्या या विचारानेच हादरुन गेले.बैठक एकमेकांच्या तोंडाकडे बघत राहिली.
"ए अतिशान्या,येडा का खुळा?ज्यांनी या देशाची सेवा केली त्येंच्याइरद्ध बोलायचं म्हंजी हा तर 'देशद्रोह' झाला.असं काय वाईट-वंगाळ बोल्ला तर मीच तुझ्याइरुद्ध देशद्रोहाचा खटला भरीन."
"बरं जावू द्या...न्हाय बोलत.मला सांगा सरपंचसायेब...सरपंच सरपंच म्हंजे नेमकं काय?"
"सरपंच म्हंजे गावाचा मेन पंच असतूया."
"तसं न्हवं,काम काय करता?"
"काय करतो म्हंजी?तुला दिसत न्हाय का काय करतोय ती?"
"नेमकं सांगा की काय करता ती."
"गावाचा गावगाडा चालवतो...गावासाठी योजना आणतो...गावाचा इकास कसा हुईल ह्ये बघतो..."
"म्हंजी 'राष्ट्रपुरुषांनी' देश चालवला तसं तुमी गाव चालवता."
"व्हय...व्हय...एकदम बरोबर बोल्लास बघ."
"गाव चालवता म्हंजी काय करता?"
"गावाची सेवा करतो!"
"व्वा!छान...म्हंजी त्यांनी देशसेवा केली...तुमी गावसेवा!"
"व्हय...व्हय"
"ग्रामपंचाईतीचे मेंबर काय करतात?"
"त्येपण गावसेवाच करत्यात."
"तुमचे उजवे-डावे हात?"
"त्ये मला मदत करत्यात म्हंजी त्ये बी गावसेवाच करत्यात."
"बरोब्बर..आन् ही गावसेवा करुन तुमी देशसेवा करणाऱ्यांना हातभारच लावताय..."
"पटलं बघ तुझं म्हननं."
"म्हंजी तुमी बी देशसेवाच करताय."
"व्हय...व्हय...तसंच."
"ज्यांनी देशाची सेवा केली त्येंच्या इरुद्ध मी काय बोल्लो तर तुमी माझ्यावर देशद्रोहाचा खटला भरणार..."
"भरणारच."
"आणि जे आता देशसेवा करत्यात त्येंच्याइरद्ध मी बोल्लो तर?"
"त्यो बी देशद्रोहच हुईल."
"सरपंचसायेब,आपुन आता जिंकलो...मला ह्येच पाह्यजे हुतं..."
मदनरावांनाही काही समजले नाही आणि बैठकीलाही काही कळले नाही.पण अतिशान्याने बैठक संपल्याचे जाहीर केले आणि बैठकीचे रुपांतर पंगतीत झाले.
रात्रीची बिर्याणी अजून जिरतेय की नाही तोवर ग्रामपंचायतीच्या स्पीकरवरुन आज संध्याकाळी ग्रामसभा असल्याचे चणेवाडीच्या कानावर पडले.
आज पण बेत? असे काहींचे कान टवकारले.आजपर्यंत ग्रामसभा हा शब्द नुसताच ऐकण्यात येत होता.पण आज प्रत्यक्षात ग्रामसभा आहे म्हटल्यावर ही नेमकी काय भानगड असते हे पहायला संध्याकाळी अख्खा गाव चावडीवर लोटला.श्रीपतरावांचे आणि सोपानदादांचे खास खबरेही यात सामिल झाले.
बरोबर सात वाजता ग्रामसभेला सुरुवात झाली.सरपंच,ग्रामसेवक व इतर मेंबर खुर्च्यांवरच स्थानापन्न झाले.
आणि माईकचा ताबा जीजीने आपल्याकडे घेतला.
"आदरणीय सरपंचजी,ग्रामसेवक भाऊसाहेबजी व मेंबरजी...आपल्या परवानगीने मी आजच्या या ऐतिहासिक ग्रामसभेला सुरुवात करत आहे.
आपल्या ग्रामपंचायतीचे कार्यतत्पर आणि यथोचित निर्णय घेणारे सन्माननीय सरपंच मदनरावजींनी गावच्या भल्यासाठी एक जीआर पारीत केला असून तो सर्वांनी पाळण्याचे बंधनकारक केले आहे.तो जीआर जसा आहे तसा मी वाचून दाखवत आहे....
आपल्या भारत देशात अनेक थोर राष्ट्रपुरुष होऊन गेले.त्यांनी देशासाठी जीवाचे रान केले.देशातील जनतेसाठी ते झटत राहिले.एक प्रकारे त्यांनी देश घडवण्यात मोलाचा वाटा उचलला म्हणून आपण त्यांना राष्ट्रपुरुष मानतो.त्यांच्याविषयी आपल्या मनात आदरच असतो.पण हेच कार्य जसेच्या तसे पुढे चालवणारे आमचे नेते मात्र जनतेतून होणाऱ्या टीकेमुळे,वर्तमानपत्रातून लिहल्या जाणाऱ्या खोट्या बातम्यांमुळे विनाकारण बदनाम होत आहेत.ज्याप्रमाणे देशसेवा करणारे 'राष्ट्रपुरुष' म्हणून ओळखले जातात तसेच हे गावसेवा करुन देशसेवेस हातभार लावणारे नेते आणि त्यांना मदत करणारेे कार्यकर्ते हे ही आजपासून आपल्या गावापुरते तरी 'राष्ट्रपुरुष' म्हणून ओळखले जातील.त्यांचेविरुद्ध आग पाखडणे,कागाळी करणे,त्यांना बदनाम करणे वा त्यांच्याविरुद्ध लिहीणे हा 'देशद्रोह' मानण्यात येईल व असे करणाऱ्यावर देशद्रोहाचा खटला भरण्यात येईल.सबब या जीआरद्वारे असे सूचित करण्यात येते कि या सर्व मंडळींना देशसेवकाचा दर्जा देण्यात येत आहे.
......एवढे बोलून मी ही ग्रामसभा संपली असे जाहीर करतो."
कुणाला समजले,कुणाला समजले नाही.मात्र श्रीपतराव व सोपानदादांना आपल्या स्वप्नांची एका झटक्यात राखरांगोळी झाल्याचे एका क्षणात समजले.
मदनरावांच्या ज्या बैठकीकडे आपण भोजनाची पंगत म्हणून दुर्लक्ष केले ती बैठक एवढा मोठा भूकंप घडवेल असे सोपानदादांना स्वप्नातही वाटले नव्हते.बरे अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या गोष्टी कराव्यात तर 'राष्ट्रपुरुषां'समोर अभिव्यक्तीस्वातंत्र्य किस झाड की पत्ती?सगळ्या मनसुब्यांवर पाणी फिरणार आणि मदनराव पुन्हा ठेचात सरपंच म्हणून मिरवणार यात आता तीळमात्र शंका उरली नव्हती.सोपानदादांचे हातपाय गळून गेल्यासारखे झाले.आपणही एखादी बैठक बोलवावी असे त्यांच्या मनाला राहून राहून वाटू लागले.एवढ्यात दीडशाना तिथे टपकलाच.त्याला पाहून सोपानदादांना जरा अवसान आल्यासारखे वाटले.
"ए दीडशान्या...त्या भोस...,"सोपानदादांनी कचकन आपलीच जीभ चावली.कळत नकळत देशद्रोहाचा गुन्हा घडून जाता जाता राहीला.
"आरं दीडशान्या...त्या मदनरावांनी पार इस्कोट केला रं आपल्या प्ल्यानिंगचा!सगळी भाषणं मी तोंडपाठ करुन ठिवली हुती.काय काय पोल खोलायची?किती खालच्या पातळीपर्यंत उतरायचं?हे सगळं मी ठरवून ठिवलं हुतं पण त्या जीआरनं पार माती केली.आता यावेळीसुदीक काय आपली पार्टी बसंल असं वाटत न्हाय."
"दादा,तुमी इनाकारण टेंशन घेताय.हुतं ती बऱ्याकरता हुतं !"
"मला काय समजलं न्हाय गड्या?"
"मला सांगा...मदनराव देशसेवक झालं.मग तुमी कोण?"
"अरारारा...ह्ये माझ्या ध्येनातच आलं न्हाय गड्या."
"तुमी त्येंच्याइरुद्ध बोलू शकत न्हाय...तुमी बी येनकेनप्रकारे देशसेवाच करताय की...म्हंजे तेही तुमच्याइरुद्ध बोलू शकत न्हाईत."
"व्हय गड्या दीडशान्या!मग प्रचार कसा करायचा रं?...ते गप...आपुन गप?"
"त्ये प्रचाराचं फुडच्या फुडं बघू.आता चार दिसात मदनरावांचा भला मोठा सत्कारसोहळा ठिवायचं बघा...बाकीचं माझी मी बघून घितू."
"त्यो आणिक कशापाई?"
"मदनरावांचं कवतूक कराय पाह्यजे."
"व्हय गड्या...तू मदनरावांची गाठ घिऊन त्यास्नी कल्पना दी.खर्चाचं माझं मी बघतू."
"व्हय तर...आत्ताच जातू!"
हवेच्या झुळकीसारखा दीडशाना आला आणि सोपानदादांच्या उरात श्वास भरुन गेला.सोपानदादांना आता तरतरी आल्यासारखे वाटू लागले.ते जोमाने सत्कारसोहळ्याच्या तयारीला लागले.
सत्कारसोहळ्याचा दिवस उजाडला.आज पण सकाळी सकाळी सगळे गाव चावडीवर जमा झाले होते.सापा-मुंगसाचे वैर असलेले सोपानदादा आणि मदनराव एक होतात म्हणजे गावासाठी काहीतरी आक्रीतच होते.
सोपानदादांच्या घरी कार्यकर्त्यांची रीघ लागली होती.दीडशाना सगळ्यांना कोणत्या वेळी काय करायचे हे समजावून सांगत होता.
"ए तुक्या,ती धा हजार फटकड्याची माळ तू संभाळायची.आन् ह्ये बघ...टायमिंग एकदम अचूक हुयाला पाह्यजे."
"ए मी असल्यावर तू फिकीरच करु नगं!"
सगळी तयारी करुन सोपानदादा ग्रामपंचायतीसमोर उभारलेल्या शामियान्यात येवून डेरेदाखल झाले.पाच पन्नास हार,पाच पन्नास फेटे आणि तेवढेच नारळ आधीच तिथे आणून ठेवले होते.सगळी तयारी चोख झाली होती.मदनरावही आपल्या कार्यकर्त्यांसमवेत ऐटीत डुलत डुलत आले.स्थानापन्न झाले.सगळा गाव आ वासून बघत होता.
प्रथम सोपानदादांनी हार-नारळ व फेटा देवून मदनरावांचा सत्कार केला.टाळ्यांचा कडकडाट झाला.नंतर सर्व कार्यकर्त्यांनी मदनरावांचा सत्कार केला तेव्हा तर सोपानदादांच्या या प्रेमाने मदनरावांना गदगदून आले.
हा सोहळा उरकताच दीडशाना माईककडे झेपावला.
"गावकरी मंडळी,हा ऐतिहासिक सोहळा बघून तुमच्या डोळ्याचं पारणं फिटलं असंल.सरपंचसायबांनी जीआर आणून गावात होणारा संघर्ष टाळण्यास मदतच केली. म्हणून त्येंचा हा सत्कार आयोजित केलाय.आजपास्नं आपल्या गावात कुणीच कुणाच्या इरोदात बोलणार न्हाय.केलं तर असं कवतूकच करतील."
टाळ्यांचा पुन्हा पाऊस पडला.
"हं...तर ज्यांना या प्रसंगी सरपंचसायबाचं कवतूक करायचं हाय त्येंनी हितं यावं आन् चार शब्द बोलावं."
पहिल्या प्रथम नवऱ्याने टाकलेली व गावातच येवून राहिलेली तरणीताठी धुरपी उठून पुढे आली.तिच्यामागे जमीन फुकून कंगाल झालेला शिवा,त्याच्यामागे पांगळा विठ्ठल पुढे आले.अजून दोघे तिघे उठण्यासाठी चुळबूळ करत होते पण दीडशान्याने नंतर...नंतर असे त्यांना बोटाने खुणावून सांगितले व माईक धुरपीच्या हातात दिला.
"आपलं सरपंचसायब लय दयाळू हायतं..त्येंचं कवतिक करावं तेवढं कमीच हाय.म्या अशी नवऱ्यानं टाकलेली...ना कुणाचा आधार ना कुणाचा भार.पर सरपंचसायबांनी लय मदत केली.माज्याकडनं फकस्त पंधरा हजार रुपै घिऊन आवास योजनेतनं घरकुल बांधून दिलं.आजकाल पंधरा हजारात काय हुतंय वो?घर दिलं...घराला आंगान बी दिलं पर तेवढ्यानं सरपंचसायबांचं मोठ्ठं मन भरलं न्हाय.त्या अंगणात खेळायला एक बाळ बी दिलं.आपलं संत काय सांगून गेलं?तर आपलं सत्कर्म माणसानं देवाला अर्पण करावं...सरपंचसायबांनी पण त्येच केलं.त्येंचं कर्म त्येंनी माझ्या नवरदेवाला अर्पण केलं.त्ये संतपण हाईत याचा आपल्या गावाला अभिमान हाय...एवढं बोलून मी माझं भाषण संपवते."
मदनराव तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत होते.कारण धुरपी चकार शब्दाने त्यांच्याविरुद्ध बोलली नव्हती.उलट कौतूकच केले होते.धुरपी जाताच पांगळा विठ्ठल पुढे झाला.
"मायबाप हो,माणसानं एकमेकांचं दु:ख जाणलं पाह्यजे तरच माणुसकी टिकती.पांगळा हुयाच्या आधी मला ह्ये शानपन माहीत न्हवतं.पर आपल्या सरपंचसायबांनी मला एकमेकांचं दु:ख जाणायला शिकवलं.त्यांच्या एका कार्यकर्त्याला माझ्या या वंगाळ तोंडानं एकदा 'पांगळा पांगळा' म्हणून हिणवलं हुतं.पर सरपंचसायबानी पांगळं असण्याचं दु:ख काय असतं त्ये मला शिकवलं.त्येंच्या उजव्या डाव्या हातांनी माझा पायच काढून न्हेला.तवा खऱ्या अर्थानं मला अपंगांच्या दु:खाचं ब्रम्हज्ञान प्राप्त झालं.आपलं सरपंचसायब संत महापुरुष हायती."
मदनराव उठण्याचा प्रयत्न करत होते पण सोपानदादा त्यांना खांद्याला धरुन पुन्हा पुन्हा खाली बसवत होते.
शिवा हातात माईक धरुन उभा राहिला.तोवर मघाचे दोघे तिघे माईकजवळ येऊन थांबले.अशा प्रकारे कौतुक करायचे आहे म्हटल्यावर मदनरावांच्या अत्याचाराने पीडीत आणखी पाच पंचवीसजण हळू्हळू पुढे सरकू लागले.
"म्या शिवा,दोन एकराचा मालक हुतो पर माझ्याच्यानं त्या काळ्या आयची वटी भरायचं कदी जमलं न्हाई.ती काळी आय ढसाढसा रडायची.आपल्या सरपंचसायबास्नी तिची दया आली.तिची वटी भरुन तिला सुखी करण्यासाठी सरपंचसायबांनी पिरमानं ती माझ्याकडनं तशीच लिहून घेतली.आज त्या काळ्या आयची वटी शिगोशीग भरलेली बघून जीवाला समाधान वाटतंया...ह्ये सगळं आपल्या सरपंचसायबांमुळं घडून आलं...."
आता मात्र सोपानदादांच्या हाताला झिडकारुन मदनराव तिरमिरीत पुढे झेपावले.शिवाच्या हातातला माईक हिसकावून घेतला आणि गरजले,
"भोसडीच्यांनो,बंद करा ही नाटकं...तो जीआर आत्ताच्या आत्ता मी म्हागं घेतल्याचं जाहीर करतो...."
आणि दहा हजार फटकड्यांची माळ ढोल-ताशा बडवू लागली.
©अनिल सा. राऊत
9890884228
anandiprabhudas@gmail.com

अनिल सर् धुरपी विठ्ठल अन् शिवा सारखं तुमच्या लेखणीतुन कौतुक झालं बघा देशसेवेला जसेच्या तसे पुढे चालवणारांचं. कुणाला सलजलं नसलं तर पुन्हा वाचा म्हणावं.
ReplyDeleteमुजरा सर् मुजरा!
धन्यवाद शिवा जी
Deleteआपला अभिप्राय लाखमोलाचा आहे!!
खुप छान. वाचताना प्रत्येकाला स्वतःचा गाव आठवेल. तुम्ही रंगवलेली characters खरच सगळीकडे जिवंत आहेत. Well done
ReplyDeleteरुपाली जी
Deleteखूप खूप आभार!!!!
वाचकांच्या प्रतिक्रिया मिळाल्याने साहित्यिकाला जो आनंद होतो तो अवर्णनीय असतो.आपल्या सर्वांच्या प्रतिक्रियांची मी वाट पाहतोय...
ReplyDelete